Chhatrapati Sambhajinagar News : महाराष्ट्रातील एमआयएम-वंचित बहुजन आघाडीचे एकमेव खासदार म्हणून देशभरात ओळख असलेल्या इम्तियाज जलील यांचे औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) मतदारसंघातून दुसऱ्यांदा संसदेत निवडून जाण्याचे स्वप्न जरा कठीणच वाटते. विशेष म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मुस्लिम मतांचा टक्का वाढला आहे. मोहल्ल्यांमधून मतदानासाठी जथ्थेच्या जथ्थे बाहेर पडून मतदान केंद्रांवर धडकले. तरी इम्तियाज जलील यांच्या पंतगाला ढील काही मिळाली नाही, असे चित्र आहे.
जिल्ह्यातील 63 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, यात सर्वाधिक मतदान हे मुस्लिम वसाहतीत झाल्याची माहिती आहे. याच उत्साहात काल रात्रीच एमआयएमच्या समर्थकांनी इम्तियाज जलील यांचे घर गाठत त्यांना हार घालून जल्लोष साजरा केला. शहरातील मुस्लिमबहुल भागात इम्तियाज जलील यांना एकगठ्ठा मते मिळाली असली तरी यावेळी त्यांच्या या हक्काच्या मतांमध्ये 20 ते 25 टक्के फूट पडल्याची चर्चा आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
2019 मध्ये वंचितसोबत असल्यामुळे दलितांची दीड लाखाहून अधिक एकगठ्ठा मतं इम्तियाज जलील यांच्या पारड्यात पडली होती. यावेळी ही बहुतांश मत त्यांच्यापासून दुरावली गेली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने अफसर खान यांच्या रुपात मुस्लिम उमेदवार दिल्याने इम्तियाज यांच्या दलित-मुस्लिम मतांच्या काॅम्बिनेशनला धक्का बसला आहे. याशिवाय महाविकास आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गट या मित्र पक्षांमुळे आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाने मुस्लिम समाजाबद्दल मवाळ भूमिका घेतल्याने काही प्रमाणात ही मतेही चंद्रकांत खैरे यांच्या पारड्यात पडल्याचा दावा केला जातोय. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर इम्तियाज जलील यांचा पंतग यावेळी कटण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
लोकसभा 2019 च्या निवडणुकीत काठावर पास झालेल्या इम्तियाज यांच्यासाठी यावेळची निवडणूक सोपी नव्हती. मुस्लिमांची (Muslim) एकगठ्ठा मतांमध्ये वाढ करून काही प्रमाणात दलित, हिंदू मतदान खेचण्यात आपण यशस्वी होऊ,असा इम्तियाज यांना विश्वास होता. पण त्यांचा हा प्रयत्न तोकडा पडतांना दिसतो आहे. महायुतीकडून संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संभाजीनगरमधील लढत ही तिरंगी वाटू लागली होती. परंतु काल झालेल्या मतदान आणि समोर आलेल्या टक्केवारीनंतर ही भुमरे आणि खैरे यांच्यात म्हणजेच दुरंगी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.मतदान संपल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी काही आडाखे मांडत असतात.
एमआयएमच्या उत्साही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रात्री उशीरा इम्तियाज जलील यांच्या मन्नत निवासस्थानासमोर जल्लोष केला. हार घालून आणि पेढा भरवून त्यांना अॅडव्हान्समध्ये विजयाच्या शुभेच्छा दिल्या. इम्तियाज यांनी सगळ्यांना अभिवादन करत त्यांच्या शुभेच्छा स्वीकार करत कोणालाही नाराज केले नाही.एकूणच एमआयएमचा हा उत्साह आणि विजयाचा जल्लोष किती खरा किती खोटा? हे 4 जूनला जेव्हा ईव्हीएम मशीन उघडतील आणि प्रत्यक्षात मतमोजणी पुर्ण होईल, तेव्हाच स्पष्ट होईल. एकीकडे महाविकास आघाडीचे खैरे, महायुतीचे भुमरे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांची चर्चा होत आहे. पण वंचितच्या अफसर खान यांची मात्र कोणीच दखल घेतली नसल्याचे दिसते.
(Edited by : Chaitanya Machale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.