Amit Shah, Uddhav Thackeray Sarkarnama
मराठवाडा

Uddhav Thackeray : "मी बाळासाहेब ठाकरेंचा पुत्र आहे, हे त्यावेळी 'मातोश्री'वर आलेल्या शाहांना माहिती नव्हते का?"

Dharashiv Shivsena UBT Rally : अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांचा प्रहार, मातोश्रीवर आल्यानंतर अमित शाह यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचा शब्द दिला होता, याचा ठाकरेंकडून पुनरुच्चार...

अय्यूब कादरी

Dharashiv Political News : भाजपने कायमच घराणेशाहीच्या मुद्द्यावरून काँग्रेससह इंडिया आघाडीवरही टीकेची झोड उठवली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतही भाजप हा मुद्दा उचलून धरत विरोधकांची कोंडी करण्याची शक्यता आहे. याचे संकेत खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी आपल्या दोनदिवसीय महाराष्ट्र दौऱ्यात दिले.

त्यांनी महाराष्ट्रात येऊन घराणेशाहीच्या मुद्द्यावर बोट ठेवत उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवारांवरही जोरदार हल्ला चढविला होता. या वेळी त्यांनी ठाकरेंना मुलाला तर पवारांना आपल्या मुलीला मुख्यमंत्री करायचे असल्याचं म्हटलं होतं.आता शाहांच्या याच टीकेवर ठाकरेंनी पलटवार केला आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उमरगा येथील जनसंवाद यात्रेत बोलत होते. या जाहीर सभेत त्यांनी भाजपवर त्यात प्रामुख्याने केंद्रीय मंत्री अमित शाहांवर (Amit Shah) निशाणा साधला.

आज तुम्ही घराणेशाहीच्या मुद्द्यावर बेंबीच्या देठापासून ओरडता आहात, मग शाह ज्यावेळी मातोश्रीवर आले होते, त्यावेळी त्यांना हे माहिती नव्हते का, की मी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र आहे, असा खडा सवाल ठाकरे या वेळी उपस्थित करत भाजपला खिंडीत गाठले.

या वेळी मी काही रात्री वेशांतर करून राहुल गांधी, शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटलो नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. 2019 पर्यंत भाजपने आमचा वापर करून घेतला आणि आज ते म्हणत आहेत की, उद्धव ठाकरे पक्षप्रमुखच नाहीत. मग त्यावेळी तुम्ही मातोश्रीवर कोणाला भेटायला आला होतात, असा घणाघातही त्यांनी केला.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सभेत थेट तुळजाभवानी मातेची शपथ घेतली. अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांकडून करण्यात येत असलेल्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या आरोपाचा त्यांनी तुळजाभवानी मातेची शपथ घेऊन थेट सोक्षमोक्षच लावला.

तुळजाभवानी मातेबाबत लोकांच्या मनात अढळ श्रद्धा आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणातही मातेचे असंख्य भक्त आहेत. एखादा नेता धाराशिव जिल्ह्यात आला आणि त्याने तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले नाही, असे होणे शक्य नाही. एखादी गोष्ट खरी आहे, हे सिद्ध करण्यासाठी या भागातील लोक तुळजाभवानी मातेची शपथ घेतात. तुळजाभवानी मातेची शपथ घेतली की मग लोक त्याबाबत शंका घेत नाहीत.

ठाकरे म्हणाले, आपण (शिवसेना-भाजप) प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटून घेऊ, असा शब्द अमित शाह यांनी मला मातोश्रीवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत दिला होता. आता ते खोटे बोलत आहेत, हे मी आज तुम्हाला तुळजाभवानी मातेची शपथ घेऊन सांगतो. आम्ही प्रभू श्रीरामांचे भक्त आहोत, तसे तुळजाभवानी मातेचेही निस्सीम भक्त आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची जनसंवाद यात्रा सुरू आहे. त्याअंतर्गत उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या कै. शिवाजीराव मोरे क्रीडा संकुलावर गुरुवारी(ता.7) उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर, धाराशिवचे आमदार, कैलास पाटील, उपनेत्या सुषमा अंधारे, केशव (बाबा) पाटील, तालुकाप्रमुख बाबूराव शहापुरे, अशोक सांगवे, रझ्झाक अत्तार यांची उपस्थिती होती.

उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले आणि माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड हे आता शिंदे गटात आहेत. त्यामुळे सभेला गर्दी होईल की नाही, अशी शंका होती. गावागावांतून आलेल्या कार्यकर्त्यांनी सभेला मोठी गर्दी केली होती.

(Edited By Deepak Kulkarni)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT