Maharashtra Vidhan Parishad Election 2024 : विधानपरिषदेसाठी काँग्रेसडून पुन्हा एकदा विद्यमान आमदार प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत हिंगोली मतदारसंघात महाविकास आघाडी असूनही प्रज्ञा सातव यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मदत केल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केला होता.
या संदर्भात काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव के.सी. वेणूगोपाल यांच्याकडे आष्टीकर यांनी लेखी तक्रार करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. परंतु त्यांच्या या तक्रारीला वेणूगोपाल यांनी एकप्रकारे केराची टोपली दाखवल्याचे स्पष्ट होत आहे. ज्या वेणूगोपाल यांच्याकडे खासदार आष्टीकर यांनी प्रज्ञा सातव(Pradnya Satav) यांची तक्रार केली होती, त्यांच्याच सहीने विधानपरिषदेसाठी काँग्रेसने पुन्हा त्यांना संधी दिली आहे.
काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही, असा शब्द राहुल गांधी यांनी दिला होता. तो दोन वर्षांपुर्वी प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेवर संधी देत राहुल गांधी यांनी पूर्ण केला होता. प्रज्ञा सातव यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना विधान परिषदेत काम करण्याची पूर्ण संधी मिळाली नाही, याची जाणीव ठेवत राहुल गाधी यांनी सातव यांना पुन्हा संधी दिल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, विधान परिषदेच्या 11 जागासांठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्या शेवटची तारीख आहे. भाजपने आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. अजित पवार गटाचे दोन उमेदवार अंतिम झाले आहेत. महाविकास आघाडीकडून काँग्रेसने आपल्या वाट्याच्या एका जागेवर प्रज्ञा सातव यांनाच पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेतला.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर(Nagesh Patil Ashtikar) हे लाखांच्यावर मताधिक्याने विजयी झाले. मात्र आमदार प्रज्ञा सातव यांनी महाविकास आघाडीचा धर्म न पाळता विरोधात काम करत, वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा आरोप खासदार आष्टीकर यांनी केला होता. त्याआधी काँग्रेसच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्याने असाच आरोप सातव यांच्यावर केला होता.
आष्टीकर यांच्या लेखी तक्रारीची काँग्रेस गांभीर्याने दखल घेणार असे बोलले जात होते. सातव यांना उमेदवारी जाहीर होण्यापुर्वी माध्यमाशी बोलतांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या विषयावर बोलतांना खासदारांच्या तक्रारीची चौकशी करुन योग्य कारवाई केली जाईल, असे सांगितले होते.
परंतु त्यानंतर अगदी काही मिनिटांत प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे खासदार आष्टीकर यांनी सातव यांची काँग्रेसचे सचिव वेणूगोपाल यांच्याकडे केलेली तक्रार फारशी गांभीर्याने घेतली नाही असे दिसते.
प्रज्ञा सातव यांनी त्यांना मिळालेल्या अल्पकाळात विधानपरिषदेत विविध प्रश्नांवर आपली भूमिका मांडली. विशेषत: प्रज्ञा सातव यांची विधानपरिषदेवर निवड झाल्यानंतर हिंगोली जिल्ह्यात काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. दिवंगत राजीव सातव यांचे अपूर्ण राहिलेले काम आपल्याला पूर्ण करायचे आहे, असा निर्धार त्यांनी विधानपरिषदेवर निवड झाल्यानंतर व्यक्त केला होता.
जिल्ह्यातील अवैध धंदे, महिलांवरील अत्याचार याशिवाय शैक्षणिक, सामाजिक विषयावर सभागृहात सातव यांनी प्रभावीपणे आपली परखड मते मांडली होती. याशिवाय आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रज्ञा सातव यांची ही निवड फायदेशीर ठरणार आहे. राजीव सातव यांनी हिंगोली जिल्ह्यात जे संघटन उभे केले होते, ते प्रज्ञा सातव यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्यांदा संधी मिळाल्याने जिल्ह्यात काँग्रेस अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.
काँग्रेसचे(Congress) विधानपरिषदेतील तत्कालीन आमदार शरद रणपिसे यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांची नोव्हेंबर 2021मध्ये बिनविरोध निवड झाली होती. रणपिसे यांचा आधीचा कार्यकाळ लक्षात घेता सातव यांची मुदत संपल्यामुळे त्या निवृत्त झाल्या होत्या. विधानपरिषद सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. सातव यांना जेमतेम दोन वर्ष मिळाली. याचाही विचार सातव यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देतांना झाला असल्याचे सांगितले जाते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.