Bhaskarrao Khatgaonkar Sarkarnma
मराठवाडा

Bhaskarrao Khatgaonkar : काँग्रेसला दिलासा! खतगावकराना अटकपूर्व जामीन; काय आहे प्रकरण ?

Laxmikant Mule

Nanded Political News : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी खासदार तथा जिल्ह्यातील काँग्रेस नेते भास्करराव खतगावकर यांच्यावर एका फसवणुकीच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला. अटकपूर्व जामीनासाठी केलेला अर्जही फेटाळण्यात आला होता. त्यामुळे खतगावकर अडचणीत आले होते. त्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. तेथे त्यांना दिलासा मिळाला आहे. यामुळे काँग्रेसनेही सुटकेचा निश्वास सोडला.

भास्करराव पाटील खतगावकर (Bhaskarrao Khatgaonkar) आणि बी. आर. कदम यांच्यावर काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला आहे. आता या प्रकरणी खतगावकर यांचा अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यामुळे काँग्रेसचाही जीव भांड्यात पडला आहे. दरम्यान, त्यांच्यावर नरसी येथील तुळजाभवानी जिनिंग व प्रोसेसिंग सहकारी संस्थेचे पदाधिकारी नसतानाही भाड्याने दिलेल्या जमिनीबाबत दूरसंचार निगम कंपनीकडे स्वतःच्या लाभासाठी तडजोडीचे पत्र देऊन संस्थेची फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे.

या संदर्भात संस्थेच्या अध्यक्षांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने खतगावकर व कदम यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, असा आदेश दिला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार रामतीर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर भास्करराव पाटील यांनी बिलोली न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी याचिका दाखल केली होती.

ही याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर खातगावकरांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad Bench) अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली. या प्रकरणी युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांनी प्रकरणात अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना खतगावकरांवर गुन्हा दाखल झाल्याने काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. आता त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर झाल्याने काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खतगावकर हे खासदार, आमदार व मंत्री राहिले आहेत. तसेच नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांचा जनसंपर्क खूप मोठा असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ते जोमाने कामाला लागणे काँग्रेससाठी महत्वाचे आहे. आता अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याने खतगावकर यांचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT