Political News : शरद पवार यांनी अजित पवार गटाच्या आमदारांना 'दम' दिला. हे दम देण्याचे कारण देखील त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे आमदार कार्यकर्त्यांना फोन करुन पक्षाचं काम न करण्याचा सल्ला देत असल्याचे विधान करत त्यांनी राजकारणात एकच खळबळ उडवून दिली. लोकशाहीत प्रत्येकाला आपआपल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचा हक्क यातून हिरावून घेऊ नका, असा इशारा शरद पवारांनी अजितदादांच्या आमदारांना दिला. इतक्यावर शरद पवार थांबले नाही तर त्यांनी माझ्या सहीने तुम्ही आमदार झाले आहात हे विसरु नका अशी आठवण करुन दिली.
मी गैरमार्गाने जात नाही असे ही स्पष्ट केले पण, वेळ आलीच तर सोडत नाही असे जाहिर सभेत सांगत दम देणाऱ्या आमदाराला शरद पवार (Sharad Pawar) यांनी इशारा दिला. शरद पवार यांच्या या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांचे आमदार, मंत्री हे दमाने किंवा दमात राहतील काय, असा प्रश्न या निमित्त चर्चेत आला आहे.
पुन्हा आमदार, मंत्री हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि नेत्यांना धमकावतील ? असा प्रश्न या निमित्त चर्चेत आहे. लोकसभा निवडणुक तोंडावर असताना राजकीय नेते मंडळीच्या भांडणात सामान्य कार्यकर्ताची अडचण होणार नाही याची खात्री दोन्ही गटाकडून घेण्याची गरज आहे. मसल आणि मनी पॉवरच्या जोरावर महाराष्ट्रातील राजकारणाचा संस्कृतपणा जपला जाईल की नाही हे पुढील काळात पाहण्यासारखे असेल.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना अगदी त्यांच्या भाषेत दम दिला आहे. 'मी त्या वाटेने कधी जात नाही आणि गेलो तर सोडत नाही' असे स्पष्ट शब्दात सांगत शरद पवार यांनी राष्ट्रवादी च्या आमदारांच्या धमक्यांना जशाच तसे उत्तर देण्याचा इशारा दिला. इतक्यावर शरद पवार थांबले नाही तर त्यांनी आज नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यामुळे देशातील लोकशाही धोक्यात आल्याचे उदाहरण देत स्पष्ट केले. मोदींमुळे देशातील लोकशाही संकटात आल्याचे त्यांनी सांगितले. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्यात आले, आता दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्याची तयारी सुरु असल्याचे सूतोवाच शरद पवार यांनी दिले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
एकीकडे भ्रष्टाचारावर टीका करायची आणि त्याच नेत्यांच्या गळ्यात भाजप स्वागताची माळ टाकायची यावर देखील पवार यांनी आज भाजपचा जोरदार समाचार घेतला. भ्रष्टाचाराविरोधात बोलणार मोदी 70 हजार कोटींच्या महाराष्ट्रातील घोटाळ्याबद्दल बोलत होते. त्यांनी त्या आरोपानंतर काय केले हे राज्यातील जनतेला माहित आहे. इतक्यावर ते थांबले नाही तर मोदींनी आरोप केल्यानंतर आपण जाहीर सभेत याची चौकशी करण्याची मागणी केली होती त्याचे काय झाले अशी विचारणा शरद पवार यांनी केली.
मोदींनी दिल्लीत एक पुस्तिका प्रकाशित केली. त्यात दहा वर्षांच्या कार्यकाळापेक्षा काँग्रेसच्या कार्यकाळातील गैरप्रकार अधोरेखित केले होते. त्यातील पहिल्या क्रमांकावर तत्कालिन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या काळातील आदर्श घोटाळ्याचा उल्लेख होता. आदर्श घोटाळ्यातील अशोक चव्हाण या पुस्तक प्रकाशनानंतर आठच दिवसांत भाजपमध्ये गेल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. भाजप म्हणजे वाॅशिंग मशिन असल्याची टीका पवार यांनी केली. भाजपच्या वाॅशिंग मशिनवर पवार यांनी आज उदाहरण देत म्हणाले.
लोणावळा येथील सभेत मदन बाफना यांनी देखील जोरदार भाषण देत शरद पवार यांच्यापेक्षा सहा महिन्यांनी ज्येष्ठ असल्याचे सांगितले. शरद पवार यांनी देखील लगेच बाफना यांना हात जोडले. मदन बाफना तसे शांत संयमी पण आज त्यांनी जोरदार भाषण करत मोदी सरकारवर टिकास्त्र सोडले. छगन भुजबळ यांनी जेलमधील त्रासाबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्यांना अवगत केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट फडल्याचे मदन बाफना (Madan Bafna) म्हणाले. त्यांनी थेट नाव घेत प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा सोडला. राज्यसभेच्या जागेवर उभे राहून खासदार होतात पण, स्वतःच्या मतदारसंघात विजयी होत नाही. विदर्भात राष्ट्रवादीचा एक आमदार जिंकण्यासाठी प्रफुल्ल पटेल प्रयत्न करत नाही अशी टिकाच बाफना यांनी केली.
एकूणच आजच्या लोणावळा येथील कार्यकर्ता शिबिरात शरद पवार आणि मदन बाफना यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दम भरला. या दम भरण्याच्या या कार्यक्रमामुळे अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, मंत्री पुढील काळात दमाने राहतील, वागतील काय असा प्रश्न मात्र नक्की पडला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.