Killari Earthquake Sarkarnama
मराठवाडा

Killari Earthquake @1993 : आयुष्यात प्रथमच मृत्यूचं तांडव पाहिलं....लोक वेड्यासारखे फिरत होते

Marathwada News : दुसऱ्या दिवशी मात्र मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आम्ही सास्तूरचा कोतवाल सोबत घेतला.

Vijaykumar Dudhale

Killari Earthquake News : एरव्ही पहाटे शांत असणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ त्या दिवशी जरा जास्तच गजबजलेला वाटत होता. चौकशीनंतर कळाले की किल्लारी, सास्तूर, माकणी, तावशी, सालेगाव आदी गावांत भूकंप झाला आहे. माझ्या आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं, असं मृत्यूचं तांडव त्या दिवशी आम्ही किल्लारी आणि सास्तूर परिसरात पाहिलं. (As soon as the earthquake struck, first village was reached)

-अशोक पवार, (भुयार-चिंचोली, ता. उमरगा, जि. धाराशिव)

ता. ३० सप्टेंबर १९९३ च्या पहाटेपर्यंत उमरगा शहरात गणपती विसर्जन मिरवणूक सुरू होती. कंटाळा आल्याने मी आणि माझे मित्र (कै.) औदुंबर चव्हाण चहा घेण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील (क्रमांक ९) हॉटेलवर गेलो होतो. तेव्हा पहाटेचे साधारण पाच ते साडेपाच वाजले असतील. एरवी पहाटे शांत असणारा हा हायवे त्या दिवशी जरा जास्तच गजबजलेला वाटत होता. चौकशीनंतर कळाले की किल्लारी, सास्तूर, माकणी, तावशी, सालेगाव आदी गावांत मोठा भूकंप झाला आहे. मी लगेच दुचाकी घेऊन गावाकडे (चिंचोली) निघालो. गावात जास्त नुकसान झाले नव्हते. हायवेच्या उत्तरेकडील भागात मोठे नुकसान झालंय एवढंच समजलं.

मी परत नळदुर्गला गेलो. प्रा. उमाकांत चनशेट्टी सर यांनी एक गाडी केली होती. त्यात बसून सास्तूरला गेलो. माझ्या आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं, असं मृत्यूचं तांडव त्या दिवशी पाहिलं. लोक वेड्यासारखे पळत होते. ढिगाऱ्याखाली अडकलेले मृतदेह काढायला मदत करण्याची सूचना आम्हाला चनशेट्टी सरांनी केली आणि आम्ही कामाला लागलो.

सास्तूर हे आमच्या भागातील मोठं आणि मोठंमोठे वाडे असलेले गाव. भूकंपामुळे सर्व वाडे कोसळले होते. त्यामुळे सगळीकडे दगडमातीचे ढिगारे दिसत होते. आमच्याकडे कुठलीही साधनं नव्हतं, त्यामुळे वरवर दिसणारे मृतदेह काढू लागलो आणि तेवढ्यात पाऊस सुरू झाला. हा पाऊस पुढे सलग तीन दिवस सुरू होता. पहिल्या दिवशी कोणी कोणाचे मृतदेह काढले, हे ओळखायला मार्ग नव्हता. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात येत होते.

मृतदेहाची ओळख पटावी म्हणून सोबतीला कोतवाल घेतला

दुसऱ्या दिवशी मात्र मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आम्ही सास्तूरचा कोतवाल सोबत घेतला. दगड आणि पांढरी माती वापरून बांधलेल्या वाड्यांचे रूपांतर ढिगाऱ्यांमध्ये झाले होते. हजारो लोक या माती आणि दगडाखाली दबून मृत्युमुखी पडले होते. हजारो जण अपंग झाले आणि ज्यांचे शारीरिक नुकसान झाले नाही, ते मानसिकरित्या अधू झाले होते. माती आणि दगड काढून मृतदेह काढण्याचे, कुणी जिवंत आहे का, हे शोधण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले होते. त्या सर्व कामावर दस्तरखुद्द तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार जातीने लक्ष देत होते.

