छत्रपती संभाजीनगर : विधानसभेच्या पूर्व मतदार संघात क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या अटीतटीच्या लढतीत भाजप महायुतीचे उमेदवार मंत्री अतुल सावे यांनी एमआयएमच्या इम्तियाज जलील यांचा 1777 मतांच्या फरकाने पराभव केला. सुरुवातीच्या 15 फेऱ्यापर्यंत इम्तियाज जलील यांनी अतुल सावे यांच्यावर 55 हजारांवर आघाडी घेत महायुतीला घाम फोडला होता. मात्र त्यानंतरच्या फेऱ्यांमध्ये अतुल सावे यांनी हे मताधिक्य घटवून 1777 मतांनी विजय मिळवला. अतुल सावे यांना 92471 तर इम्तियाज जलील यांना 90694 मते मिळाली.
मतमोजणी दरम्यान केंद्रा बाहेर जमलेल्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी निकाल जाहीर होण्यापूर्वीच विजयाचा जल्लोष सुरू करत गोंधळ घातल्याने पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. त्यामुळे या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (Atul Save) पूर्व विधानसभा मतदारसंघात अतुल सावे आणि इम्तियाज जलील यांच्यात थेट लढत झाली. समाजवादी पक्षाचे गफार कादरी, वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान आणि त्यांच्याशिवाय बारा मुस्लिम उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामुळे अतुल सावे यांना ही निवडणूक सोपी जाईल, असे म्हटले जात होते.
परंतु कादरी आणि अफसर खान हे फार प्रभाव दाखवू शकले नाही. त्यामुळे मुस्लिम मते एकगठ्ठा इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्या पारड्यात पडली. पहिल्या फेरीपासूनच इम्तियाज जलील यांनी अतुल सावे यांच्यावर घेतलेली आघाडी 21 व्या फेरीपर्यंत कायम होती. त्यानंतर मात्र अतुल सावे यांनी अचानकपणे पुढील सर्व फेऱ्यांमध्ये आघाडी घेत इम्तियाज जलील यांची लीड तोडत शेवटच्या फेरीत अवघ्या 2200 मतांनी विजय मिळवला. या सोबतच अतुल सावे यांची या मतदारसंघात हॅट्रिक झाली असून भाजपने पूर्वचा गड राखला आहे. इम्तियाज जलील यांनी मात्र शेवटपर्यंत जोरदार टक्कर देत भाजपच्या उरात धडकी भरवली होती.
औरंगाबाद पूर्व या विद्यमान मंत्री अतुल सावे यांच्या मतदारसंघात 60.63% मतदानाची नोंद झाली. सावे हे गेल्या दोन टर्म पासून पूर्व मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. शिवसेना- भाजप युतीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री आणि महायुतीच्या सरकारमध्ये कॅबिनेट पदी बढती मिळालेल्या अतुल सावे यांना यावेळी विजयाची हॅट्रीक साधली. एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी त्यांना अखेरपर्यंत कडवी झुंज दिली. महायुतीविरुद्ध एमआयएम अशी थेट टक्कर असलेल्या पूर्व मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीने ऐनवेळी उमेदवार बदलत मुस्लिम मतांमध्ये फूट पाडण्याच्या उद्देशाने अफसर खान यांना उमेदवारी दिली.
याशिवाय एमआयएम मधून बाहेर पडलेले डॉ. गफार कादरी यांनी समाजवादी पक्षाचे उमेदवारी मिळत एमआयएम ला आव्हान दिले. परंतु मुस्लिम मतदारांनी ही फूट टाळत या दोघांना दूर ठेवत इम्तियाज यांच्या पारड्यात एकगठ्ठा मते टाकली. परिणामी अतुल सावे यांना विजयासाठी शेवटच्या फेरीपर्यंत झगडावे लागले. मतदारसंघातील मराठा मतदारांची भूमिका या निवडणुकीत महत्वाची ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. काही प्रमाणात ही मते इम्तियाज जलील यांच्याकडे गेल्याचे प्रथमदर्शनी दिसते. तर अतुल सावे यांच्याकडे ही मते सर्वाधिक वळाल्याचे दिसते.
काँग्रेस महाविकास आघाडीने आधी एम. के. देशमुख यांच्या रूपाने मराठा उमेदवार देत पूर्व मध्ये चुरस निर्माण केली होती. मात्र त्यानंतर अचानक देशमुख यांनी माघार घेतली आणि लहू शेवाळे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. काँग्रेसने तडकाफडकी हा बदल का केला? याबद्दल मतदारसंघांमध्ये चर्चा होती. तर दुसरीकडे इम्तियाज जलील यांनी निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरंगे पाटील यांची अंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतली होती. याशिवाय मराठा आरक्षणाच्या त्यांच्या मागणीला एमआयएम चा पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते.
निवडणूक प्रचारदरम्यान मनोज जरांगे यांच्या पाठिंबाच्या अटीनुसार शपथपत्र लिहून देत निवडून आल्यानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आवाज उठवण्याची हमी इम्तियाज जलील यांनी दिली होती. त्याचा काहगी प्रमाणात त्यांना फायदा झाल्याचे दिसते. दुसरीकडे अतुल सावे यांची मदार भाजपचा बेस असलेला ओबीसी मतदारांवर होता. या शिवाय लाडकी बहीण योजनेसाठी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर केलेली नोंदणी आणि त्यांना मिळवून दिलेला लाभच अतुल सावे यांना वाचवणारा ठरला.
सावे यांना विजयासाठी मराठा मतदारांचीही मदत आवश्यक होती, ती त्यांना झाल्याचे बोलले जाते. महाविकास आघाडीचे लहू शेवाळे यांचे या निवडणुकीत डिपाॅझीट जप्त झाले आहे. समाजवादी पक्षाचे कादरी, वंचितचे अफसर खान यांनाही आपले डिपाॅझीट वाचवता आलेले नाही. महायुतीच्या विरोधात राज्यभरात महाविकास आघाडी हा प्रमुख पक्ष असताना पूर्व मध्ये मात्र महाविकास आघाडीचे अस्तित्व जाणवले नाही. याउलट एमआयएम विरुद्ध महायुती अशीच काॅटे की टक्कर झाली. क्षणाक्षणाला हदयाचे ठोके वाढवणाऱ्या या लढती शेवटच्या फेरीत अतुल सावे यांनी विजय मिळवला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.