Maharashtra Politics News : वर्षभरापूर्वी म्हणजेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या अगदी महिनाभर आधी भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण हे नरेंद्र मोदींचे निसिम भक्त झाले आहेत. देशात मोदींची गॅरंटी चालणार नाही असं काँग्रेसमध्ये असताना सांगणारे अशोक चव्हाण आता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश जगात किती झपाट्याने आर्थिक प्रगती करत आहे याची आकडेवारी मांडून त्यांचे कौतुक करताना थकत नाहीयेत.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2015 पासून आतापर्यंत देशाच्या जीडीपीमध्ये तब्बल 105 टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या दूरदर्शी व निर्णायक नेतृत्वाचे हे प्रतीक असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. जगातील 13 राष्ट्रांच्या आर्थिक प्रगतीची आकडेवारी देत अशोक चव्हाण यांनी सोशल मीडियावर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत भारताच्या प्रगतीचे गुणगान केले आहे.
अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची वर्षभरापुर्वी पर्यंतची संपूर्ण राजकीय कारकीर्द ही काँग्रेस पक्षात गेली. या पक्षाकडून ते अनेकदा मंत्री आणि दोनवेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिले होते. गांधी कुटुंबाच्या विश्वासातील नेत्यांपैकी एक अशी अशोक चव्हाण यांची ओळख होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत काढलेल्या भारत जोडो यात्रेत अशोक चव्हाण यांचा मोठा सहभाग आणि वाटा होता.
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महाविकास आघाडीच्या जागा वाटपापासून तर अनेक महत्त्वाच्या निर्णयामध्ये अशोक चव्हाण सहभागी होते. परंतु लोकसभा निवडणुकीच्या महिनाभर आधी त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीचा राज्यात दारूण पराभव झाला. नांदेडची जागाही भाजपने गमावली, मात्र त्याचा कुठलाही परिणाम अशोक चव्हाण यांच्या राज्यसभेवरील खासदारकीवर झाला नाही.
भाजपने त्यांचे राजकीय पुनर्वसन तर केलेच पण विधानसभा निवडणुकीत त्यांची कन्या श्रीजया चव्हाण हिला भोकर मतदार संघातून उमेदवारी देत निवडूनही आणले. लोकसभा निवडणुकीनंतर आता अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये प्रवेश करून वर्ष झाले आहे. चव्हाण आता भाजपमध्ये चांगलेच रुळले असून पक्षाची ध्येय धोरणे आणि आर्थिक व सामाजिक विकास यावर ते सातत्याने आपले मत जाहीर करत असतात.
गेल्या 10 वर्षात भारताने सकल राष्ट्रीय उत्पादन दुप्पट करून एक उल्लेखनीय आर्थिक यश संपादन केले आहे. सन 2015 मध्ये भारताचा जीडीपी 2.1 ट्रिलियन डॉलर्स होता. सन 2025 मध्ये तो 4.3 ट्रिलियन डॉलर्स झाला आहे. तब्बल 105 टक्क्यांची ही वाढ जगातील इतर कोणत्याही मोठ्या अर्थव्यवस्थेपेक्षा अधिक आहे. आर्थिक क्षेत्रातील भारताची ही असाधारण कामगिरी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दूरदर्शी व निर्णायक नेतृत्वाचे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या अथक प्रयत्नांचे प्रतिक, असल्याचे अशोक चव्हाण यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.