Minister Abdul Sattar-Let. Manikrao Palodkar Sarkarnama
मराठवाडा

Sillod Assembly Constituency : माणिकराव पालोदकर यांचे वर्चस्व असलेल्या सिल्लोडवर आता सत्तारांची सत्ता..

After former minister Palodkar, Abdul Sattar ruled Sillod constituency : 2004 मध्ये भाजपने सांडू पाटील लोखंडे यांना उमेदवारी दिली. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसने माजी मंत्री माणिकराव पालोदकर यांचे बोट धरून राजकारणात आलेल्या अब्दुल सत्तार यांना उमेदवारी देत पहिल्यादांच अल्पसंख्याक चेहरा मैदानात उतरवला.

Jagdish Pansare

Sillod Assembly Constituency : अगदी सुरवातीपासून म्हणेज 1962 पासून विधानसभेच्या सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रीय काँग्रेसचा झेंडा फडकत होता. बाबुराव जंगुळे, शिवराम मानकर यांनी सुरवातीलाच या मतदारसंघावर काँग्रेसची पकड मजबुत केली होती. पुढे जनता पार्टीच्या नामेदव गाडेकर यांनी 1978 मध्ये विजय मिळवत पहिल्यांदा काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का दिला. 1980 मध्ये माणिकराव पालोदकर यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणला.

दहा वर्ष माणिकराव दादा यांनी सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघावर एकहाती सत्ता राबवली. 1990 नंतर पुन्हा काँग्रेसच्या नेतृत्वाला उतरती कळा लागली आणि भाजपच्या किसनराव काळे यांनी सिल्लोडमध्ये पहिल्यांदा कमळ फुलवले. (Abdul Sattar) आक्रमक नेतृत्व करत काळे यांनी सिल्लोड-सोयगाव मतदारसंघ काँग्रेसकडून हिसकावून घेत भाजपचा बालेकिल्ला बनवला.

95-99 अशा सलग दोन निवडणुकीत किसन काळे यांनी विजय मिळवत तालुक्यात भाजपची ताकद वाढवली. 2004 मध्ये भाजपने सांडू पाटील लोखंडे यांना उमेदवारी दिली. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसने माजी मंत्री माणिकराव पालोदकर यांचे बोट धरून राजकारणात आलेल्या अब्दुल सत्तार यांना उमेदवारी देत पहिल्यादांच अल्पसंख्याक चेहरा मैदानात उतरवला.

आधी पराभव मग सलग विजय..

सत्तार यांनी पहिल्याच निवडणुकीत भाजपला जोरदार टक्कर दिली, पण त्यांचा अवघ्या 301 मतांनी निसटता पराभव झाला. पण या पराभवाने अब्दुल सत्तार खचले नाही, त्यांनी पाच वर्षात मतदारसंघात जातीय समीकरणे आणि सोशल इंजिनिअरिंग साधत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही आपली ताकद दाखवायला सुरवात केली होती. (Shivsena) विधानसभा निवडणुकीत झालेल्या निसटत्या पराभवाचे शल्य घेऊन सत्तार यांनी पुढच्या निवडणुकीची तयारी सुरु केली.

2009 मध्ये सत्तार यांचा सामना भाजपच्या सुरेश बनकर यांच्याशी झाला. अटीतटीच्या या लढतीत सत्तार यांनी बाजी मारली आणि भाजपकडे गेलेली जागा पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणली. सत्तार यांनी भाजपच्या बनकर यांचा 26 हजार मतांच्या फरकाने पराभव केला. विधानसभेत पहिला विजय मिळवल्यानंतर सत्तारांनी मागे वळून पाहिले नाही.

राज्यात काँग्रेस-आघाडीच्या सरकारमध्ये सिल्लोडला प्रतिनिधित्व मिळाले, सत्तार मंत्री झाले. आपल्या मंत्रीपदाचा पुरेपूर फायदा त्यांनी मतदारसंघावरील पकड घट्ट करण्यासाठी करून घेतला. 2014 मध्ये दुसऱ्यांदा सत्तार यांच्याविरोधात भाजपने पुन्हा सुरेश बनकर यांना उमेदवारी दिली. पण पाच वर्षातील राजकीय अनुभवाच्या जोरावर सत्तार यांनी दुसऱ्यांदा बनकर यांना पराभवची धूळ चारली.

सत्तारांचे मताधिक्य मात्र या निवडणुकीत घटले होते. 13 हजार सातशे मतांच्या फरकाने त्यांनी भाजपवर विजय मिळवला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रसेचे अधिकृत उमेदवार सुभाष झांबड यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवत अब्दुल सत्तार यांनी बंड पुकारले. झांबड यांच्या विरोधात काम करत त्यांच्या पराभवाला हातभार लावला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेशाची तयारी केली. पण स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पक्षप्रेवशाला कडाडून विरोध केला.

इकडून तिकडे उड्या, पण मंत्रीपद कायम..

तेव्हा तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिल्लोडची जागा युतीमध्ये शिवसेनेला देऊ केली आणि सत्तारांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करायला लावले. सत्तार यांनी हा निर्णय स्वीकारला आणि सिल्लोडमध्ये कधी नव्हे ते शिवसेनेचा भगवा झेंडा, बाळासाहेब, उद्धव ठाकरे यांचे फोटो, बॅनर झळकले. उद्धव ठाकरे यांनी सत्तार यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. राज्यात मराठा आरक्षणाचे वातावरण चांगलेच तापलेले होते.

अशावेळी अब्दुल सत्तार यांच्याविरोधात काँग्रेस कोणाल उमेदवारी देणार? याची उत्सूकता होती. दिवंगत काँग्रस नेते माजी खासदार, आमदार माणिकराव पालोदकर यांचे चिरंजीव प्रभाकर पालोदकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. पण सर्व जाती-धर्माची मते मिळावीत आणि सिल्लोडमध्ये सत्तारांचा पराभव व्हावा, यासाठी सर्वानुमते पालोदकर यांना अपक्ष लढण्यास सांगण्यात आले.

काँग्रेसने कच्चा उमेदवार देत पालोदकर यांना पुर्ण मदत केली. पण धुर्त अब्दुल सत्तार यांनी ही खेळी ओळखली आणि आपल्या रणनितीत बदल करत डावपेच टाकले. परिणामी अब्दुल सत्तार यांनी पालोदकर यांचा 24 हजार मतांच्या फरकाने पराभव केला आणि विजयाची हॅट्रीक साधली. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने महाविकास आघाडीचा प्रयोग केला आणि या सरकारमध्ये अब्दुल सत्तार राज्यमंत्री झाले.

अडीच वर्षानंतर शिवसेनेत फूट पडली, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडात सत्तारांनी उडी घेतली. राज्यात पुन्हा सत्तांतर झाले, शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात सत्तारांना कॅबिनेटपदी बढती मिळाली. अगदी राज्याचे कृषीमंत्रीपद सत्तारांना मिळाले. वादग्रस्त तितकीच वेगवान आणि घटना-घडामोडींनी अब्दुल सत्तार यांची राजकीय वाटचाल सुरू आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार यांना घेरण्याचे विरोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. यावेळी या प्रयत्नांना महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप म्हणजेच माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांच्या समर्थकांची साथ मिळण्याची शक्यता आहे. या संकटावर मात करत अब्दुल सत्तार विजयाचा चौकार मारतात? का मग त्यांच्या विजयाचा चौफेर उधळलेला वारू विरोधक रोखतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT