latur News : राज्यातील विधानसभा निवडणुकीत मोठे यश संपादन केल्यानंतर महायुतीचे कॉन्फिडन्स चांगलेच वाढले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात चार महिन्यातच पुन्हा एकदा निवडणुका होत आहेत. विधान परिषदेमधील रिक्त पाच जागांसाठी 27 मार्चला मतदान होणार असल्याने मोठी रस्सीखेच पाहावयास मिळत आहे. त्यामध्ये भाजपचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एक, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला एक जागा येणार आहे. त्या जागासाठी महायुतीमधील तीन पक्षात इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यातच आता भाजपच्या एका जागेसाठी मराठवाड्यातील या दोनपैकी एका नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
महायुतीच्या वाट्याला आलेल्या या पाच जागेसाठी तीन पक्षात सध्या जोरदार रस्सीखेच पहावयास मिळत आहे. विधानपरिषदेतील भाजपचे प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, रमेश कराड तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर तर शिवसेना शिंदे गटाचे आमशा पाडवी यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे या जागेवर वर्णी लागावी यासाठी तीन पक्षामध्ये चुरस आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडील एकाच जागेसाठी जवळपास १०० जण इच्छुक असल्याचे समजते. त्यांच्याकडील नाव लवकरच फायनल होणार आहे.
दुसरीकडे भाजपच्या वाट्याला आलेल्या तीन जागासाठी अनेकजण इच्छुक आहेत. विदर्भातील मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून प्रवीण दटके विजयी झाले आहेत. त्यामुळे या रिक्त झालेल्या जागेवर विदर्भातील एका नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे. या जागेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि मानद सचिव संदीप जोशी यांना संधी मिळेल, अशी चर्चा रंगली होती. परंतु, भाजप श्रेष्ठींकडून माधव भंडारी, दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर या तिघांची नावे निश्चित करण्यात आल्याची माहिती समोर येत असली तरी ऐनवेळी मराठवाड्यातील जागेसाठी नांदेडऐवजी लातूर अथवा धाराशिव जिल्हयातील एकाची वर्णी लागण्याची शक्यता अधिक आहे.
मराठवाड्यातील रमेश कराड यांच्या एका जागेसाठी लातूर जिल्हयातील अर्चना पाटील-चाकुरकर अथवा बसवराज पाटील-मुरूमकर या दोनपैकी एक नाव फायनल होण्याची शक्यता अधिक आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अर्चना पाटील यांना लातूर शहर मतदारसंघातून अल्पशा मताने पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे या रिक्त जागेसाठी त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या नावाची चर्चा दिल्ली दरबारी सुरु आहे. तर दुसरीकडे त्यांना विधानसभेसाठी उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे हायकमांड काय निर्णय घेणार ? याकडे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे याच जागेसाठी धाराशिव जिल्हयातील माजी आमदार बसवराज पाटील-मुरूमकर यांचे नाव चर्चेत आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी विधानपरिषदेला संधी देण्याच्या अटीवर काँग्रेससोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. औसा मतदारसंघातून ते दोन टर्म आमदार राहिले होते. मात्र, भाजपचे उमेदवार अभिमन्यू पवार यांनी 2019 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव केला होता. त्यामुळे पाटील पुन्हा एकदा 2024 ची विधानसभा ते काँग्रेसकडून लढतील असे वाटत होते.
काँग्रेससोडून केला होता भाजपमध्ये प्रवेश
पाटील यांनी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळेच अभिमन्यू पवार २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत वनवे निवडून आले होते. त्यामुळेच त्याची परतफेड करण्याची संधी अभिमन्यू पवार यांच्याकडे चालून आली आहे. त्यामुळे पवार यांनी त्यांची ताकद मुंबई दरबारी लावली असून बसवराज पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. विशेष म्हणजे भाजपच्या वाट्याला येत असलेल्या तीनही आमदारकीची मुदत 13 महिन्याची आहे.
उत्सुकता शिगेला
सध्या विधानसभेतील संख्याबळ पाहता भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत. त्यामुळे महायुतीचेच उमेदवार सहज विजयी होतील, असा अंदाज आहे. त्यामुळेच महायुतीकडे इच्छुकांचा ओढा अधिक आहे. त्यामुळे आता येत्या काळात या जागेवर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.