Sandipan Bhumre Sarkarnama
मराठवाडा

Chhatrapati Sambhajinagar Constituency : दारूच्या दुकानांनी केली भुमरेंची गोची, शपथपत्र बदलले...

Sandipan Bhumre Loksabha Candidate : लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होत असताना याच दारूच्या दुकानांनी महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांची चांगलीच गोची केल्याचे दिसून येत आहे.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar Political News : लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातील महायुतीची उमेदवार संदिपान भुमरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेले शपथ पत्र विरोधकांच्या टीकेनंतर दोनच दिवसात बदलण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढावली.

शिंदे- फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर कॅबिनेट मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री झालेल्या संदिपान भुमरे यांनी नऊ दारूची दुकाने सुरू केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सातत्याने केला गेला.

याच आरोपांची री ओढत पक्ष फुटीआधी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात येऊन दारू विकता संत एकनाथ महाराजांना काय वाटेल, असा टोला लगावला होता. आता लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (MVA) असा थेट सामना होत असताना याच दारूच्या दुकानांनी महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांची चांगलीच गोची केल्याचे दिसून येत आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते तथा शिवसेना नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी संदिपान भुमरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना शपथ पत्रात दिलेल्या माहितीचा आधार घेत दारूच्या दुकानांची माहिती का लपवली? असा सवाल करत भुमरे यांची कोंडी केली होती. त्यानंतर भुमरे यांनी दोन दिवसात आपल्या शपथपत्रात बदल करत दोन दारूची दुकाने आपल्या पत्नीच्या नावावर असल्याचे नमूद केले.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व महायुतीचे मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भुमरे संभाजीनगरात मोठे शक्तिप्रदर्शन करणार आहेत.

या शक्ती प्रदर्शनानंतर पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल करून महायुती महाविकास आघाडीला आव्हान देण्याच्या तयारीत आहे. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा प्रचार आतापर्यंत खान पाहिजे की बाण? या मुद्द्या भोवती फिरत आलेला आहे.

शहराच्या नामांतराचा विषय आता निकाली निघाल्यामुळे सर्वसामान्यांच्या नियमित पाणी, रस्ते, वीज या मुद्द्यांना हात घालण्याऐवजी विरोधकाला नामोहरम करण्यासाठी वैयक्तिक पातळीवरील टीकेला महत्व दिले जात आहे. संदिपान भुमरे यांच्या दारूच्या दुकानांचा मुद्दा विरोधकांकडून प्रचारात प्रमुख असेल असे यावरून दिसते. संदिपान भुमरे यांना लोकसभेची उमेदवारी (Loksabha Candidate) मिळवताना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली.

आधी ही जागा भाजपकडून (BJP) सोडवून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भाजपच्या BJP नेत्यांची मनधरणी करावी लागली. आता जागा मिळाल्यानंतर अपक्ष आणि बंडखोरांना कसेबसे रोखण्यात महायुतीला यश आले.

मात्र संदिपान भुमरे यांनी सुरू केलेली दारूची दुकाने त्यांची पाठ काही सोडायला तयार नाही. विरोधकांनी याच मुद्द्यावरून भुमरेंना पाणी पाजण्याचे ठरवले आहे. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी (Sambhajinagar Loksbha Constituency) 13 मे रोजी मतदान होणार असून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.

माघार घेण्याच्या तारखेनंतर येथील लढतीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी महायुती, महाविकास आघाडी आणि एमआयएम (AIMIM) या तीन प्रमुख तीन पक्षांमध्येच ही लढत होणार आहे. या दरम्यान निवडणूक प्रचारात विरोधकांकडून होणाऱ्या दारू दुकानाच्या मुद्द्यावर महायुती कसे प्रत्युत्तर देणार? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

विशेष म्हणजे आरोप करणारे आणि ज्यांच्यावर आरोप केले जात आहेत ते दोन्ही उमेदवार गेली 35- 40 वर्ष एकाच पक्षात राजकारण करत होते. परंतु शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यानंतर आता दोन्ही नेत्यांना एकमेकांमधील अवगुण दिसू लागले आहेत. त्यामुळे सुज्ञ मतदार मतदानाच्या दिवशी काय निर्णय घेतात? यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT