Pankaja Munde  Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde : भाजपनेत्या पंकजा मुंडेंना मोठा धक्का; ‘वैद्यनाथ’च्या लिलावाची प्रक्रिया सुरू

Datta Deshmukh

Beed News : भाजपनेत्या पंकजा मुंडे यांना पक्षात सातत्याने डावलण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच त्याही पक्षावर नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात जोरदारपणे सुरू आहे. याचवेळी त्यांच्या पाठीमागची संकटे काही केल्या कमी होताना दिसून येत नाहीत. कारण आता पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या पांगरी (ता. परळी) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडील 203 कोटी 69 लाख रुपयांच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया युनियन बँक ऑफ इंडियाने जाहीर केली आहे.

युनियन बँक ऑफ इंडियाच्या छत्रपती संभाजीनगर येथील न्यू उस्मानपुरा शाखेचे 20 एप्रिल 2021 पासून थकीत असलेल्या 203 कोटी 69 लाख रुपयांची कर्ज थकबाकी, व्याज व इतर कर्जांच्या वसुलीसाठी बँकेच्या अहमदनगर येथील कार्यालयाने ही प्रक्रिया हाती घेतली आहे. येत्या 25 जानेवारीला सकाळी 11 ते 5 या वेळेत ऑनलाईन पद्धतीने युनियन बँकेकडून हा लिलाव होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

लिलावाच्या नोटिशीत वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना (Parli Vaidyanath Sugar Factory) लि., अश्रुबा काळे, भाऊसाहेब घोडके, भीमराव तांबडे, दत्तात्रय देशमुख, दीक्षितुलू गुल्लापल्ली फनी, श्रीनिवास कृष्णा, ज्ञानोबा मुंडे, फुलचंद कराड, गणपतराव बनसोडे, जमनाबाई लाहोटी, केशव माळी, किसनराव शिंगारे, महादेवराव मुंडे, नामदेव आघाव, पांडुरंगराव फड, पंकजा मुंडे, परमेश्वर फड, प्रतापराव आपटे, आर. टी. देशमुख, शिवाजी गुट्टे, श्रीहरी मुंडे, विवेक मोरे-पाटील, वेंकटराव कराड, यशश्री मुंडे यांचा लिलाव नोटिशीत कर्जदार, जामीनदार व तारणदार म्हणून उल्लेख आहे.

कारखान्याच्या कौठाळी व पांगरी (ता. परळी) येथील 67 हेक्टर शेतजमिनीसह याच दोन गावांतील 24 हेक्टर बिगरशेती जमिनीचा लिलाव बँकेने हाती घेतला आहे. यासह शुगर प्लांटची कारखाना इमारत, जुना डिस्टिलरी प्लांट, नवीन डिस्टिलरी प्लांट, बायोगॅस प्लांट, निवासी क्वार्टर्स, जनरेशन प्लांट व प्लांट मशिनरींचा लिलावाच्या नोटिशीत उल्लेख आहे. या शेतजमिनी व बिगर शेतजमिनी विविध 68 ठिकाणी आहेत. मशिनरी व प्लांटची राखीव किंमत 62 कोटी 25 लाख रुपये, तर जमीन व इमारतीची राखीव किंमत 45 कोटी 86 लाख रुपये राखीव ठेवण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात 19 कोटी रुपयांच्या थकीत जीएसटीप्रकरणी या विभागानेही कारखान्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू केली होती. याचे राजकीय पडसाददेखील उमटले होते. समर्थकांनी त्यांच्यासाठी मदत देऊ केली होती. मात्र, पैसे नको, आशीर्वाद द्या, म्हणत पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) मदत नाकारली होती.

दरम्यान, केंद्र सरकारने राष्ट्रीय सहकार विकास निगम लिमिटेडमार्फत राज्यातील विविध सहकारी साखर कारखान्यांना मार्जिन लोन दिले. यात काँग्रेसनेत्यांच्या कारखान्यांचाही समावेश आहे. मात्र, वैद्यनाथचा या लोनसाठी प्रस्ताव असूनही लोन मिळालेले नाही. याबाबत खुद्द पंकजा मुंडे यांनीही नाराजी व्यक्त केली.

एकेकाळी राज्यात सहकारी संस्था केवळ काँग्रेसीनेत्यांच्या असत. मात्र, दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे (Gopinath Munde) यांनीही वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. कारखान्याचा गाळपासह व्यवस्थापनात सर्वत्र नावलौकिक होता. पुढे पंकजा मुंडे कारखान्याच्या अध्यक्ष झाल्या. दुष्काळामुळे ऊस उत्पादन घटल्याने कारखाना आर्थिक अडचणीत आला.

अनेकदा कारखान्याचे गाळपही बंद राहिल्याने कर्जाची रक्कम थकत गेली. कारखान्याचे कर्मचाऱ्यांचे वेतन, पीएफ, उसाची एफआरपी रक्कम, कामगारांसह मुकादमांच्या आर्थिक देण्यांचे मुद्देही पुढे आलेले आहेत. विविध बॅंकांचे कारखान्याकडे कर्ज थकलेले असून यंदाही कारखान्याचे गाळप बंद आहे. आता यातील युनियन बँक ऑफ इंडियाने ही लिलाव प्रक्रिया हाती घेतली आहे. 203 कोटींच्या थकीत कर्जासाठी भाजपच्या मुंडेंच्या ‘वैद्यनाथ’च्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT