Balasaheb Thackeray Sarkarnama
मराठवाडा

Bal Thackeray Birth Anniversary : भाजपने मनापासून बाळासाहेब ठाकरेंना स्वीकारले?

Jagdish Pansare

Political News : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. राज्यात शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून स्वतंत्रपणे ही जयंती साजरी केली जात आहे. दीड वर्षापूर्वी भाजपने अख्खी शिवसेना फोडली आणि बाळासाहेबांचे हिंदूत्वाचे विचार जपण्यासाठी आम्ही उठाव केला म्हणणारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार आज सत्तेत बसले आहेत.

शिवसेना-भाजपची नैसर्गीक युती 25 वर्षे राज्याच्या राजकारणात होती. बाळासाहेब ठाकरे हयात असताना भाजपचे राज्यातील गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांनी लालकृष्ण अडवाणी, माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी या दिल्लीतील नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ती जपली. अनेक वादाचे आणि युती तुटते की काय? असे प्रसंग निर्माण झाले, पण बाळासाहेबांचा शब्द अंतिम प्रमाण मानणाऱ्या मुंडे-महाजन जोडीने ती तुटू दिली नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर सत्तासंघर्षाच्या स्पर्धेत 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पंचवीस वर्षे जपलेली युती तुटली. युती तुटली आणि दोन्ही पक्षातील नेत्यांची मनंही तुटली. उद्धव ठाकरे यांच्या पंचवीस वर्षे युतीत सडलो या पश्चात्तापानंतर तर युतीला असा तडा गेला, की 2019 मध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकी एकत्रित लढल्यानंतर बहुमताची सत्ता हाती आल्यानंतरही वेगळा प्रयोग झाला.

उद्धव ठाकरे यांनी थेट काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करीत राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग करत अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद उपभोगले. ठाकरेंनी केलेला हा घाव भाजपच्या जिव्हारी असा काही लागला, की त्यांनी शिवसेना नेस्तनाबूत करण्याचा विडाच उचलला. अगदी अडीच वर्षांतच त्यांनी शिवसेनेत एवढे मोठे बंड घडवून आणले, की शिवसेना नाव, धनुष्यबाण हे चिन्ह ही उद्धव ठाकरे यांच्याकडे शिल्लक ठेवले नाही. आता याचा हिशेब येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील मतदार करणार आहे. त्यानंतर कोण योग्य कोण अयोग्य हे स्पष्ट होईल.

दुसरीकडे बाळासाहेबांचे विचार, हिंदूत्व जपण्यासाठी उठाव केल्याचे सांगत भाजपच्या सत्तेत मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेही आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना थकत नाहीत. बाळासाहेबांचे स्वप्न मोदीसाहेब पूर्ण करीत असल्याचे शिंदे जाहीर कार्यक्रमांमधून सांगत आहेत. आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपला महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरही मते मिळवायची आहेत. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे पाहिजे, पण त्यांचा मुलगा नको, अशा भूमिकेत सध्या भाजप आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यामुळे भाजपने त्यांचे दैवत बाळासाहेब ठाकरेही स्वीकारले आहेत. आता ते मनापासून स्वीकारलेत की राजकीय सोय म्हणून हे लोकसभा निवडणुकीनंतरच सिद्ध होईल. आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त भाजपच्या राज्यातील बड्या नेत्यांनी त्यांना अभिवादन करीत आपल्या भावना सोशल मीडियातून व्यक्त केल्या आहेत.

इकडे मराठवाड्यातही भाजपच्या नेत्यांनी आवर्जून बाळासाहेबांच्या जंयतीनिमित्त त्यांची आठवण ठेवल्याचे दिसून येते. सोशल मीडिया मग ते फेसबुक असो की एक्स या सगळ्या प्लॅटफाॅर्मवर केंद्र आणि राज्यातील मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधींना बाळासाहेबांबद्दल आदरभाव दाखवला आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, आमदार संभाजी पाटील-निलंगेकर, अभिमन्यू पवार, राणाजगजितसिंह पाटील आदींनी बाळासाहेबांना अभिवादन केले आहे.

महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांनीही बाळासाहेबांची आठवण ठेवल्याचे दिसून आले. काँग्रेस नेते अशोक चव्हाण, अमित देशमुख, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांनीही आवर्जून बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादनपर संदेश पोस्ट केले आहेत.

(Edited By : Ganesh Thombare)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT