Amit Shah Uddhav Thackeray Narendra Modi News sarkarnama
मराठवाडा

Amit Shah Speech In Nanded : बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी ऑपरेशन 'सिंदूर'साठी मोदींना मिठी मारली असती!

Amit Shah stating that Balasaheb Thackeray would have embraced Prime Minister Modi for successfully carrying out Operation Sindoor. : भारताने सिंधू जल करार रद्द केला, पाकिस्तानसोबतचे व्यापारी संबंध तोडले. दहशतवादासोबतच छत्तीसगड आणि देशातील विविध भागातील नक्षलवाद आपण चिरडून टाकला

Jagdish Pansare

BJP News : पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी काश्मीरच्या पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांना ठार मारले. आमच्या माता-भगिनींचा सिंदूर मिटवला, त्या दहशतवाद्यांना मुळासकट उखडून फेकण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवाद्यांना ठार मारले. संपूर्ण जगाने भारतीय सैन्याचे हे शौर्य पाहिले. पण महाराष्ट्रातील उद्धवसेना मात्र यावर टीका करत आहे.

'ये उद्धवसेना को क्या हो गया है, आज बालासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) होते तो मोदीजी को गले लगा लेते' असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर टीका केली. नांदेड येथे भाजपाच्या शंखनाद सभेत अमित शहा यांनी आपल्या भाषणात ऑपरेशन सिंदूर आणि नक्षलवादाविरोधातील लढ्याचा आवर्जून उल्लेख केला. यावेळी शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षावरही टीका केली.

ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्धवस्त केले, अतिरेक्यांना त्यांच्या घरात घुसून ठार मारले. (Amit Shah) पाकिस्तानकडून झालेला एकही हल्ला आमच्या सैन्य दलाने यशस्वी होऊ दिला नाही. हे शौर्य आणि पाकिस्तानचा दहशतवादाला असलेला पाठिंबा जगाला सांगण्यासाठी जगभरात गेलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळात उद्धवसेनेचे खासदारही आहेत.

मात्र त्यांचे राज्यातील नेते या दौऱ्याला 'बारात' म्हणत आहेत. उद्धवसेनेला काय झालं आहे? हा बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आहे का? बाळासाहेब ठाकरे आज असते तर आॅपरेशन सिंदूर राबवून दहशतवाद्यांना धडा शिकवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिठी मारली असती, असेही अमित शहा म्हणाले. ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला धडा शिकवला. पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला दाखवून दिले की खून और पाणी, ट्रेड और टेरर एक साथ नही चलेगा!

भारताने सिंधू जल करार रद्द केला, पाकिस्तानसोबतचे व्यापारी संबंध तोडले. दहशतवादासोबतच छत्तीसगड आणि देशातील विविध भागातील नक्षलवाद आपण चिरडून टाकला असल्याचेही शहा यांनी आपल्या भाषणात सांगितले. मराठवाड्यातील दुष्काळावर भाष्य करताना अमित शहा यांनी पुन्हा मराठवाडा वाॅटर ग्रीड योजनेचा उल्लेख केला. 40 हजार कोटी रुपये खर्चून महाराष्ट्रातील शेतकरी, सर्वसामान्य जनता आणि सिंचनासाठी ही योजना आम्ही आणली. पण महाविकास आघाडी सरकारने ती रखडवली.

आता आता देवेंद्र भाऊ पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत, पाच वर्षात मराठवाड्यातील प्रत्येक गावात या योजनेच्या माध्यमातून पाणी पोचेल. मराठवाडा दुष्काळ मुक्त होईल. कोकण आणि पश्चिम वाहिन्यांचे पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी ही योजना अत्यंत महत्वाची आहे, असेही शहा यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. कित्येक वर्षापासूनची ही मागणी पूर्ण केली. शरद पवार कित्येक वर्ष केंद्रात मंत्री होते, पण त्यांनी यासाठी काहीच प्रयत्न केले नाही, पण मोदींजीनी हे करून दाखवलं, असे सांगत शहा यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य पुन्हा देशातील क्रमांक एकचे राज्य बनेल, असा विश्वास व्यक्त करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेत छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र सगळ्यात पुढे असेल. विकसित महाराष्ट्र आणि मग विकसित भारत होईल, असेही शहा म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT