Dharashiv News : धाराशिव जिल्हा परिषदेतील चार सभापतींची निवड शुक्रवारी करण्यात आली. यावेळी महायुतीचे एकमत दिसून आले. चारही सभापतींना 45 सदस्यांनी मतदान केले. त्यामुळे भाजपचे दोन तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एक तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सभापती झाला. या सभापती निवडीनंतर काही तासातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभापती निवडीबाबत दिलेला आदेश स्थानिक नेते मंडळीकडून पाळला जात नसल्याने जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे.
धाराशिव जिल्हा परिषदेतील चार सभापतींची निवड प्रक्रिया शुक्रवारी पार पडलेल्या विशेष सभेत पार पडली. ही सभा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अर्चना पाटील यांच्या उपस्थित पार पडली. यावेळी अर्थ व बांधकाम सभापतीपदी भाजपचे (BJP) सिद्धेश्वर कोरे, समाजकल्याण सभापतीपदी भाजपचे विश्वास कोकणे, कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब खरसडे, तर महिला व बालकल्याण सभापतीपदी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पूजा शिंदे यांची निवड करण्यात आली.
धाराशिव झेडपीतील निकाल लागल्यानंतर सत्तास्थापन करीत असताना भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत (Shivsena) जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या चर्चेनंतर भाजपच्या अर्चना पाटील अध्यक्ष झाल्या तर शिंदे शिवसेनेच्या उषा गायकवाड उपाध्यक्ष झाल्या. त्यानंतर महायुतीमधील तीन पक्षांनी सभापतिपद आपल्याच वाट्याला यावे, यासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती. तर काही अपक्ष सदस्यांनी पत्नीला भाजपमध्ये पाठवून सभापतीपदावरची दावेदारी कायम ठेवली होती. त्यामुळे शुक्रवारी होत असलेल्या निवडीविषयी उत्सुकता लागून राहिली होती.
मात्र, या सभापतीनिवडीनंतर काही तासातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभापती निवडीबाबत दिलेला आदेश स्थानिक नेते मंडळीकडून पाळला गेला नसल्याचा आरोप धाराशिव जिल्हा युवा सेनेचे प्रमुख आनंदा पाटील यांनी केला आहे. वरिष्ठ नेत्यांचा आदेशाचे पालन होत नसल्याने आईच्या जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा इशारा त्यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे.
धाराशिव जिल्हयातील स्थानिक पातळीवरील नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आदेश जुमानात नसल्याने मी माझ्या आईचा जिल्हा परिषद सदस्यत्वाचा व माझ्या पदाचा राजीनामा देणार असल्याचा इशारा धाराशिव जिल्हा युवा सेनेचे प्रमुख आनंदा पाटील यांनी दिला आहे. त्यासोबतच या निवडीच्या माध्यमातून माझ्यावर अन्याय झाला आहे. राजकारणापासून युवा पिढी लांब राहण्याचे हेच कारण असून या निवडीतून लोहारा तालुक्यावर अन्याय झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यापासून या ना त्या कारणाने सुरुवातीला भाजप व शिंदे यांच्या शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आला होता. तर त्यानंतर अध्यक्ष पदावरून दोन पक्षात रस्सीखेच पाहवयास मिळाली. तर शिवसेनेचे दोन सदस्य पळवून नेला असल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेने भाजपवर केला होता. त्यामुळे वातावरण तापलेही होते. तर आता सभापती निवडीनंतर शिंदे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.