Pankaja Munde-Sambhaji Patil Nilangekar Sarkarnama
मराठवाडा

Beed Lok sabha Constituency : मराठ्यांची नाराजी थोपवण्यासाठी लातूरचे निलंगेकर उतरले बीडच्या मैदानात...

राम काळगे

Latur, 09 May : लोकसभेच्या लातूर मतदारसंघाची जबाबदारी पार पाडल्यानंतर माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची बीड लोकसभेच्या निरीक्षकपदी तातडीने नियुक्ती करण्यात आली आहे. महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना मतदारसंघात मराठा समाजाकडून होणारा विरोध लक्षात घेता तो थोपवण्यासाठी खास निलंगेकरांना बीड मोहिमेवर पाठवण्यात आले आहे.

लातूर (Latur) लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर तातडीने निलंगेकर यांना बीडला रवाना होण्याचे आदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे यांनी दिले. एवढेच नाही तर आता 11 मे म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघातील (Beed Lok sabha Constituency) प्रचार संपेपर्यंत निलंगेकर यांना बीडमध्येच मुक्काम ठोकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार निलंगेकर सक्रीय झाले असून बीडमध्ये त्यांनी निरीक्षक म्हणून कामाला सुरुवात केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बीड मतदारसंघात मराठा मतदारांची संख्या लक्षणीय आणि निर्णायक आहे. पंकजा मुंडे यांना प्रचारादरम्यान काही भागात आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाजाचा विरोध सहन करावा लागत आहे. आपण मराठा आरक्षणाच्या बाजूने आहोत, अशी भूमिका पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी वारंवार स्पष्ट केली आहे.

पंकजा मुंडे यांची लढत महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांच्याशी होत आहे. बीड मतदारसंघातील अंबाजोगाईमध्ये नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंकजा यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांच्यासाठी शरद पवार आज अंबाजोगाईत सभा घेणार आहेत. महायुतीसाठी बीडची जागा निवडून येणे महत्वाचे आणि मुंडे बहिण-भावाच्या प्रतिष्ठेची आहे.

अशावेळी महायुतीला कोणत्या समाजाची नाराजी परवडणारी नाही. ती मतांच्या रुपातून व्यक्त होऊ नये, यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. संभाजी पाटील निलंगेकर आणि मुंडे कुटुंबाचे संबंध जिव्हाळ्याचे आहेत. संभाजी पाटील निलंगेकर मराठा समाजाचे असून त्यांचा चांगला प्रभाव आहे.

हे लक्षात घेता बीड लोकसभेच्या निरीक्षकपदी त्यांनी निवड करण्यात आल्याचे बोलले जाते. बीडची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी तातडीने बीड गाठले आणि पंकजा मुंडे यांची भेट घेऊन मतदार संघाचा आढावा घेतला. आता या भागात ते मराठा मते पंकजा मुंडे यांच्यासाठी कसे खेचून आणतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT