Basavraj Patil Sarkarnama
मराठवाडा

Marathwada MLC Election: मोक्याच्या क्षणी हुकमी पत्ता बाहेर काढला; बसवराज पाटलांच्या उमेदवारीमागं भाजपची 'धूर्त' खेळी?

BJP Basavraj Patil MLC Candidate: मराठवाड्यातील धाराशिव (उमरगा-लोहारा) आणि लातूर (औसा) या दोन्ही शेजारील जिल्ह्यांच्या राजकारणावर त्यांचा थेट प्रभाव आहे. त्यांच्या कुटुंबाची मुरुम नगरपरिषदेवर 25 वर्षांहून अधिक काळ सत्ता राहिली आहे. शांत, संयमी आणि विकासाभिमुख नेता म्हणून त्यांची ओळख आहे.

Jagdish Pansare

BJP News : गेल्या दोन-तीन वर्षांत इतर पक्षातून भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली. आमच्या पक्षात येणार्‍यांचा आम्ही योग्य सन्मान राखतो, हा दिलेला शब्द आम्ही पाळतो, असा संदेश विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पक्षनेतृत्वाने दिला आहे. काँग्रेसचे माजी मंत्री बसवराज पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांनाही सन्मान राखला जाईल, असा शब्द देण्यात आला होता. अखेर उशिरा का होईना, तो खरा ठरला आहे.

बसवराज पाटील यांना महायुतीकडून लातूर-बीड-धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली. याचे पडसाद भाजपामध्ये उमटले. थेट नाराजी जाहीर न करता सोशल मिडिया किंवा आपल्या समर्थकांमार्फत काही इच्छुकांनी ती व्यक्त केली. बसवराज पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर जुन्या पक्षाची कार्यपद्धती बाजूला सारत नव्या पक्षाचे ध्येय धोरण वेगाने अंगीकारले. लातूर-धाराशिव जिल्ह्यात संघटनात्मक ताकद जिथे कमी होती तिथे ती वाढवण्यासाठी कष्टही घेतले.

बसवराज पाटील यांनी 45 वर्षांची काँग्रेसची साथ सोडून 27 फेब्रुवारी 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या दोन महिने आधी भाजपामध्ये प्रवेश केला. तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी समर्थकांसह 'कमळ'हाती घेतले होते. भाजपमध्ये आल्यानंतर पक्षाने त्यांची लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. ही संघटनात्मक जबाबदारी नेटाने पार पाडत असतानाच लातूर जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष बसवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

बसवराज पाटील माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र म्हणून ओळखले जातात. 1982 मध्ये उमरगा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून बसवराज यांनी आपल्या राजकारणाचा श्रीगणेशा केला होता. 1992 मध्ये ते जिल्हा परिषद सदस्य, धाराशिव जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले. 1999 च्या विधानसभा निवडणुकीत ते उमरगा-लोहारा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा आमदार झाले.

विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये 1999 ते 2004 या काळात त्यांनी ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. 2004 च्या निवडणुकीत उमरगा मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2009 मध्ये उमरगा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी (SC) राखीव झाल्याने ते लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघात स्थलांतरित झाले. तिथे त्यांनी 2009 आणि 2014 अशा सलग दोन टर्म काँग्रेसचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे (MPCC) कार्याध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत औसा मतदारसंघातून भाजपच्या अभिमन्यू पवार यांनी त्यांचा पराभव केला. पुढे ते याच पक्षात दाखल झाले. बसवराज पाटील यांची ताकद प्रामुख्यानं सहकार क्षेत्रात आहे. उमरगा तालुक्यातील विठ्ठल साई सहकारी साखर कारखान्याचे ते अध्यक्ष आहेत. या कारखान्याद्वारे त्यांचे धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांतील ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे मोठे जाळे विणले.

मराठवाड्यातील धाराशिव (उमरगा-लोहारा) आणि लातूर (औसा) या दोन्ही शेजारील जिल्ह्यांच्या राजकारणावर त्यांचा थेट प्रभाव आहे. त्यांच्या कुटुंबाची मुरुम नगरपरिषदेवर 25 वर्षांहून अधिक काळ सत्ता राहिली आहे. शांत, संयमी आणि विकासाभिमुख नेता म्हणून त्यांची ओळख आहे.

लिंगायत मतदारांवर बसवराज पाटील यांचा मोठा प्रभाव आहे. लिंगायत समाजाचा मोठा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. लातूर, धाराशिव आणि नांदेड या लोकसभा तसेच विधानसभा मतदारसंघांमध्ये लिंगायत मतदारांची संख्या लक्षणीय आणि निर्णायक आहे. विशेषतः उमरगा, औसा आणि बार्शी या भागांत लिंगायत मतदार निवडणुकीचा कौल ठरवतात.

लिंगायत समाजावर बसवराज पाटील यांच्या असलेल्या या प्रभावाचा थेट फायदा घेण्यासाठीच भाजपने त्यांना पक्षात घेतले. त्यांच्या प्रवेशामुळे मराठवाड्यातील काँग्रेसच्या पारंपरिक लिंगायत व्होट बँकेला छेद देण्याचा व ती मतं आपल्याकडे वळवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. विधान परिषदेची उमेदवारी हा त्याच खेळीचा भाग असल्याचे बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT