Asaduddin Owaisi, Amit Shah Sarkarnama
मराठवाडा

Owaisi On Shah : 'मजलीस को उखाड के फेको गे क्या' म्हणणाऱ्या शाहांना ओवेसींचं सडेतोड प्रत्युत्तर; 'भाजपचं अस्तित्व...'

AIMIM Vs BJP : अमित शाह यांच्यावर पलटवार करताना ओवेसींनी लाव रे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरेंची खिल्ली उडवली

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar Political News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संभाजीनगर येथे झालेल्या जाहीर सभेत 'संभाजीनगर से मजलीस को उखाड फेको गे क्या' असा सवाल भाजपच्या कार्यकर्त्यांना केला होता. शाह यांच्या या प्रश्नाला एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपचे मतदारसंघात अस्तित्व आहे का, असा प्रश्न उपस्थित करत प्रत्युत्तर दिले आहे.

संभाजीनगर येथे आयोजित इफ्तार पार्टीच्या निमित्ताने ओवेसी (Asaduddin Owaisi) शहरात होते. या वेळी माध्यमांनी शाह यांनी केलेल्या आव्हानाची आठवण करून देत प्रश्न केला. त्यावर संभाजीनगर जिल्ह्यात भाजपचे अस्तित्वच नाही. इथे गेल्यावेळी आमचा खासदार निवडून आला, त्याने चांगले काम केले. म्हणून त्याला लोक पुन्हा निवडून देतील, असा दावाही ओवेसी यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज ठाकरे आणि अमित शाह (Amit Shah) यांच्या दिल्लीत झालेल्या भेटीवरही ओवेसी यांनी 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत चिमटा काढला. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर एमआयएमने संभाजीनगरातून इम्तियाज जलील यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील उमेदवार मात्र अद्यापही जाहीर झालेला नाही.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संभाजीनगर येथील आपल्या भाषणात एमआयएमवर (AIMIM) निशाणा साधला होता. 'इस बार एमआयएम को जडसे उखाड फेको गे ना', असा सवाल केला होता. दिल्लीमध्ये संभाजीनगरचा खासदार कोण? असे विचारल्यावर आपली मान झुकते, असेही शाह म्हणाले होते.

यासंदर्भात ओवेसी यांना छेडले असता, आम्हाला उखडून फेकण्याची भाषा करणाऱ्या भाजपचेच जिल्ह्यात अस्तित्व आहे का? हे त्यांनी एकदा तपासून पाहावे असा पलटवार केला. आमच्या खासदाराने जिल्ह्यात सर्वांगीण विकासकामे केली असून, सर्व धर्मीयांच्या प्रश्नावर संसदेत आवाज उठवला आहे. त्यामुळे मतदार त्यांना दुसऱ्यांदा निवडून देतील.

देशात जातीपातीचे राजकारण सुरू असून, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे, असा आरोपही ओवेसींनी भाजपवर केला. आम्ही आग लावणारे नसून शांत करणारे आहोत. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीवर विचारलेल्या प्रश्नावर 'लाव रे तो व्हिडिओ' असा टोला लगावत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ओवेसी यांनी खिल्ली उडवली.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT