Ekanath shinde, Ambadas danve Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve : मुख्यमंत्र्यांना विसर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बोलावली बैठक..

Jagdish Pansare

Cast Verification News : राज्यातील महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरी कोळी जमातीच्या प्रश्नाबाबत गेल्या काही महिन्यापासून उपोषण धरणे, रास्तारोको, मोर्चे, धरणे आंदोलने राज्यभर सुरू आहेत. मात्र त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी बैठक बोलवण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला जातोय.

तर दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मात्र पंढरपूर भेटीत शिष्टमंडळाला दिलेल्या आश्वासनानंतर मुंबईत संबंधित विभागाच्या सचिव, आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. 28 आॅगस्ट रोजी अनुसूचित जमातीच्या मागण्यांसदर्भातील माहिती घेऊन बैठकीला हजर राहा, असे पत्र दानवे यांच्यावतीने त्यांचे सहायक रामटेके यांनी संबंधित विभागाला पाठवले आहे.

मराठवाड्यातील काही आमदारांनी नुकतेच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून टीआरटीआयचे आयुक्त यांची बदली करून त्यांच्या जागेवर नाॅन ट्रायबल अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी केली होती. मात्र आमदारांच्या या मागणीला सत्ताधाऱ्यांकडून केराची टोपली दाखवण्यात आल्याचा आरोप होत आहे. मुख्यमंत्र्यांकडून वंचित समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने अनुसूचीत जमातीत मोठा असंतोष निर्माण झाला आहे.

राज्यातील विस्तारित क्षेत्रातील महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरी कोळी जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्र प्रश्नावर ह्या तिन्ही जमातीमध्ये प्रचंड आक्रोश आहे. (Shivsena) राज्यातील विशेषतः मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश विभागात आदिवासी महादेव कोळी, मल्हार कोळी जमातींची वेगवेगळी आंदोलने, जलसमाधी आंदोलने, जन जागृती मेळावे, नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

असे असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहा ऑगस्ट रोजीची सह्याद्री अतिथी गृहावरील बैठक बोलावली होती. पण गोंधळामुळे ती स्थगित करण्यात आली होती. ही बैठक लवकर घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. दोन वेळा बैठक जाहीर करून नंतर त्या रद्द करण्यात आल्या. आता तर मुख्यमंत्र्यांना या बैठकीचा विसरच पडला, अशी टीका होऊ लागली आहे.

वीस दिवस उलटून गेले तरी मुख्यमंत्री कार्यालयाकडून बैठकी संदर्भात कुठलीही सूचना किंवा निरोप मिळालेला नाही. त्यामुळे महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी समाजाच्या मनात सरकारविरोधात रोष वाढत आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात पंढरपूर दौऱ्यावर असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन दिले होते. तेव्हा लवकरच आपण या विषयावर संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावू, असे आश्वासन दानवे यांनी दिले होते.

सध्या राज्यात विध्यार्थांच्या प्रवेश प्रक्रिया सुरु आहेत. वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि अन्य व्यायसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु आहेत. मात्र तीनही जमातीला प्रवेशापासुन वंचित ठेवण्याचे आदिवासी जात पडताळणी समित्यांचे षडयंत्र असल्याचा आरोप केला जात आहे. समाजासाठी घातक ठरणारे नविन जात पडताळणी सुधारणा विधेयक, महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी जमातींची प्रकरणे प्रलंबित ठेवणे, उच्च न्यायालयाने आदेश देऊनही प्रकरणे निकाली न काढणे, उच्च न्यायालयात दररोज शेकडो प्रकरणे दाखल होणे यातून जमातीवर अन्याय केला जात आहे.

या विरोधात राज्यभर आंदोलने सुरु असताना अंबादास दानवे यांनी मुंबई येथे 28 रोजी बैठक बोलावली आहे. या बैठकीला आदिवासीं विभागाचे सचिव, टीआरटीआय आयुक्त, राज्यातील अनु. जमाती जात पडताळणी समित्यांचे सहआयुक्त व राज्यभरातील महादेव कोळी,मल्हार कोळी, टोकरे कोळी जमातीच्या संघटनांचे पदाधिकारी, अभ्यासकांना बैठकीला बोलावण्यात आले आहे. दानवे यांच्यामुळे न्याय मिळेल, अशी अपेक्षा जमात बाळगून आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT