Nanded Politics : माजी मंत्री भास्कर पाटील खतगावकर हे सुनबाई मीनल खतगावकर आणि आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले. तीनवेळा आमदार, तीनवेळा खासदार आणि राज्यात मंत्री राहिलेल्या भास्कर पाटील खतगावकर यांचा नांदेड जिल्ह्यात चांगला प्रभाव आहे. वाढत्या वयामुळे ते राजकारणात सक्रिय नसले तरी सुनबाई मीनल खतगावकर यांनी आपला राजकीय वारसा पुढे चालवावा, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. भाजपा खासदार अशोक चव्हाण यांचे मेहुणे असलेल्या खतगावकर आणि चव्हाण यांच्यात फारसे सख्ख्य कधीच नव्हते हे संपूर्ण जिल्ह्याला ज्ञात आहे.
तरीही अशोक चव्हाण (Ashok Chavan) काँग्रेसमध्ये असताना त्यांनी खतगावकर यांची मनधरणी करून त्यांना भाजपमधून पक्षात परत आणले होते. कालांतराने अशोक चव्हाण यांनीच मोठा राजकीय निर्णय घेत लोकसभा निवडणुकीआधी भाजपात प्रवेश केला. चव्हाण यांच्या या धक्कादायक निर्णयानंतर मेहुणे भास्कर पाटील खतगावकर काय करतात? याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले होते. मात्र अशोक चव्हाण यांच्या सोबतच आपण जाणार असल्याचे सांगत खतगावकरांनी पुन्हा भाजपात प्रवेश केला. मात्र नांदेड लोकसभा मतदारसंघातून मीनल पाटील खतगावकर यांना उमेदवारी मिळवून देण्यात चव्हाण- खतगावकर या जोडीला अपयश आले.
पुनर्वसन कधी होणार?
भाजपामध्ये प्रवेश केलेल्या अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर खासदारकी देत पक्षाने त्यांचे पुनर्वसन केले. (NCP) शिवाय 2024 च्या विधानसभा निवडणुकीत श्रीजया चव्हाण यांना उमेदवारीचा शब्दही दिला. अशोक चव्हाण आणि त्यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांचे भाजपमध्ये पुनर्वसन होत असताना खतगावकर आणि त्यांच्या स्नूषा मीनल खतगावकर यांना मात्र वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती होती. यातून भास्कर पाटील खतगावकर यांच्या मनात खतखद होती. अशोक चव्हाण भाजपमध्ये आपले पुनर्वसन करू शकत नाही याचा अंदाज आल्यानंतर विधानसभा निवडणुकीआधी खतगावकर यांनी मीनल खतगावकर यांच्यासाठी नायगाव बाजार विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीचा शब्द मिळवत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
पक्षानेही दिलेला शब्द पाळत मीनल खतगावकर यांना उमेदवारी दिली. मात्र लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर ताकही फुंकून पिणाऱ्या महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीआधी लाडकी बहीण योजना आणत डॅमेज कंट्रोल केले. यात महाविकास आघाडीचा पालापाचोळा उडाला. नायगाव मधून 80 हजार मते मिळवलेल्या मीनल खतगावकर यांचाही पराभव झाला. दुसरीकडे अशोक चव्हाण यांनी मात्र भोकर विधानसभा मतदारसंघातून कन्या श्रीजया चव्हाण यांना निवडून आणत आपला राजकीय वारसदार ठरवून टाकला. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश करूनही हाताला यश न लागल्याने बेचैन असलेल्या भास्कर पाटील खतगावकर यांनी पुन्हा नव्या राजकीय पक्षाचा शोध सुरू केला.
सत्ताधारी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पर्याय त्यांच्यासमोर होते. दरम्यान अशोक चव्हाण यांनी मेहुणे खतगावकर यांना काँग्रेस पक्ष सोडू नका, असा सल्ला विधानसभा निवडणुकी आधीच दिला होता. मात्र तो धुडकावत आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची त्यांनी वाट धरली आहे. नांदेडमध्ये काल झालेल्या भव्य दिव्य अशा प्रवेश सोहळ्यात भास्कर पाटील खतगावकर यांनी केलेल्या भाषणाचीही बरीच चर्चा होत आहे.
राजकारणात आपण शंकरराव चव्हाण यांच्यामुळेच आलो, परंतु सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात मला मंत्री करण्याचा निर्णय शरद पवारांचा होता. दुसऱ्यांदा मंत्रीपदाची संधी आली तेव्हा माझ्याऐवजी अशोक चव्हाण यांना मंत्री करण्यात आले. तेव्हा मी शंकरराव चव्हाण यांना असं का केलं? असे विचारले तेव्हा त्यांनी हा निर्णय देखील शरद पवारांचाच होता असे सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. अशोक चव्हाण यांच्याबद्दल असलेली नाराजी खतगावकर यांनी जाहीरपणे बोलून दाखवली नसली तरी आपल्याला त्यांनी वाऱ्यावर सोडल्याची भावना त्यांच्या मनात असल्याचे बोलले जाते.
अजितदादा वादा पूर्ण करतील?
त्यामुळे यापुढे कुठलाही राजकीय निर्णय घेताना अशोक चव्हाण यांचा सल्ला घ्यायचा नाही, असे त्यांनी ठरवल्याचे त्यांचे समर्थक खासगीत सांगतात. भास्कर पाटील खतगावकर यांनी पक्षप्रवेश सोहळ्यात अजित पवार यांच्याकडे काही मागण्या केल्या. त्या सर्व मागण्यांचा उल्लेख करत अजित पवार यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला. एवढेच नाही तर मीनल खतगावकर यांना क्षमतेप्रमाणे संधी देण्याच्या विधानालाही दुजोरा देत मीनल खतगावकर या माझ्या मुलीसारख्या आहेत. राष्ट्रवादीत येणाऱ्या प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील, असा विश्वास देत अजित पवार यांनी नांदेड जिल्ह्यात संघटनेला बळकटी देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले.
भास्कर पाटील खतगावकर यांच्यासारखा मोठा नेता राष्ट्रवादीत आल्याने नांदेड जिल्ह्यात पक्षाची ताकद निश्चितच वाढणार याबाबत दावे केले जात आहेत. अशोक चव्हाण यांचे कट्टर विरोधक आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि त्यांच्या जोडीला आता खतगावकर आल्याने अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यातील आणि भाजपमधील अडचणीही वाढण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत एकीकडे भाजपाकडून अशोक चव्हाण तर राष्ट्रवादीत खतगावकर- चिखलीकर या जोडीची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.