Shrikant Shinde Ashok Chavan Pratap Chikhalikar .jpg Sarkarnama
मराठवाडा

Shivsena-NCP News: भाजपच्या अशोक चव्हाणांना धक्का देण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादीत 'सेटिंग'? नांदेडमध्ये चिखलीकर-श्रीकांत शिंदे यांच्यात 'गुप्त' बैठक

Nanded MLC Election: विधान परिषदेसाठी अशोक चव्हाण हे आपले कट्टर समर्थक अमरनाथ राजूकर यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. यावरून भाजपातील निष्ठावंतांमध्ये मोठी नाराजी आहे. ही नाराजी आपल्या बाजूने वळवून अशोक चव्हाण यांना शह देण्याचा प्रयत्न चिखलीकर-शिंदे यांच्या गुप्त बैठकीतून सुरू असल्याचे बोलले जाते.

Jagdish Pansare

Nanded News: नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपाला पर्यायाने अशोक चव्हाण यांना रोखण्यासाठी महायुतीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या सेटिंग झाल्याची जोरदार चर्चा आहे. खासदार श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात मध्यरात्री गुप्त बैठक झाल्याने जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

प्रताप पाटील चिखलीकर यांचे चिरंजीव प्रवीण चिखलीकर यांनी या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस देखील या जागेसाठी आग्रही असल्याचे चिखलीकर यांनी स्पष्ट केले. श्रीकांत शिंदे हे महायुतीतील शिवसेनेचे नेते आहेत. लोकसभेत आम्ही सोबत होतो, त्यामुळे माझी आणि त्यांची भेट झाली त्यात काही गैर नाही. जिल्ह्यात ते आल्यामुळे त्यांचे स्वागत करणे, त्यांना भेटणे हे माझे कर्तव्य आहे.

दोन नेते जेव्हा भेटतात तेव्हा त्यांच्यात राजकीय चर्चा होतेच, तशी आमच्यातही झाली, अशी कबुलीही प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली. नांदेडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. आमच्या नेत्या आणि महायुतीच्या राज्यातील प्रमुख नेत्यांकडे तसा प्रस्तावही दिला आहे. शेवटी नेते जो निर्णय घेतील त्याचे पालन आम्ही करू, असे चिखलीकर यांनी स्पष्ट केले.

नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यापासून महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादीची शक्ती क्षीण करण्याचा सातत्याने त्यांचा प्रयत्न सुरू आहे. महापालिकेत या दोन्ही मित्रांना दूर ठेवत भाजपाने स्वबळावर निवडणूक लढवत बहुमतासह सत्ता ताब्यात घेतली. चव्हाण यांनीच शिंदेसेनेमध्ये वादाची ठिणगी टाकल्याचा आरोपही केला जातो.

शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी अशोक चव्हाण यांना मदत होईल अशी भूमिका घेतल्याने हेमंत पाटील, आनंद बोंढारकर, बाबुराव कदम या शिवसेनेच्या आमदारांची नाराजी कल्याणकर यांना ओढावून घ्यावी लागली होती.

तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण यांच्यातील राजकीय संघर्ष नांदेड जिल्ह्याला नवा नाही. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने महापालिका निवडणुकीतील उट्टे काढण्याची चालून आलेली संधी हेरण्याचा चिखलीकर यांचा प्रयत्न आहे.

भाजप मोठा भाऊ..

नांदेड जिल्ह्यात नगरपालिका, नगरपंचायत आणि महापालिका निवडणुकीतही भाजपाच मोठा भाऊ ठरला आहे. काँग्रेसमध्ये असताना जशी अशोक चव्हाणांनी जिल्ह्यावर एकहाती पकड होती, तशीच ती भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतरही आहे.

विधान परिषदेसाठी अशोक चव्हाण हे आपले कट्टर समर्थक अमरनाथ राजूकर यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. यावरून भाजपातील निष्ठावंतांमध्ये मोठी नाराजी आहे. ही नाराजी आपल्या बाजूने वळवून अशोक चव्हाण यांना शह देण्याचा प्रयत्न चिखलीकर-शिंदे यांच्या गुप्त बैठकीतून सुरू असल्याचे बोलले जाते.

नांदेड जिल्ह्यातील पक्षीय बलाबलाचा विचार केला तर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या 446 इतकी आहे. विजयासाठी 224 मतांची आवश्यकता आहे. महायुतीकडे 243 म्हणजे त्यांचा उमेदवार सहज निवडून येईल इतके संख्याबळ आहे. यात सर्वाधिक 138 मतदार भाजपाकडे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस 82 तर शिवसेनेकडे 23 मतदार आहेत.

तर महाविकास आघाडीचे संख्याबळ 124 इतके मर्यादित आहे. यात सर्वाधिक 92 मतदार काँग्रेसकडे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे 19, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे 13 व इतर पक्ष आणि अपक्ष 40 असे संख्याबळ आहे. एमआयएम-20, वंचित बहुजन आघाडी 06, अपक्ष व इतर14 अशी स्थिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT