Beed politics : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारासाठी परळीचे आमदार माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यात चांगला जोर लावला. परळी विधानसभा मतदारसंघातील सात ते आठ हजार मतदान शंभर टक्के सतीश चव्हाण यांनाच होणार, असे छातीठोकपणे सांगणाऱ्या धनंजय मुंडे यांनी आज प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मैदानात उतरत थेट बूथ गाठल्याचे दिसून आले.
विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांचे वडील पंडित अण्णा मुंडे यांची आज पुण्यतिथी असल्याने कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु मराठवाडा पदवीधर मतदार संघाची अत्यंत महत्त्वाची निवडणूक असल्याने व त्यात बीड जिल्हा आणि धनंजय मुंडे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याने त्यांनी थेट बूथवर जाऊन मतदान सुरळीत होत आहे की नाही यावर लक्ष दिले.
सतीश चव्हाण (Satish Chavan) यांच्या प्रचारानिमित्त परळी येथे झालेल्या पदवीधरांच्या मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी त्यांच्या अठरा वर्षातील कामकाजाचे तोंड भरून कौतुक केले होते. तसेच निवडणुका कशा जिंकायच्या हे आपल्याला चांगलेच माहीत असल्याचे विधान केले होते. बीड जिल्ह्याचा सतीश चव्हाण यांच्या आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीत मोठा वाटा असल्याचे सांगत, चौथ्यांदा त्यांच्या विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आज प्रत्यक्ष मतदान पार पडले तेव्हा धनंजय मुंडे जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर भेट देताना दिसले. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या घरी आज त्यांचे वडील पंडितअण्णा मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कीर्तनाचा धार्मिक कार्यक्रम सुरू होते. घरच्या कार्यक्रमातून वेळ काढत त्यांनी थेट निवडणुकीचे रणांगण गाठले आणि बूथनिहाय फिरत नियोजनाचा धडाका लावला.
शुक्रवारी सकाळीच धनंजय मुंडे यांनी पत्नी राजश्री मुंडे यांच्यासह परळी तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान आटोपल्यानंतर मुंडे यांनी थेट सिरसाळा येथील मतदान केंद्राला भेट दिली. त्यानंतर परळी शहरातील कन्या शाळा, न्यू हायस्कूल, बाजार समिती, पंचायत समिती आणि थर्मल कॉलनी आदी महत्त्वाच्या मतदान केंद्रांवर जाऊन मतदान प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेतला.
उपस्थित स्थानिक पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत वेळेत जास्तीत जास्त मतदान करून घेत मतदानाचा टक्का वाढवण्याच्या सूचना ते कार्यकर्त्यांना करत होते. सतीश चव्हाण यांच्याशी आपले गेल्या अनेक वर्षापासूनचे विश्वासाचे नाते आहे, आमची एकमेकांना भक्कम साथ आहे असे सांगणारे धनंजय मुंडे प्रत्यक्षात आज मतदानावर नजर ठेवून होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.