Dharashiv Mahayuti Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Loksabha News : महायुतीकडून धाराशिवसाठी चर्चेत आलेले 'हे' नाव तरी खरे ठरणार का?

Loksabha Election 2024 : उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघात गेल्या काही महिन्यांपासून अनेक नावे चर्चेत आली आहेत. गेल्या चार - पाच दिवसांपासून तर दररोज एक नवीन नाव चर्चेत येत आहे.

अय्यूब कादरी

Dharashiv Loksabha News : इच्छुकांची संख्या जास्त आणि भाजपकडूनच लढण्याचा आग्रह, त्यात जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्यामुळे महायुतीच्या उस्मानाबाद (धाराशिव) मतदारसंघातील उमेदवार निश्चितीची चर्चा लांडगा आला रे.. प्रमाणे झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज एक नवीन नाव चर्चेत येत आहे. आज चर्चेत आलेले नाव दुसऱ्या दिवशी गायब होत आहे. आता यापुढेही असेच प्रकार सुरू राहिले तर लोक अशा चर्चांना गांभीर्याने घेणे सोडून देतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

धाराशिव मतदारसंघ भाजपला सुटणार, हे गृहीत धरून सेवानिवृत्त आयएएस अधिकारी प्रवीणसिंह परदेशी (Pravinsinh Pardeshi) यांनी चाचपणी सुरू केली होती. मतदारसंघात त्यांनी संपर्क वाढवला होता. त्यांच्या फेसबुक वॉलवर फेरफटका मारला की, एखादा नवोदित राजकीय नेता टाकतो तशा पोस्ट, रील्स दिसून येतील. परदेशी यांच्यासह भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरूळे, बसवराज पाटील, जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटील आदींनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती.

मात्र, आता मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला आहे. भाजपचे तुळजापूरचे आमदार राणाजगतिसिंह पाटील यांच्या सौभाग्यवती, धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे, मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी गेल्या काही महिन्यांपासून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती. अजितदादा पवार (Ajit Pawar) यांनी कामाला लागण्याचे आदेश आपल्याला दिले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार त्यांनी अनेक गावांना भेटी देऊन लोकांची मते जाणून घेतली होती. गेल्या चार-पाच दिवसांपासून ते मुंबईत तळ ठोकून आहेत.

काही दिवसांपूर्वी त्यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, मध्येच मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांचे नाव चर्चेत आले. दोन दिवस ही चर्चा सुरू राहिली आणि त्यांचे नाव मागे पडले. त्यानंतर पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांचे नाव चर्चेत आले. तेही एक-दोन दिवसांत मागे पडले. जागा राष्ट्रवादीला सुटली असली तरी प्रवीणसिंह परदेशी हेच उमेदवार असतील असे सांगितले जाऊ लागले, मात्र घड्याळ चिन्हावर लढण्यास परदेशींनी नकार दिला आहे, असे सांगण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हे संपले की, मग आमदार राणाजगजितसिंह पाटील (RanaJagjitsinh Patil) राष्ट्रवादीकडून लढणार असल्याची चर्चा सुरू झाली. ती लवकरच थांबली. त्यानंतर निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून लढणार, असे सांगितले जाऊ लागले. त्यांची चर्चा थांबते न थांबते तोच आमदार राणाजगजीतसिंह यांचे पुत्र मल्हार पाटील यांचे नाव समोर आले. शेवटी विक्रम काळे किंवा सुरेश बिराजदार यापैकी एकाचे नाव निश्चित होणार, असे सांगितले जाऊ लागले.

आता 1 एप्रिल रोजी अर्चनाताई पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्या 2 एप्रिल रोजी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आणि त्यानंतर त्यांची उमेदवारी जाहीर होणार, असे सांगितले जाऊ लागले आहे. ही चर्चा तरी खरी ठरेल का, अशी उत्सुकता मतदारसंघातील नागरिकांना लागली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT