

यूडायस प्लस 2025-26 अहवालानुसार महाराष्ट्रातील एकशिक्षकी शाळांची संख्या 9,269 वर पोहोचली.
या शाळांमध्ये सुमारे 1.79 लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून शिक्षक टंचाईचा फटका गुणवत्तेला बसत आहे.
राज्य सरकारने मोठ्या शिक्षक भरतीद्वारे रिक्त पदे भरण्याचा आणि परिस्थिती सुधारण्याचा दावा केला आहे.
Maharashtra school education challenges: महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षण व्यवस्थेचे अत्यंत चिंताजनक आणि विदारक चित्र केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या 'यूडायस प्लस २०२५-२६' च्या ताज्या अहवालातून समोर आले आहे. देशात एकशिक्षकी शाळांचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न होत असताना, महाराष्ट्रात मात्र हे चित्र अगदी उलटे असल्याचे दिसते. राज्यात गेल्या केवळ एकाच वर्षात एकशिक्षकी शाळांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून हा आकडा आता ९ हजारांच्या पार गेला आहे.
अहवालातील धक्कादायक आकडेवारीनुसार, राज्यातील एकशिक्षकी शाळांची संख्या अवघ्या एका वर्षात ८,१२५ वरून थेट ९,२६९ वर पोहोचली आहे. अत्यंत गंभीर बाब म्हणजे, या शाळांमध्ये सध्या १ लाख ७९ हजार १०४ विद्यार्थी आपले प्राथमिक शिक्षण घेत आहेत.
सरकारच्या संचमान्यता धोरणामुळे शाळांमध्ये शिक्षकांची मोठी कमतरता निर्माण झाली असल्याचे बोलले जात आहे. अनेक ठिकाणी दोन शिक्षक असलेल्या शाळेतील एका शिक्षकावर दुसऱ्या शाळेची अतिरिक्त जबाबदारी सोपवली जाते.
परिणामी, पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गांसाठी केवळ दोन किंवा तीनच शिक्षक उपलब्ध राहतात आणि शिक्षकांना एकाच वर्गात अनेक इयत्तांचे विद्यार्थी बसून शिकवावे लागते. यामुळे गुणवत्तेवर परिणाम होत आहेत.
"विद्यार्थीसंख्येवर आधारित चुकीच्या संचमान्यता धोरणामुळे शाळांमध्ये शिक्षकांचा दुष्काळ पडला आहे. पहिली ते सातवीच्या वर्गांना एकत्रित बसवून शिकवण्याची नामुष्की शिक्षकांवर येत आहे. जोपर्यंत प्रत्येक इयत्तेसाठी आवश्यक स्वतंत्र शिक्षक उपलब्ध करून दिला जात नाही, तोपर्यंत राज्यातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा कधीच सुधारू शकत नाही, असे शिक्षक संघटनाचे मत आहे.
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार राज्यात सुमारे १७ हजार शाळा अशा आहेत, ज्यांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. नियमानुसार या शाळांना एक नियमित शिक्षक आणि एक कंत्राटी शिक्षक दिला जातो. मात्र, यूडायस प्रणालीमध्ये कंत्राटी शिक्षकांची नोंद ग्राह्य धरली जात नसल्याने या सर्व शाळा 'एकशिक्षकी' म्हणून रेकॉर्डवर आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
"कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये आम्ही एक नियमित आणि एक कंत्राटी शिक्षक दिला आहे. मात्र, यूडायस प्रणालीमध्ये कंत्राटी शिक्षकांची नोंद ग्राह्य धरली जात नसल्याने हा फरक दिसत आहे. असे असले तरी, आगामी मोठ्या शिक्षक भरती प्रक्रियेच्या माध्यमातून या सर्व शाळांना पूर्णवेळ आणि आवश्यक शिक्षक उपलब्ध करून दिले जातील. शाळांमध्ये भौतिक सोयीसुविधा पुरवण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षक संचालक यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.