सात ते आठ मृतदेहांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करावे लागले

सास्तूरहून नारंगवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला एक मोठा खड्डा खोदण्यात आला होता. त्यात मृतदेह एका ओळीने लावायचे, मग पोकलेन मशीनने माती टाकायचे. मग दुसरा थर, असे काम सुरू होतं. या भागात इमला असलेले मोठंमोठे वाडे होते, त्यात ‘सर’ होते. सर म्हणजे लाकडी कॉलम. असे ४-५ सर एकाला एक जोडून त्यावर ७-८ मृतदेह ठेवायचे आणि इतर लाकडाने त्यावर झाकायचे आणि अंत्यसंस्कार केले जायचे.

Killari Earthquake

पाऊस आणि चिखलामुळे मृतदेह हातातून निसटायचे

पावसामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी मृतदेह हाताळायचे काम खूप क्लिष्ट झाले होते. वरून पाऊस धो धो कोसळत होता, त्यामुळे चिखलात दबलेले मृतदेह कुजू लागले होते. हाताला किंवा पायाला धरून मृतदेह उचलायला गेले की ते निसटायचे. हा अनुभव फार भयानक होता. शहरी भागातून अन्न, कपडे आणि औषधे येऊ लागली होती. पण आमचे काम सुरूच होते.

पवारांनी सोलापूरला मुख्यमंत्र्यांचे मुख्यालय बनविले होते

राष्ट्र सेवा दलाचे एक पथकही तेथे कार्यरत होते. मीही त्याचा एक सदस्य होतो. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी सोलापूरला आपले मुख्यालय बनवले होते. पाऊस सुरू होता आणि पत्र्याचे शेड मारून लोकांना तात्पुरत्या घरांची सोय करणे चालू झाले. त्याचवेळी तीन चार दिवसांनंतरही काही लोक जिवंत सापडत होते.

पवारांच्या आवाहनाला संस्था, ट्रस्टचा सकारात्मक प्रतिसाद

जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला. ती मदत प्रत्येक गावात पोचली पाहिजे, याची मुख्यमंत्री पवार दक्षता घेत होते. हळूहळू परिस्थिती निवळू लागली आणि सरकार, सेवाभावी संस्था, धार्मिक ट्रस्ट यांनी पवार यांच्या हाकेला सकारात्मक प्रतिसाद देत एकेक गाव दत्तक घेतले. जवळजवळ दीडशे गावांत एकाच वेळी नवनिर्माण चालू झाले. मानव लोक या संस्थेने कृषी औजारे, बियाणे आणि शेतीपूरक साहित्याचे वाटप करून उदास झालेल्या लोकांना परत शेताकडे वळते केले.

...पण उद्‌घाटनासाठी पवार सत्तेत नव्हते

योजनाबद्ध काम, आखीव रस्ते, शाळा, समाज मंदिर आदींचे बांधकाम पूर्ण करून हा भाग पूर्वपदावर आणण्यात तत्कालीन मुख्यमंत्री पवार यांचे योगदान हे त्यांचे विरोधकही मान्य करतात. आपत्ती निवारणाचे एक उत्तम उदाहरण म्हणून आजही या कामाचा उल्लेख होतो. पवारांनी भूकंपग्रस्त भागातील मातीच्या ढिगाऱ्यावर बसून अनेकदा अधिकाऱ्यांच्या बैठक घेतल्या. पुनर्वसनाचे काम तातडीने सुरू केले. भूकंपानंतर अवघ्या २४ दिवसांत घराच्या बांधकामांचं भूमिपूजन करण्यात आले होते. ते काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे उद्‌घाटन करायला मात्र शरद पवार सत्तेत राहिले नाहीत. पण, युतीच्या मुख्यमंत्र्यापासून अनेक मंत्र्यांनी पवार यांचे योगदान मान्य केले. आज हा भाग सुखाने नांदतो आहे. पण ज्यांनी हा भूकंप आणि त्यानंतरचे व्यवस्थापन पाहिले आहे, ते पवारांचे मोठेपण मान्य केल्याशिवाय राहणार नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT