Omraje Nimbalkar Vs Rana Jagjitsinh Patil  Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Political News : ठाकरे गटाच्या ओमराजेंविरोधात 'धाराशिव'मध्ये भाजपच्या इच्छुकांची रांगच रांग ; पुन्हा राणा जगजीतसिंह की...?

Omraje Nimbalkar Vs Rana Jagjitsinh Patil : सध्या धाराशिवमध्ये शिवसेनेचा खासदार असल्याने मुख्यमंत्री शिंदेंकडून धाराशिवच्या जागेवर दावा केला जाण्याची शक्यता आहे.

अय्यूब कादरी

Dharashiv : लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सगळ्याच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्याने राज्यातील राजकीय गणिते पूर्णत: बदलली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील घटक पक्षांमध्ये जागावाटपावरुन अनेक खलबतं सुरू झाली आहे.

याचवेळी सध्या ठाकरे गटाच्या ताब्यात असलेली आणि ओमराजे निंबाळकर खासदार असलेल्या धाराशिवसाठी शिंदे गटही अधिक आग्रही असणार आहे. पण आता भाजपकडूनही अनेक इच्छुक या मतदारसंघात लोकसभेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असल्याचे दिसून येत आहे.

धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर (Omaraje Nimbalkar) असून ते शिवसेना ठाकरे गटाचे आहेत. सध्या येथे खासदार शिवसेनेचा असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाकडून या जागेवर दावा केला जाण्याची शक्यता आहे. लोकसभेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नसली तरी भाजपच्या नेत्यांनी धाराशिव मतदारसंघात हालचाली सुरू केल्या आहेत. निवडणूक महायुती म्हणून लढली गेली तर हा मतदारसंघ कुणाला सुटणार हेही निश्चित नसताना भाजपच्या काही नेत्यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळणार असे गृहीत धरून तयारी सुरू केली आहे.

महाविकास आघाडीतून शिवसेनेला (ठाकरे गट) जागा सुटली तर विद्यमान खासदार राजेनिंबाळकर हेच उमेदवार राहण्याची शक्यता आहे. भाजप(BJP) - शिवसेनेने एकत्र लढलेल्या निवडणुकीत त्यांनी त्यावेळी राष्ट्रवादीकडून लढलेल्या राणा जगजीतसिंह पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरूळे यांनी सध्या मतदारसंघात वातावरणनिर्मिती सुरू केली आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे स्थायिक असून मूळचे मुरुम (ता. उमरगा) येथील रहिवासी आहे. विविध शहरांमध्ये त्यांचे बॅनर लागले आहेत. अनेक गावांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. त्यांच्यापाठोपाठ आता भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील यांचेही नाव चर्चेत आले आहे. ते उमरगा तालुक्यातील मुळज रहिवासी असून बार्शी ही त्यांची सासुरवाडी आहे.

धाराशिव लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्याशी त्यांची जुनीच मैत्री आहे. जागा भाजपला मिळालीच तर उमेदवारी कोणाला द्यायची, याबाबत तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील (Rana Jagjitsinh Patil) यांचे मत महत्वाचे ठरणार आहे.

स्वतः राणाजगजीतसिंह यांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्याने निवडणूक लढवावी, असा तोडगा पक्षाकडून काढला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे, महाविकास आघाडीमधून माजी मंत्री बसवराज पाटील (रा. मुरुम) यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र, स्वतः पाटील यांनी तसे संकेत अद्याप दिलेले नाहीत.

शिवसेनेच्या शिंदे गटाकडून माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड हे इच्छुक आहेत. उमरगा तालुक्यातील एका गावात नुकत्याच झालेल्या कायर्क्रमात त्यांनी तसे बोलून दाखवले आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेने त्यांना डावलून राजेनिंबाळकर यांना उमेदवारी दिली होती. शिवसेनेतून एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर प्रा. गायकवाड यांनी मुंबईत जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेत सोबत राहणार असल्याचे सांगितले होते. मात्र, काही दिवसांनंतर प्रा. गायकवाड शिंदे गटात दाखल झाले. निवडणूक जवळ येईल तशी महायुती आणि महाविकास आघाडीच्या इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT