Sanjay Kute Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Kute News : 'हिंगोलीत ऐनवेळी उमेदवार बदलल्याचाही महायुतीला फटका बसला' ; भाजपच्या संजय कुटेंची स्पष्ट कबुली!

संदीप नागरे

Hingoli Loksabha Constituency Election and Mahayuti : हिंगोली लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा झालेला पराभव चिंताजनक आहे. बाबुराव कदम यांच्या पराभवामागच्या कारणांचा शोध घेतला त्यातील अनेक कारणांपैकी ऐनवेळी उमेदवार बदलला हे एक आहे, अशी स्पष्ट कबुली लोकसभेच्या हिंगोली मतदारसंघात निरीक्षक म्हणून आलेले भाजप आमदार संजय कुटे यांनी दिली.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली मतदारसंघात महायुतीचे बाबुराव कदम पराभूत झाले. शिवसेना ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांनी त्यांचा पराभव केला. हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी ऐनवेळी बदलून त्यांच्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाबुराव कदम यांना उमेदवारी दिली होती.

ऐनवेळी उमेदवार बदलण्याचा हा निर्णय महायुतीला अडचणीचा ठरल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. या संदर्भात हिंगोली दौऱ्यावर आलेले पक्ष निरीक्षक आमदार संजय कुटे(Sanjay Kute) यांनी महायुतीच्या पराभवाची जी पंधरा-वीस कारणे पुढे आली आहेत, त्यापैकी ऐनवेळी उमेदवार बदलाचे एक कारण असल्याचे ते म्हणाले.

पण या पराभवातून सावरत महायुतीने जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली असून आम्ही सर्वाधिक जागा जिंकू. महाष्ट्रात 2024 मध्ये पुन्हा महायुतीचे सरकार आणू, असा विश्वासही कुटे यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुक प्रचारात जनतेने फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते खासगीत यासंदर्भात चर्चा करत होते. याचा फटका तुम्हाला बसला का? यावर लोकांमध्ये निश्चित अशा प्रकारची चर्चा होती हे मी नाकारत नाही. पदाधिकारी खासगीत काय बोलतात याला फारसे महत्व नसते. पण महायुती म्हणून आम्ही लोकसभेची निवडणूक एकत्र लढलो, प्रत्येक पक्षाने ऐकमेकांचे काम केले, असे सांगत कुटे यांनी महायुतीत मतभेद असल्याचे नाकारले.

देश पातळीवर जे मुद्दे महायुतीला लोकसभा निवडणुकीत अडचणीचे ठरले तेच मराठा आरक्षण, संविधान बदलणार या विरोधकांचा अपप्रचार यामुळे आमचे उमेदवार पडले. हिंगोली जिल्ह्यातील पराभवाची कारणे व आढावा याचा अहवाल आजच पक्षाकडे सुपूर्द करणार आहोत, असेही कुटे यांनी सांगितले.

हिंगोली लोकसभा मतदारसंघा शिवसेना शिंदे गटाने हेमंत पाटील(Hemant Patil) यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली होती. परंतु भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना टोकाचा विरोध करत मुख्यमंत्र्यांवर उमेदवार बदलासाठी दबाव टाकला होता. भाजपने विरोध केला तर उमेदवार अडचणीत येऊ शकतो, बंडखोरी होऊ शकते ही शक्यता गृहित धरून हेमंत पाटील यांची उमेदवारी ऐनवेळी रद्द करण्यात आली होती.

त्यांच्याऐवजी शिवसेनेने बाबुराव कदम यांना उमेदवारी दिली. पण निवडणुकीत त्यांचा लाखाहून अधिक मताधिक्याने पराभव झाला. शिवसेनेकडून उमेदवार बदलल्याने पराभव झाल्याचे खापर भाजपवर फोडले जात आहे. मात्र आमदार संजय कुटे यांनी पराभवाच्या अनेक कारणांपैकी हे एक कारण असल्याचे सांगत हात झटकले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT