Nanded District Bank Election: नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आपले वर्चस्व राखतानाच जिल्ह्यातील महायुतीच्या सगळ्याच नेत्यांना खूष करण्याची तारेवरची कसरत खासदार अशोक चव्हाण हे लिलया करताना दिसत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विशेषतः महापालिकेत अशोक चव्हाण यांनी मित्र पक्षांना दूर ठेवत एकहाती सत्ता मिळवली होती. तर नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीतही अशोक चव्हाण यांनी स्वतंत्रपणे रणनीती आखत तिथे आपले वर्चस्वच कसे कायम राहिल? असा प्रयत्न केला होता.
सहाजिकच अशोक चव्हाण यांच्या या 'एकला चलो रे' च्या भूमिकेमुळे मित्र पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती. भाजपाचे आमदारही त्यांच्यावर रुसले होते. या सगळ्यांची नाराजी अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतून दूर करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सब का साथ सब का विकास' हे धोरण खऱ्या अर्थाने अशोक चव्हाण नांदेड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राबवताना दिसत आहेत. 23 संचालकांच्या निवडी या बिनविरोध करण्यासाठी चव्हाण यांनी वेगाने सुत्रे हलवण्यास सुरूवात केली आहे.
जिल्हा बँकेत सगळ्याच घटकांना प्रतिनिधित्व देण्याची भूमिका अशोक चव्हाण यांनी ठेवल्याने त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे. अशोक चव्हाण यांचे मेहुणे तथा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, पारंपारिक राजकीय प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रसेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार बाबुराव कदम कोहळीकर, काँग्रेसचे नांदेडचे खासदार रविंद्र चव्हाण या सगळ्या नेत्यांची विरुद्ध दिशेला असलेली तोंड एकाच दिशेला वळवण्यात अशोक चव्हाण यशस्वी ठरल्याची चर्चा आहे.
बँकेच्या 23 संचालकांपैकी 16 हे राखीव मतदारसंघातून निवडून द्यायचे आहेत. यामधून विद्यमान संचालकांपैकी जे नव्या सहकार कायद्यानूसार निवडणूक लढवू शकत नाहीत त्यांनी आपल्या नात्यातील वारसांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. यात प्रामुख्याने माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर हे निवडणूक लढवू शकणार नसल्याने त्यांनी त्यांच्या स्नूषा मीनल खतगांवकर यांना जिल्हा बँकेच्या राजकारणात आणले आहे.
जिल्हा बँकेचे सर्व संचालक बिनविरोध काढण्यासाठी अशोक चव्हाण यांनी आमदार अमरनाथ राजूकर, किशोर स्वामी या आपल्या विश्वासू सहकाऱ्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. या शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते भास्कर पाटील खतगावकर, प्रताप पाटील चिखलीकर यांच्यातही कोणत्या जागा आपल्याकडे घ्यायच्या यावर एकमत झाल्याचे बोलले जाते. अशोक चव्हाण यांनी जिल्हा बँकेची निवडणुक आणि त्याची सगळी सुत्रं आपल्या हाती घेतली आहेत. बिनविरोधसाठी अंतिम बोलणी, चर्चा होऊन दोन दिवसात यावर शिक्कामोर्तब केले जाऊ शकते.
भास्कर पाटील खतगावकर, प्रताप पाटील चिखलीकर हे नव्या सहकार कायद्यानूसार बँकेवर दहा वर्ष संचालक राहिल्यामुळे त्यांना आता निवडणूक लढवता येणार नाही हे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या दोघांनी आपल्या राजकीय वारसदारांना बँकेत एन्ट्री मिळवून देण्याचे ठरवले आहे.
खतगावकर यांच्या सुनबाई मीनल पाटील खतगावकर, चिखलीकर यांच्या कन्या प्रणिता देवरे यांची या निमित्ताने सहकार क्षेत्रात पहिले पाऊल पडणार आहे. याशिवाय नायगावचे भाजपचे आमदार राजेश पवार यांच्या पत्नी पूनम पवार यांचे नाव देखील महिला राखीवमधून या यादीमध्ये असणार आहे.
जिल्हा बँकेच्या 23 पैकी बालाजी कदम, जाई देशमुख, प्रणिता देवरे, आमदार भीमराव केराम, सारबाई कवळे, माजी आमदार मोहनराव हंबर्डे, श्रीनिवास चव्हाण, डॉ. मीनल खतगावकर, रामचंद्र मुसळे, राजेंद्र केशवे, तुषार राठोड, आनंदा शिंदे, माधवरा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर उर्वरित जागाही बिनविरोध काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.