Shivsena-Bjp-Chhatrapati Sambhajinagar Sarkarnama
मराठवाडा

Shivsena-BJP News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत मोठा भाऊ कोण? शिवसेना-भाजप युतीत जागा वाटप ठरणार कळीचा मुद्दा?

Chhatrapati Sambhajinagar News : शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी युतीची तयारी दाखवताना 2015 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीतील नगरसेवकांची संख्या हाच जागा वाटपाचा फाॅर्म्युला असावा, अशी मागणी केली आहे.

Jagdish Pansare

Municipal Corporation News : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. राजकीय पक्षांची तयारी आधीपासून सुरूच होती, आता त्याला वेग येणार आहे. महायुतीतील प्रमुख नेत्यांनी महापालिका एकत्र लढणार असल्याचे सांगितले आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत गेल्या पंचवीस वर्षाच्या युतीच्या सत्तेत शिवसेना (Shivsena) कायम मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिला आहे.

पक्षफुटीनंतर भाजप(BJP) हे मोठेपण स्वीकारणार का? हा खरा प्रश्न आहे. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी युतीची तयारी दाखवताना 2015 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीतील नगरसेवकांची संख्या हाच जागा वाटपाचा फाॅर्म्युला असावा, अशी मागणी केली आहे.

छत्रपती संभाजीनगर महापालिका पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने होत आहेत. नगरसेवकांची एकूण संख्या 115 असणार आहे. एकूण 29 प्रभागातून ते निवडले जाणार आहेत. यामध्ये चार सदस्य असणाऱ्या प्रभागांची संख्या ही 28, तर तीन सदस्य असणाऱ्या प्रभागाची संख्या एक आहे. सरासरी एका प्रभागात 25 ते 35 हजारंची मतदारसंख्या असणार आहे.

युती विरुद्ध उद्धवसेना-एमआयएम अशी टक्कर

गेली पंचवीस वर्ष छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर शिवसेना-भाजप युतीची सत्ता राहिली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यादांच होणाऱ्या महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप (BJP) विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि एमआयएम अशी टक्कर अपेक्षित आहे. एमआयएम गेल्या महापालिका निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्ष होता. वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, बसपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षही मैदानात असणार आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडीच्या प्रयत्नात आहे. काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते खासदार डाॅ. कल्याण काळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या स्थानिक नेत्यांमध्ये लवकरच बैठक होणार आहे. त्यानंतरच महाविकास आघाडीचे चित्र स्पष्ट होणार आहे. आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हाच मोठ्या भावाच्या भूमिकेत असणार आहे.

एमआयएम, वंचित स्वबळावर?

एमआयएम पक्षाला लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. परंतु शहरी भागात या पक्षाची ताकद वाढल्याचे त्यांना मिळालेल्या मतांवरून स्पष्ट झाले होते. आता स्वबळावर नगरसवेकांची संख्या वाढवत महायुती-महाविकास आघाडीतील मतभेदाचा फायदा उचलत संमिश्र प्रभागांमध्येही उमेदवार देण्याची तयारी एमआयएमने चालवली आहे. वंचित बहुजन आघाडीने अद्याप कोणाशी आघाडी करणार? की मग स्वबळावर लढणार हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. तब्बल दहा वर्षांनी महापालिका निवडणुका होत असल्याने सगळ्याच पक्षांकडे सध्या इच्छूकांची गर्दी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT