Narendra Modi, Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Mahayuti Government: मोठी बातमी! महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख अन् वेळ ठरली ; भाजपच्या बड्या नेत्यानंच दिली माहिती

Politcal News : राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदान, मुंबई येथे होणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करून दिली आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. या निवडणुकीत महाविकास आघाडीला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आता लवकरच राज्यात महायुतीचे सरकार येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यासाठी महायुतीमधील घटक पक्ष जोरदार तयारी करीत आहेत. राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदान, मुंबई येथे होणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करून दिली आहे.

राज्यातील निवडणुकीचा निकाल आठ दिवसापूर्वी जाहीर झाल्यानंतर सर्वांना शपथविधी कधी होणार याची उत्सुकता लागून राहिली होती. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. 5 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदींच्या (Narendra Modi ) उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडणार असून यावेळी अनेक राज्यातील मुख्यमंत्री सुद्धा या सोहळ्याला उपस्थितीत राहणार आहेत. यावेळी मोदींसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi Adityanath ), मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी उपस्थितीत राहणार आहेत.

महायुती सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदान येथे होणार आहे. आझाद मैदानावर होत असलेल्या या शपथविधी सोहळ्याची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, तत्पूर्वी भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक 3 डिसेंबरला दुपारी 1 वाजता होणार आहे. या बैठकीत विधिमंडळातील नेत्याची निवड केली जाणार आहे. आमदारांच्या या बैठकीसाठी नवी दिल्लीतून निरीक्षक येणार आहेत. या बैठकीत भाजपच्या नेत्याची निवड करण्यात येणार आहे.

या शपथविधी सोहळ्यासाठी इतर राज्यातील काही मुख्यमंत्री तसेच एनडीएमधील महत्त्वाचे नेते उपस्थित राहू शकतात. राज्यातील विधानसभा निवडणुकीत 288 पैकी महायुतीला 235 जागा मिळाल्या आहेत. भाजपने सर्वाधिक 132 जागांवर विजय मिळवला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने 57 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागांवर बाजी मारली होती.

भाजपकडून अद्याप मुख्यमंत्रीपदासाठीच्या नावाची घोषणा झालेली नाही. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असले तरी त्याबाबत आमदारांच्या बैठकीत शिक्कामोर्तब होईल. याआधी 2014 साली जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते त्यांनी वानखेडे मैदानावर शपथ घेतली होती. तर 2019 साली त्यांनी राजभवनात शपथ घेतली होती. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदे यांनी माघार घेतली आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाकडून या पदासाठी दावा करण्यात आलेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT