Pratap Patil - Chikhlikar, Ashok Chavan Sarkarnama
मराठवाडा

Nanded Loksabha : अशोक चव्हाण नांदेडमध्ये चिखलीकरांशी दोन हात करण्याच्या तयारीत...!

Laxmikant Mule

Nanded Loksabha : भाजपचा पराभव करायचा असेल तर नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्याशिवाय पर्याय नाही. 2014 मध्ये मोदीलाट असतानाही अशोक चव्हाण यांनी भाजपला पराभूत करण्याचा भीमपराक्रम केला होता. त्यानंतर 2019 मध्येही ते विजयाची पुनरावृत्ती घडवू शकले असते, पण वंचित - एमआयएम आघाडीमुळे मतांमध्ये झालेली फाटाफूट भाजपच्या कामाला आली.

गेल्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी 2024 च्यानिमित्ताने आली आहे. महाविकास आघाडीकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण विद्यमान भाजप खासदार प्रताप पाटील - चिखलीकर यांच्याविरोधात दोन हात करण्याच्या तयारीत आहेत. खरं तर चव्हाण यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नाही. परंतु दुर्दैवाने लोकसभेला अपयश आलेच तर विधानसभेचा पर्याय खुला ठेवत चव्हाण लोकसभेच्या आखाड्यात उतरण्याची दाट शक्यता आहे.

लोकसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षाने 'मिशन 45'चे ध्येय डोळ्यासमोर ठेवून गेल्यावेळी जिंकलेल्या जागा कायम राखत नव्या मतदारसंघामध्ये विजयासाठी कंबर कसली आहे. त्या तुलनेत सुरुवातीला मागे पडलेल्या काँग्रेसनेही तालुका, विधानसभा‌निहाय मेळावे, बैठका घेत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसला महाराष्ट्रातील हमखास यश देणाऱ्या मतदारसंघांमध्ये नांदेडचा समावेश होतो. या मतदारसंघातून अशोक चव्हाण दोन वेळा निवडून आले आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांचा चिखलीकरांनी पराभव केला होता. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील व राज्यातील राजकारणात खूप मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. नांदेडमध्ये कमबॅक करण्याच्या दृष्टीने काँग्रेसने आयोजिलेल्या बैठक, मेळाव्यात चिखलीकरांवर जोरदार टीका, आरोप करण्यात येत असून एकेरी शब्दांचा उल्लेखही केला जात आहे.

अयोध्येत पार पडलेल्या श्रीराममूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्यानिमित्ताने चव्हाणांनी नांदेड शहर व ग्रामीण भागात बॅनरबाजी करीत भाजपच्याविरोधात दंड थोपटल्याचे दिसून आले आहे. खासदार प्रतापराव चिखलीकर हे भाजपचे उमेदवार राहतील, हे गृहीत धरून काँग्रेसचे पदाधिकारी त्यांना टार्गेट करीत आहेत. चिखलीकरांनी मतदारसंघात कोणती विकासकामे केली, कोणते नवीन प्रकल्प आणले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी संसदेत आवाज उठवला का ? याबाबत जाब विचारत त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

नांदेडची जागा पुन्हा जिंकणे हे काँग्रेससाठी एक आव्हान असणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रत्येक तयारीकडे अशोक चव्हाणांनी लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. चव्हाणांच्या उमेदवारीचे संकेत मिळाल्यामुळेच कदाचित जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले असावेत, असेही बोलले जाते.

(Edited by Amol Sutar)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT