Shiv Sena MLA Abdul Sattar with supporters after his son Ameer Sattar’s victory in the Zilla Parishad election, marking a strategic political entry and consolidation of power in Silod-Soygaon region. Sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या दुसऱ्या मुलाचेही सुरक्षित राजकीय लॉन्चिंग; विजयासह झेडपीत दमदार एन्ट्री!

Chhatrapati Sambhajinagar ZP Ameer Sattar : अब्दुल सत्तार यांच्या अचूक राजकीय नियोजनामुळे अंभई गटातून पुत्र आमीर सत्तार यांचा जिल्हा परिषदेत विजय झाला असून, सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात त्यांचे वर्चस्व अधिक मजबूत झाले आहे.

Jagdish Pansare

ZP Election Result News : सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात नव्या गटाची निर्मिती, तिथून मुलाला उमेदवारी अन् आता विजय. माजी मंत्री तथा शिवसेनेचे विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्या परफेक्ट प्लॅनिंगचे हे उदाहरण म्हणावे लागेल. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवत मुलगा समीर सत्तार यांच्या हाती सूत्र सोपवली. तर आमेर या दुसऱ्या मुलाला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात आणत त्यांनी मतदारसंघावर वर्चस्व कायम राखले.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अंभई गटातून आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल अमीर यांनी विजय मिळवला आहे. अंभई गटात झालेल्या लढतीत अब्दुल अमीर यांनी भाजपचे उमेदवार त्र्यंबक मारुती गव्हाणे यांचा पराभव केला. अब्दुल अमीर यांनी 3435 मतांच्या फरकाने भाजपला धूळ चारली. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच अब्दुल अमीर आघाडीवर होते.

सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील 9 गट आणि 18 गणात अब्दुल सत्तार यांनी भाजपसोबत युती करण्यास नकार दिला होता. त्यामुळे हा मतदारसंघ वगळता इतर तालुक्यात शिवसेना-भाजप युतीची घोषणा झाली होती. परंतु ही युती नंतर कागदावरच राहिली. दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांना अर्ज भरायला लावून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले. सोमवारी (ता.09) निकाल जाहीर होत असताना जिल्हा परिषदेचा कल हा सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच असल्याचे दिसून आले आहे.

गेल्या जिल्हा परिषदेत सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील 8 पैकी 4 जागा अब्दुल सत्तार यांच्याकडे तर 4 भाजपाकडे होत्या. यंदाच्या निवडणुकीत अंभई या नव्या गटाची आणि 2 गणांची भर पडली. या नव्या गटातूनच अब्दुल सत्तार यांनी आपले थोरले सुपूत्र आमीर सत्तार यांना उमेदवारी देऊन मैदानात उतरवले होते.

स्वतः अब्दुल सत्तार, जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी आमेर सत्तार यांच्या प्रचारासाठी जोर लावला होता. आमीर सत्तार निवडून आल्यानंतर अब्दुल सत्तार हे जिल्हा परिषदेच्या सत्तेत महत्वाची भूमिका वठवू शकतात, असे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT