Marathwada News : 'कॉक्रोच जनता पार्टी' (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांना 'तुला पैसे देतो, हे अकाऊंट बंद कर, नाहीतर भाजपमध्ये ये, नाही ऐकलं तर अमेरिकेतही तुला मारून टाकू', अशी उघड आणि जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यांनी या व्हॉट्सॲप चॅटचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर शेअर केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर 'कॉक्रोच जनता पार्टी' (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगरच्या वाळुज महानगरमध्ये असलेल्या त्याचे आई-वडील राहत असलेल्या घराला पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे.
स्थानिक पोलिसांना वरिष्ठ पातळीवरून सूचना आल्यानंतर दिपके यांच्या कुटुंबाला कुठल्याही प्रकारचा धोका पोहचू नये याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे. 'अकाउंट डिलीट करून सर्व प्रकार थांबव, अन्यथा तू अमेरिकेत असलास तरी तुझे आई-वडील भारतात आहेत', असा धमकीचा संदेश अभिजीत दिपके यांना मिळाल्याचा दावा करण्यात आला होता.
या प्रकरणानंतर सामाजिक आणि राजकीय वातावरण तापले होते. विविध स्तरातून पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून कुटुंबाला संरक्षण द्यावे, अशी मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दिपके यांच्या आई-वडिलांच्या घरासमोर बंदोबस्त वाढवला आहे. अभिजीत दिपके यांनी त्यांच्या 'X' (ट्विटर) हँडलवर धमकीचे स्क्रीनशॉट आणि एका व्यक्तीचा व्हिडिओ शेअर केला आहे.
त्यामध्ये त्यांना अज्ञात क्रमांकावरून मेसेज आले आहेत की, 'तुला पैसे मिळतील, तुझे हे सोशल मीडिया अकाऊंट बंद कर, नाहीतर भाजपमध्ये ये. जर ऐकले नाहीस, तर अमेरिकेतही तुला मारून टाकले जाईल'. धमकी देणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओही समोर आला असून, 'झुरळ जसे पायाखाली चिरडले जाते, तसेच तुलाही चिरडू, तुझ्या आई-वडिलांचे घर कुठे आहे हे आम्हाला माहीत आहे', अशी धमकी देण्यात आली आहे.
या धमकीची गंभीर दखल घेत पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरातील त्यांच्या मूळ घराभोवती कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. ते राहत असलेल्या भागात शस्त्रधारी पोलीस, व्हॅन तैनात करण्यात आले असून या परिसरात सीसीटीव्ही देखील बसवण्यात आले आहेत.
अभिजीत दिपके यांचे मूळ गाव हिंगोली जिल्ह्यातील 'संतुक पिंपरी' हे आहे. मात्र, त्यांचे कुटुंब सध्या छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज महानगर भागात राहते. त्यांनी पुणे येथून पत्रकारितेची पदवी घेतली. त्यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले आणि नुकतीच त्यांनी बोस्टन युनिव्हर्सिटीमधून पब्लिक रिलेशन्स मध्ये मास्टर्स पदवी पूर्ण केली आहे.
अभिजीत हे सोशल मीडिया आणि डिजिटल रणनीतीचे जाणकार आहेत. 2020 ते 2023 दरम्यान त्यांनी 'आम आदमी पार्टी' (AAP) च्या केंद्रीय सोशल मीडिया टीममध्ये रणनीतीकार म्हणून काम केल्याची माहिती आहे. 15 मे 2026 रोजी भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका न्यायालयीन सुनावणीदरम्यान बोगस आणि बनावट पदव्या घेणाऱ्यांवर टीका करताना कथितरीत्या 'कॉकरोच' (झुरळ) आणि 'परजीवी'अशा शब्दांचा वापर केला होता. नंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले की त्यांचा रोख केवळ बोगस पदवीधरांवर होता, बेरोजगार तरुणांवर नाही.
सरन्यायाधीशांच्या या विधानाचा निषेध करण्यासाठी आणि देशातील वाढती बेरोजगारी, पेपर लीक आणि युवकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर उपरोधात्मक पद्धतीने 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) ची स्थापना केली. 'अबकी बार दस लाख पार' या घोषणेसह सुरू झालेल्या या डिजिटल मोहिमेला भारतीय तरुणांनी प्रचंड प्रतिसाद दिला. अवघ्या 4 दिवसांत त्यांच्या इन्स्टाग्राम पेजने 1 कोटीहून अधिक फॉलोअर्सचा टप्पा पार केला.
थेट सत्ताधारी भाजपच्या अधिकृत सोशल मीडिया पेजलाही फॉलोअर्सच्या बाबतीत मागे टाकले. त्यांनी या आभासी पक्षाचा एक जाहीरनामा प्रसिद्ध केला, ज्यामध्ये "निवृत्तीनंतर कोणत्याही सरन्यायाधीशाला राज्यसभा जागा न देणे, पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर 20 वर्षे बंदी घालणे आणि महिलांना 50% आरक्षण देणे" अशा मागण्या केल्या होत्या. या डिजिटल वादळामुळे आणि त्यानंतर भारतामध्ये CJP चे मुख्य 'X' अकाऊंट बंद करण्यात आल्यामुळे अभिजीत दिपके देशभरात आणि जागतिक मीडियात प्रचंड प्रकाशझोतात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.