Balasaheb Thackeray Birth Anniversary : ‘ती’ निवडणूक जिंकताच बाळासाहेबांनी कौतुक केले अन्‌ माँसाहेबांनी जेवायला तीन हजार दिले

Ambegaon News : आम्ही जनता दलासोबतच्या युतीचा प्रस्ताव मांडताच बाळासाहेब एकदम भडकले. त्यांनी युतीस स्पष्टपणे नकार दिला.
Balasaheb Thackeray-Rajaram Bankhele
Balasaheb Thackeray-Rajaram BankheleSarkarnama

Pune News : आंबेगाव तालुक्यातून रमेशनाना गाडे हे १९९२ मध्ये पुणे जिल्हा परिषदेवर निवडून आले होते. पुणे जिल्ह्यातून पहिलाच जिल्हा परिषदेवर निवडून आल्यामुळे आम्ही टेंपो भरून शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मातोश्रीवर गेलो होतो. बाळासाहेबांनी गाडेंना आशीर्वाद देत माझे कौतुक केले. बाळासाहेबांच्या भेटीनंतर आम्ही परत निघताना माँसाहेबांनी मला बोलावून घेतले. या शिवसैनिकांची जेवण्याची काय सोय केली, अशी विचारणा केली. त्यावेळी ‘रस्त्यावर कुठेतरी जेवू,’ असे सांगताच त्यांनी तीन हजार रुपये आम्हाला जेवायला दिले. माँसाहेब (मीनाताई ठाकरे) अशा आईच्या आपुलकीने शिवसैनिकांशी वागायच्या, अशी आठवण शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा संघटक राजाराम बाणखेले यांनी सांगितली. (Balasaheb Thackeray appreciated and Maasaheb gave three thousand rupees for food)

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राजाराम बाणखेले यांनी ‘सरकारनामा’शी संवाद साधत आपल्या आठवणींना उजाळा दिला. बाणखेले म्हणाले, ते दिवस भारावलेले होते. आम्ही तरुण त्यावेळी बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित झालो होतो. त्यातून आम्ही पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शिवसेनेची पहिली शाखा १० जून १९८४ रोजी मंचरमध्ये काढली. साबीरभाई शेख, नंदू घाटे हे त्यावेळी जिल्हाप्रमुख होते. त्यावेळी जिल्ह्यात १४४ कलम लागू होते, त्यामुळे शाखा उद्‌घाटनाचा कार्यक्रम आम्ही एका मंदिरात घेतला होता.

पुढे १९८५ मध्ये विधानसभेची निवडणूक लागली. शिवसेनेकडून मार्तंड राक्षे हे उमेदवार होते. विशेष म्हणजे त्यावेळीही पेटती मशाल हेच शिवसेनेचे चिन्ह होते. राक्षे यांच्या प्रचारासाठी खुद्द बाळासाहेबांनी मंचरला सभा घेतली होती. टोलेजंग सभा झाल्याने बाळासाहेब खुश होते. त्यांनी मला जवळ बोलावून घेऊन माझी पाठ थोपटली. आपले सीट निवडून येवो अथवा न येवो शिवसेनेचे काम करीत राहा, असा सल्ला त्यांनी आम्हाला दिला होता, असेही राजाराम बाणखेले यांनी स्पष्ट केले.

बाणखेले म्हणाले, घोडेगावचे सरपंच नाना गाडे यांनी १९८९ मध्ये शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या पक्षप्रवेशासाठी आमच्या आग्रहाखातर बाळासाहेब मंचरमध्ये आले होते. त्यावेळी मी मंचर शहरप्रमुख होतो. त्यानंतर १९९२ मध्ये पुणे जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक लागली होती. आम्ही बाळासाहेबांकडे शिवसेना आणि जनता दलाच्या युतीचा प्रस्ताव घेऊन गेलो होतो. जनता दलाच्या झेंड्याचा रंग हिरवा होता. आम्ही जनता दलासोबतच्या युतीचा प्रस्ताव मांडताच बाळासाहेब एकदम भडकले. त्यांनी युतीस स्पष्टपणे नकार दिला. हिरव्या फडक्याबरोबर युती करता काय? स्वतंत्र निवडणूक लढवायला घाबरता काय? असे म्हणत युती करायची नाही, असे स्पष्टपणे सांगितले.

बाळासाहेबांचा नकार ऐकून आम्ही एकदम शांत झालो. पण तत्कालीन संपर्कप्रमुख राम भंकाळ यांनी बाळासाहेबांची समजूत घातली. जिंकण्यासाठी युती करणे किती गरजेचे आहे, हे त्यांनी पटवून दिले. त्यानंतर कुठे बाळासाहेब जनता दलासोबत युती करण्यास तयार झाले. युतीनंतर शिवसैनिकांनी झोकून देऊन काम केले आणि रमेशनाना गाडे हे पुणे जिल्हा परिषदेवर निवडून येणारे शिवसेनेचे पहिले सदस्य ठरले. त्यामुळे आमचा विश्वास वाढला होता, असे बाणखेले यांनी स्पष्ट केले.

निवडणुकीतील विजयानंतर आम्ही गाडे यांना घेऊन बाळासाहेबांच्या आशीर्वादासाठी मातोश्री गाठली. एक टेंपोभरून शिवसैनिक आम्ही मुंबईला गेलो होतो. मातोश्रीवर बाळासाहेबांनी माझे कौतुक करीत पुन्हा शाबासकीची थाप दिली. त्यामुळे आमचा उत्साह दुणावला होता. बाळासाहेबांच्या भेटीनंतर आम्ही परत येत असतानाच माँसाहेबांनी मला परत बोलावून घेतलं आणि या लोकांची जेवणाची काय सोय केली, अशी विचारणा केली. त्यावेळी ‘कुठेतरी रस्त्यावर जेवण करू,’ असे मी सांगताच माँसाहेबांनी तीन हजार रुपये आम्हाला जेवायला दिले आणि या सर्वांना चांगले जेवण घाला, असे बजावले. अशा पद्धतीने माँसाहेब शिवसैनिकांवर पुत्रवत प्रेम करायच्या, अशी आठवण बाणखेले यांनी नमूद केली.

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com