Amit Deshmukh - BJP  Sarkarnama
मराठवाडा

BJP Vs Amit Deshmukh News : भाजप लातूरमध्ये डाव टाकणार, 'देशमुखांच्या गढी'ला आव्हान देणार

सरकारनामा ब्यूरो

Latur : भाजपकडून मिशन लोकसभा आणि विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. आगामी निवडणुकाबाबत राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरू आहे. अशातच भाजपने विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या बालेकिल्ल्यातच मुसंडी मारण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर देशमुखांच्या बालेकिल्ला राहिलेल्या लातरमध्ये भारतीय जनता पक्ष चांगलाच आक्रमक झालेला दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वीच लातूर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे. पण माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव देश्मुख यांनी हा मतदारसंघ उत्तमप्रकारे बांधला आहे. आणि त्यांचाच कित्ता गिरवत सध्या आमदार अमित देशमुख(Amit Deshmukh) मतदारसंघात विकासकामे आणि जनसंपर्काच्या माध्यमातून अॅक्टिव्ह झाले आहेत.

अमित देशमुख हे उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कॅबिनेट मंत्री होते. त्याकाळात त्यांनी लातूर मतदारसंघात पुन्हा मजबूत केला. त्यामुळे आगामी लातूर महानगरपालिकेत निवडणुकीत देशमुखांना धक्का देत विजय मिळविण्यासाठी भाजपकडून प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु आहे. पण देशमुखांच्या गडाला सुरुंग लावणे भाजपसाठी नक्कीच सोपं असणार नाही.

लातूरमध्ये नुकताच पार्किंगचा मुद्दा चर्चेत आला होता. भाजपकडून नुकतेच या वाहन पार्किंगच्या समस्येवर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. तर आता अन्नत्याग आमरण उपोषण आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा कॉंग्रेसचे आमदार अमित विलासराव देशमुख यांना शह देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

यामुळेच विधानसभा निवडणूक आणि महानगरपालिकेत नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने सुरु केली आहेत. तर दुसरीकडे कॉंग्रेस(Congress)च्या वतीने महिला आघाडीवर विविध संवाद मेळावे भरवले जात आहेत. गुरुवारी (ता.२४) विलास सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली `महिला मेळावा` आयोजित केला आहे. आमदार अमित देशमुख यांच्या संकल्पनेतूनच या कारखान्याची उभारणी झालेली आहे.

दुसरीकडे शहरातील प्रभागनीहाय महिलामध्ये संवाद मेळाव्याचे आयोजन केले आहे. कालच प्रभाग तीनमध्ये शहर महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा माजी महापौर डॉ. स्मिता खानापुरे यांच्या नेतृ्त्वात संवाद मेळावा झाला. भाजप(BJP)च्या विविध आंदोलनाला कॉंग्रसकडून संवाद मेळाव्यातून उत्तर दिले जात आहे.

युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अजितसिंह कव्हेकर यांच्या नेतृत्वाखाली हे अन्नत्याग आमरण उपोषण आंदोलन भाजपने सुरु केले आहे. एकीकडे लातूर पॅटर्नसाठी विविध शहरातून लातूरमध्ये विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. मात्र, शहर पूर्ण कचरायुक्त झाले आहे. सध्या ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हेच पाच लाख विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जाऊन शहराला कोटा (राजस्थान) प्रमाणे शिक्षण हब करावयाचे आहे.

सध्याचे कॉंग्रेसचे आमदार अमित देशमुख यांना शहराकडे लक्ष देण्यास वेळच नाही. ते एकदाही महापालिकेकडे फिरकले नाहीत. ज्या मतदारसंघातून ते निवडूण आले त्या मतदारसंघात 365 दिवसांपैकी केवळ 84 दिवस उपस्थित राहिले. त्यांना पालिकेच्या समस्यांकडे लक्ष देण्यास वेळच नाही, असा आरोप अजित कव्हेकर यांनी वतीने करण्यात आला आहे.

शह-काटशहाच्या राजकारणात लातूर आणि लातूर ग्रामीण (आमदार धीरज विलासराव देशमुख) विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसची असलेल्या संस्थांत्मक बांधणीला कशा पद्धतीने शह देईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT