Abdul Sattar Sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar : 'सत्ता तिथे सत्तार'; निवडणूक छोटी असो की मोठी, घराणेशाही कायम

Sillod Politics : सिल्लोड नगर परिषदेत पत्नी, मुलाने पदे भोगली, आता जिल्हा मजूर सहकारी संघाच्या चेअरमन पदावर बंधूची वर्णी

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : राज्याचे अल्पसंख्यांक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकतीच सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा एकहाती ताब्यात घेतली. तत्पूर्वी, जिल्हा मजूर सहकारी संस्थेच्या निवडणुकीतही पंधरापैकी 13 उमेदवार निवडून आणत सत्तारांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवला. 'सत्ता तिथे सत्तार' असे अभिमानाने सांगणाऱ्या अब्दुल सत्तारांना निवडणूक छोटी असो की मोठी सगळी पदे घरातच हवी असतात.

जिल्हा मजूर सहकारी संस्थेवर त्यांनी आपल्या सख्ख्या भावालाच चेअरमन केले. यापूर्वी सिल्लोड नगर परिषदेत सत्तारांच्या पत्नी, मुलगा यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष भोगले आहे. त्यानंतर आता सत्तारांनी मोठ्या भावाला जिल्हा मजूर सहकारी संघाच्या चेअरमन पदावर बसवत तेथील सूत्रही आपल्याच हाती ठेवल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले.

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्हा मजूर सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी अब्दुल गफ्फार यांची बिनविरोध निवड करत सत्तारांनी घराणेशाहीची परंपरा सुरू ठेवल्याची चर्चा होत आहे. या संस्थेच्या चेअरमन पदाच्या निवडी संदर्भात सहकार अधिकारी दिलीप जैस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत अब्दुल गफ्फार अब्दुल नबी यांचा चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे त्यांची चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली.

या निवडीनंतर सत्तार यांनी नवनिर्वाचित चेअरमन तसेच संचालकांचा सत्कार करत त्यांना शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या सर्व अडीअडचणी सोडवण्यासाठी येत्या शंभर दिवसांत तोडगा काढू, आपण संस्थेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही अब्दुल सत्तारांनी यावेळी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, जिल्हा मजूर संस्थेच्या संचालक मंडळासाठी 20 जानेवारी रोजी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या नेतृत्वाखालील मजूर सहकार विकास पॅनलचे 15 पैकी 13 उमेदवार विजयी झाले होते. त्यानंतर चेअरमन पदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. आता ते घरातच गेल्याने सत्तारांना सर्व पदांवर आपल्याच नात्यातील मंडळींना बसवायचे असल्याची चर्चा सुरू आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT