Walmik Karad, Bajrang Sonwane Sarkarnama
मराठवाडा

Walmik Karad : वाल्मिक कराडवर 12 हायटेक कॅमेऱ्यांची नजर; बजरंग सोनवणेंचा दावा कारागृह प्रशासनाने छाती ठोकून फेटाळला!

Beed jail administration rejects Bajrang Sonawane allegations News : खासदार बजरंग सोनवणे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले. वाल्मीक कराड याने कारागृहातून बाहेर फोन केल्याचा दावा खोटा असल्याचे कारागृह अधीक्षक रामराव चांदणे यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामा ब्युरो

नितीन चव्हाण

Beed Politics : मला व माझ्या मुलाला अडकवण्यासाठी वाल्मीक कराडने बीड कारागृहातून कट रचला होता. जेलमधून फोन करत त्याने माझ्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करा, असे सांगितल्याची फोन काॅल रेकाॅर्डिंग माध्यमांसमोर व्हायरल करत बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी खळबळ उडवून दिली होती.

या संपूर्ण प्रकरणात खासदार म्हणून आपण बीड जिल्हा कारागृह प्रशासन, अधीक्षक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत असल्याचेही सोनवणे यांनी सांगितले होते. यावर आता बीड कारागृह प्रशासनाने खुलासा केला असून खासदार बजरंग सोनवणे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले. वाल्मीक कराड याने कारागृहातून बाहेर फोन केल्याचा दावा खोटा असल्याचे कारागृह अधीक्षक रामराव चांदणे यांनी स्पष्ट केले आहे.

विलास घुले संशयास्पद मृत्यू प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाला अडकवण्यासाठी बीडच्या जिल्हा कारागृहातून कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी गुरुवारी केज येथे पत्रकार परिषद घेऊन केला होता. या कटासाठी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याने कारागृहातून भ्रमणध्वनीचा वापर केल्याचा दावा त्यांनी केला होता.

एवढेच नाही तर बीड कारागृहात वाल्मीक कराड याच्या बराकीत सीसीटीव्ही कॅमेरा नाही, तो ३२ सीम कार्ड आणि २२ फोन वापरत असल्याचा दावाही बजरंग सोनवणे यांनी केला होता. कारागृहातील काही पोलीस कर्मचाऱ्यांना वाल्मीकने आयफोन दिल्याचाही आरोप सोनवणे यांनी केला होता. यावरून जिल्ह्यात खळबळ उडाली होती. मात्र, हे सर्व आरोप बीड कारागृह प्रशासनाने पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.

यापूर्वी झालेल्या दोन उच्चस्तरीय चौकशीतही प्रशासनाची कोणतीही चूक आढळली नव्हती, असा दावा करत प्रशासनाने आपली बाजू मांडली आहे. कारागृह अधीक्षक रामराव चांदणे यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण देताना सांगितले की, नियमानुसार प्रत्येक कैद्याला दर आठवड्याला तीन वेळा, १० मिनिटांसाठी तीन नोंदणीकृत नातेवाईकांशी बोलण्याची मुभा असते. या सुविधेला कारागृहाच्या भाषेत 'ॲलन कॉल' म्हटले जाते.

कैदी कोणत्या तीन नातेवाईकांशी बोलणार, हे स्थानिक पोलिसांकडून रीतसर प्रमाणित केले जाते. कैद्याला फोन दिल्यावर स्क्रीनवर केवळ तेच तीन क्रमांक दिसतात. चौथा क्रमांक डायल करताच येत नाही. या यंत्रणेत दोन व्हिडिओ कॉलची मुभा असते. अथवा एक व्हिडिओ कॉल कमी करून प्रत्यक्ष भेटीची वेळ घेता येते. या जुन्या यंत्रणेत एक तांत्रिक दोष होता.

कारागृहातून कोणताही कट नाही..

कैद्याने घरच्यांना फोन लावल्यानंतर तिकडून नातेवाईकांनी दुसऱ्या कोणाला कॉन्फरन्सवर घेतले, तर त्यावर कारागृह प्रशासनाचे नियंत्रण राहत नव्हते. आता गेल्या चार महिन्यापासून नव्या तंत्रज्ञानात ही कॉन्फरन्सिंगची सोय पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. बीड जिल्हा कारागृहात सुरक्षेसाठी तब्बल २०६ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत.

यातील 12 हाय-टेक कॅमेरे हे एकट्या वाल्मीक कराड याच्या कोठडीसमोर तैनात करण्यात आले आहेत. एका कोठडीत 50 ते 55 कैदी एकत्र राहतात. अशा स्थितीत कोणी चोरून मोबाईल वापरत असेल, तर इतर कैद्यांनी नक्कीच गदारोळ केला असतो. त्यामुळे कारागृहातून कोणताही कट शिजला नाही आणि मोबाईलचा वापर झाला नाही, असा ठाम दावा प्रशासनाने केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT