MLA Amit Deshmukh News Sarkarnama
मराठवाडा

MLA Amit Deshmukh News : विजय मिळवताना दमछाक झालेले अमित देशमुख काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीतून बाद!

Amit Deshmukh is out of the race for the Congress State President post. : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर हवेत असलेले महाविकास आघाडीचे विमान जमीनीवर आणण्याचे काम विधानसभा निवडणुकीच्या निकालाने केले.

Jagdish Pansare

Congress Politics : कधीकाळी दिल्ली दरबारात लातूर जिल्ह्यातील देशमुखांच्या गढीसाठी मानाचे पान असायचे. दिवंगत विलासराव देशमुख यांचा दिल्लीतील नेत्यांशी कायम संपर्क राहायचा. मतदारसंघ आणि दिल्लीच्या नेतृत्वाशी समन्यवय साधत विलासरावांनी अनेक वर्ष लातूर, मराठवाडा आणि महाराष्ट्रात आपले स्वतःचे स्थान निर्माण केले. पण त्यांच्या पश्चात वारसाने मिळालेले हे वैभव पुढच्या पिढीला टिकवात आले नाही,असेच म्हणावे लागेल. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचे पानीपत झाले आणि महाविकास आघाडीला लाॅटरी लागली. त्यात काँग्रेस पक्षाचा जॅकपाॅट लागावा इतके मोठे यश त्यांच्या पदरात पडले.

याला अनेक कारणं होती. यश मिळाले की त्याचे श्रेय घेण्यासाठी अनेक जण पुढे येतात, पराभवात मात्र कोणी वाटेकरी नसतो. मराठवाड्यात काँग्रेस (Congress) पक्षाने लातूर, जालना आणि नांदेड या तीन जागा लढवल्या आणि जिंकल्या. अशोक चव्हाण यांनी ऐन लोकसभा निवडणुकीपुर्वी पक्ष सोडल्याने अमित देशमुख यांच्यावर मोठी जबाबदारी होती. राज्यात महायुतीच्या विरोधात असलेले वातावरण, संविधान बदलणार ही दलित मतदारामंध्ये असलेली भिती आणि काँग्रेस-महाविकास आघाडीकडे वळलेला मुस्लिम मतदार या जोरावर आघाडीने बाजी मारली. अनपेक्षित मिळालेल्या यशात काँग्रेसचा वरचष्मा राहिला. मराठवाड्यात अमित देशमुख यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली गेली.

जिंकलेल्या तीनही मतदारसंघात अमित देशमुख यांनी प्रचार सभा, दौरे केले होते. त्यामुळे सहाजिकच या विजयाचे श्रेय त्यांनाही मिळाले. नांदेड, जालन्या पेक्षा (Amit Deshmukh) अमित देशमुख यांनी लातूरमध्ये सर्वाधिक वेळ दिला होता. डाॅ. काळगे यांच्या विजयात त्यांना वाटा नाकारण्याचे कारण नाही. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर हवेत असलेले महाविकास आघाडीचे विमान जमीनीवर आणण्याचे काम विधानसभा निवडणुकीच्या निकालाने केले. लोकसभेच्या अगदी विरुद्ध परिस्थिती निर्माण होऊन महाविकास आघाडीवर महायुतीने जोरदार आघाडी घेत सत्ता मिळवली. हा पराभव काँग्रेस पक्षाच्या जिव्हारी लागला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बदलण्याची मागणी होऊ लागली.

नवा प्रदेशाध्यक्ष कोण? याची जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा लातूरच्या अमित देशमुख यांचेही नाव पुढे केले गेले. लोकसभा निवडणुकीपुर्वी लातूर आलेल्या राज्यातील सगळ्याच नेत्यांनी अमित देशमुख यांनी आता (Latur) लातूरपुरते मर्यादित न राहता राज्य पातळीवर जबाबदारी स्वीकारावी, बाहेर पडावे अशी अपेक्षा भाषणातून व्यक्त केली गेली होती. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांना जबाबदारी दिली जाईल, असे बोलले जात होते. परंतु विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस पक्षाचा मराठवाडा आणि राज्यात झालेला दारूण पराभव आणि स्वतः अमित देशमुख यांची निवडून येताना झालेली दमछाक पाहता त्यांच्या नेतृत्वावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले.

विलासराव देशमुख हे लोकनेते होते, त्यांची जिल्हा, राज्य आणि देशपातळीवर वेगळी छाप होती. याउलट अमित देशमुख यांचे नेतृत्व हे लातूर पुरते मर्यादित राहिले. देशमुख कुटुंबाची कारखानदारी, जिल्हा बॅंक एवढेच त्यांचे विश्व राहिले. लोकांमध्ये मिसळून संघटन बांधणी करण्यासाठी लागणारी हातोटी, नेतृत्व गुण देशमुख यांच्यात कधी दिसलेच नाही. लातूर आणि जिल्ह्यात केवळ निवडणुका असल्या की यायचे? इतरवेळी मुंबई आणि विदेश दौरे करायचे अशी टीका त्यांच्यावर कायम केली जाते.

ग्रामीण मध्ये पराभव, लातूरमध्ये घामटा..

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्वतःचे पाच साखर कारखाने आणि सव्वा लाखाहून अधिक मराठा मतदार लातूर ग्रामीण मतदारसंघात असताना तिथे भाजपचे रमेश कराड निवडून आले. यातून देशमुख यांच्याविरोधात मतदारसंघात लाट होती, असे बोलले जाते. राज्याचे नेतृत्व ज्यांच्या हाती सोपवायचे ते स्वतः काठावर निवडून आले. तर भाऊ धीरज देशमुख यांना पराभवाचे तोंड पहावे लागले. अशावेळी आधीच रसातळाला गेलेल्या काँग्रेस पक्षाला उभारी देण्याची जबाबदारी अमित देशमुख यांच्यावर कशी देणार? असा प्रश्न विचारला जाऊ लागला.

या शिवाय लातूर जिल्ह्यात भाजपशी सेटलमेंट करून राजकारण केल्याचा शिक्काअमित देशमुख यांच्यावर कायमचा बसला असल्याने त्यांच्याभोवती कायम संशयाचे वातावरण राहिले. दिवंगत विलासराव देशमुख आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यातील राजकीय आणि राजकारणा पलीकडील मैत्री राज्यात चर्चेचा विषय राहिली आहे. विलासराव यांच्यानंतर अमित देशमुख यांच्याकडून जाहीरपणे अशा मैत्रीचे नाते दाखवले गेले नसले तरी राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळीक हे ही एक कारण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीतून अमित देशमुख बाद होण्यामागे असू शकते, अशी चर्चा आहे.

भाजपशी छुपी मैत्री नडली

2024 च्या लोकसभा निवडणुकी आधीपासून अमित देशमुख हे भाजपमध्ये जाणार अशा चर्चा होत्या. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अमित देशमुख हे कधीही भाजपच्या मांडीवर जाऊन बसतील, असा दावा जाहीरपणे केला होता. तेव्हापासून देशमुख यांच्याबद्दल पक्षात संशयाचे वातावरण होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अमित देशमुख यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थितीत केले होते. काँग्रेसचे दुसरे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडूनही अमित देशमुख यांच्या नावाला विरोध झाला असल्याचे बोलले जाते. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे, त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद घेण्यात मोठ्या नेत्यांनी फारसा रस दाखवला नसल्याची टीकाही विरोधकांकडून केली जात आहे.

बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, अमित देशमुख यांच्या नावाची या पदासाठी चर्चा होती. पैकी बाळासाहेब थोरात हे विधानसभेला पराभूत झाले, अशावेळी त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता नव्हतीच. महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू असतांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी जातीय समीकरणांचा विचार करत राहूल गांधी यांनी त्यांचे विश्वासू सहकारी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबादीरी सोपवण्याचे निश्चित केल्याचे बोलले जाते. त्यांच्या नावाची अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी राहुल गांधी यांनी पक्षातील प्रस्थापितांना झटका देण्याचे ठरवले एवढे मात्र निश्चित.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT