hemant patil amit shah eknath shinde sarkarnama
मराठवाडा

Hemant Patil News : हेमंत पाटलांना अमित शहांच्या शब्दावर भलताच विश्वास; पण...

Hemant Patil Hingoli Lok Sabha Election 2024 : हेमंत पाटलांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेतील त्यांचे पूर्वाश्रमीचे सहकारी व काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे यांचा पराभव केला होता.

Prasad Shivaji Joshi

हिंगोली : 4 मार्च | एकीकडे अमित शाह ( Amit Shah ) यांनी मातोश्रीत बंद खोलीत दिलेला शब्द पाळला नाही, असा आरोप करत राज्यात शिवसेना-भाजप युतीला 2019 मध्ये बहुमत असताना उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) वेगळा निर्णय घेतला. काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जात महाविकास आघाडीचे ( Mahavikas Aghadi ) सरकार स्थापन करून स्वतः मुख्यमंत्री झाले. आजही उद्धव ठाकरे अमित शाह यांनी शब्द पाळला नाही, या आपल्या आरोपावर ठाम आहेत. असे असताना शिवसेनेच्याच तिकीटावर निवडून आलेले. पण, आता शिंदेंच्या शिवसेनेत असलेले हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील ( Hemant Patil ) यांना मात्र गृहमंत्री अमित शाह यांच्या शब्दावर भलताच विश्वास दिसतो.

शाह यांनी आपल्याला उमेदवारीचा शब्द दिल्याचे सध्या ते ज्याला त्याला सांगत सुटले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election 2024 ) भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये राज्यातील एकाही मतदारसंघाचा समावेश नव्हता. त्यामुळे निवडणुकीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांची उत्सुकता ताणली गेली आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील ( Hemant Patil ) यांनी सांगितले, "गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्याला शब्द दिला असल्याने हिंगोलीमधून शिवसेनाच निवडणूक लढविणार आहे."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेना-भाजप युती असताना हिंगोली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असायचा. विद्यमान खासदार हेमंत पाटील ( Hemant Patil ) यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेतील त्यांचे पूर्वाश्रमीचे सहकारी व काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे यांचा पराभव केला. पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली. "शिंदे यांनी पक्षाच्या खासदारांच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीला तयारीला लागा," असेही पाटलांनी सांगितले.

शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाली. त्यामुळे महायुतीमधील जागावाटप हा अतिशय महत्वाचा प्रश्न बनणार हे अपेक्षित होते. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर येथे विद्यमान लोकप्रतिनिधीला दुसऱ्या वेळेस संधी मिळालेली नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते हिंगोली लोकसभा मतदारसंघाची आग्रही मागणी करत आहेत. तर शिवसेना-भाजप युती असतानाही हिंगोली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. त्यामुळे शिवसेनेचा हिंगोलीच्या जागेवर नैसर्गिक हक्क आहे.

महाविकास आघाडीकडून हिंगोली लोकसभा मतदारसंघ शिवसेना उबाठा गटाकडे असण्याची शक्यता आहे. सुभाष वानखेडे यांनी स्वगृही प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसैनिकाविरुध्द लढा देण्यासाठी शिवसैनिकच असला पाहिजे, असा दावा नेते करत आहेत. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीची जोरात तयारी केली सुरु केली. सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी रामदास पाटील सुमठानकर यांची लोकसभा समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून तेच भाजपचे प्रमुख दावेदार आहेत.

तसेच, रामराव वडकुते यांचेही नाव इच्छुकांच्या यादीत आहे. 'गाव चलो अभियाना'च्या निमित्ताने भाजपचे कार्यकर्ते ग्रामीण भागात पोहोचले. मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनीही हिंगोलीचा विशेष दौरा करत तयारीचा आढावा घेतला. त्यामुळे भाजपमध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी गंभीर वातावरण असल्याचे दिसून येत आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने हिंगोलीतील भाजप नेत्यांचे मनोबल वाढले आहे. भाजपच्या या तयारीने विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची धाकधूक वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्याला शब्द दिल्याचा वारंवार उल्लेख केला जात आहे. शिवसेनेचे खासदार जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला गेले होते, त्यावेळी त्यांनी सांगितले होते, "ज्यांनी शिंदे यांना साथ दिली आहे, त्या जागा शिवसेनेकडेच असतील." पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते असलेल्या अमित शाह यांच्या शब्दाचा दाखला देत हेमंत पाटील स्वतःचे व समर्थकांचे समाधान तर करत नाहीत ना? अशी चर्चा होत आहे. दुसरीकडे भाजपचे स्थानिक नेते आणि इच्छूक उमेदवारांवर एकप्रकारे दबाव निर्माण करण्याचा प्रयत्नही पाटील यांच्याकडून होताना दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT