Shiv Sena (UBT) leader Ambadas Danve Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve News : नितेश राणे, महेश लांडगे आता कुठे गेले? अशोक खरातने अत्याचार केलेल्या महिला हिंदू भगिनी नाहीत का? अंबादास दानवेंनी सुनावले!

Political News : अशोक खरात याचे कारनामे आणि त्यात गुंतलेल्यांची नावे जसजशी समोर येत आहे, तशी नाचक्की होऊ लागली आहे.

Jagdish Pansare

Shivsena UBT News : पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धा, बुवाबाजी फोफावली आहे. उच्चशिक्षितांपासून राज्यातील उच्च पदावर बसलेले नेते, मंत्री, लोकप्रतिनिधीच अशा बुवाबाजी आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालू लागले तर मग अपेक्षा तरी कोणाकडून करायची? ज्यांनी या सगळ्याला कायद्याने आळा घालायला हवा, तेच लोक खरात सारख्या भोंदू बाबाच्या चरणी लोळण घालत असतील तर मग याला पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं का? असा सूर सध्या राज्यभरातून निघत आहे.

अशोक खरात याचे कारनामे आणि त्यात गुंतलेल्यांची नावे जसजशी समोर येत आहे, तशी नाचक्की होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राजकीय नेते आणि समाजधुरिणांना आवाहन करणारे खरमरीत पत्र लिहले आहे.

महाराष्ट्र हे देशातील एक अत्यंत पुरोगामी, विचारी आणि स्वाभिमानी प्रवृत्ती जपणारं राज्य आहे. स्वातंत्र्योत्तर काळात आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या उत्तुंग नेतृत्वाने या मातीला विचारांचे खतपाणी घातले. या महान नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात कधीही अंधभक्तीला, बुवाबाजीला किंवा ढोंगीपणाला थारा दिला नाही. उलट, त्यांनी सामान्यांमध्ये तार्किक विचार आणि प्रखर वैज्ञानिक दृष्टिकोनाची पेरणी केली.

आज मात्र राज्याची सद्यस्थिती आणि विशेषतः नाशिकमधील कॅप्टन अशोक खरात यांसारखी प्रकरणे पाहिल्यावर मनात दाटून येणारा प्रश्न हाच आहे की, हा खरोखर तोच महाराष्ट्र आहे का? जिथे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेबांसारखा अंधश्रद्धा मुळापासून उपटून टाकणारा आणि थोतांडावर आसूड ओढणारा क्रांतीकारी नेता जन्माला आला, त्याच नेत्याचे भक्त म्हणवणारे आज सत्ता आणि स्वार्थासाठी खरात सारख्या भोंदू प्रवृत्तींची संगत आवडीने पसंत करत आहेत?

ज्या प्रवृत्तींवर शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर प्रहार केले, आज त्याच प्रवृत्तींच्या मांडीला मांडी लावून माननीय बाळासाहेबांचा वारसा सांगणारे बसलेले पाहून मनात या ढोंगीपणाची चीड उत्पन्न होते. नाशिकमधील या तथाकथित 'कॅप्टन'ने ज्या प्रकारे जनता, बायकांची फसवणूक केली आणि त्याला ज्या पद्धतीचे राजकीय अभय मिळत गेले, ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारे आहे.

भाजपचे (BJP) सो कॉल्ड मोर्चा फेम नितेश राणे, महेश लांडगे यांसारखे नेते जे दरवेळी हिंदुत्वाचा आव आणून गळे काढत असतात, त्यांना आज माझा एक सवाल आहे, आता तुमचे 'आक्रोश मोर्चे' कुठे गेले? अशोक खरातच्या या भोंदूपणामुळे ज्या शेकडो महिलांची फसवणूक झाली, ज्यांना मानसिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागले, त्या पीडित महिलाही हिंदूच आहेत ना? मग आज तुमचा हिंदुत्वाचा कैवार कुठे हरवला आहे?

राजकीय सोयीसाठी हिंदुत्वाचा वापर करणाऱ्यांना या भगिनींचे अश्रू का दिसत नाहीत? माझ्या आईने मला नेहमीच एक गोष्ट शिकवली आहे, ती म्हणजे स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवणे. ते मी पाळतो आणि पाळत राहणार. महाराष्ट्र हा कायम देशाला राजकारण आणि समाजकारणात दिशा देणारा अग्रगण्य प्रांत ठरला आहे. राजकारणाची झालेली अभूतपूर्व वाताहत अख्ख्या देशाने पाहिलीच आहे, पण आता समाजकारणातही आपण अशा प्रवृत्तींना थारा देऊन अधोगतीचा धडा गिरवायचा का? हे एकदा स्वतःच्या सद्सदबुद्धीला नक्की विचारून पहा, असा टोलाही दानवे यांनी या पत्रातून लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT