

Dharashiv News : धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. मात्र, सत्तास्थापन करीत असताना अध्यक्षपदावरून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. निवडणूक निकाल लागून महिना उलटला तरी सत्तास्थापनेचा तिढा सुटला नाही. शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे. मात्र, मुंबई दरबारीही अद्याप निर्णय झालेला नाही. दुसरीकडे आमदार तानाजी सावंत यांनी निवडणुकीच्या तोंडावर मोठा डाव टाकला आहे. धाराशिव जिल्हा परिषदेच्या शिंदे शिवसेनेच्या गटनेतेपदी सावंत यांनी त्यांचे समर्थक असलेल्या संदेश (विकी) चव्हाण यांची वर्णी लावली आहे. त्यामुळे व्हीप बजावण्याचे अधिकार त्यांच्याकडे असणार आहेत.
15 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आता अध्यक्षपदावरही दावा केल्याने मोठा ट्वीस्ट निर्माण झाला आहे. शिंदे गटाच्या या दाव्यामुळे सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे टेन्शन वाढले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत गुरुवारी अंतिम निर्णय घेणार आहेत. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे. दरम्यान, गेले काही दिवस सहलीवर असलेले सदस्य गुरुवारी धाराशिवमध्ये दाखल झाले आहेत.
धाराशिव जिल्हा परिषदेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेचे 15, उद्धव ठाकरे सेना 7, काँग्रेस 3, बंडखोर 1 असे एकूण 11 व अपक्ष 3 असे एकूण 29 एकत्र आले असल्याचा आकडा शिवसेनेकडून सांगितला जात आहे. तर दुसरीकडे याला प्रत्युत्तर म्हणून भाजपचे 19, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 7, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे 6, अपक्ष व इतर पक्षाचे 4 असे एकूण 36 चा आकडा जुळला असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता शुक्रवारी कोणत्या पक्षाचा अध्यक्ष होणार? याची उत्सुकता मात्र शिगेला पोहचली असताना गेल्या दोन दिवसापासून सर्वच पक्षात वेगवान घडामोडी घडत असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बुधवारी मुंबईत धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थित धाराशिव जिल्हयांमधील प्रमुख नेत्याची बैठक पार पडली. या बैठकीवेळी धाराशिवमधील अध्यक्षपदाबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत. त्याचवेळी या बैठकीत धाराशिव जिल्हा परिषदेत शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे गटनेतेपदी संदेश (विकी) चव्हाण यांची निवड करण्यात आली. आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या पुढाकाराने ही निवड झाल्याने आता जिल्हा परिषदेत शिवसेनेची राजकीय ताकद वाढली आहे.
मुंबईत पार पडलेल्या या बैठकीस पालकमंत्री प्रताप सरनाईक, आमदार तानाजी सावंत, संपर्क प्रमुख राजन साळवी, माजी खासदार रवींद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, प्रवक्ते योगेश केदार यांच्यासह शिवसेनेचे जिल्हयातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
झेडपी अध्यक्षपदावर शिंदेंच्या शिवसेनेच्या दाव्याने ट्विस्ट
त्यानंतर आता धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावरही शिंदे यांच्या शिवसेने दावा केला असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात रंगली आहे. अध्यक्षपदाबाबतचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. गटनेते म्हणून विकी चव्हाण हे सभागृहात पक्षाचा व्हीप जारी करणे तसेच पक्षाची ध्येयधोरणे प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी पार पाडणार आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका निर्णायकी ठरणार आहे.
झेडपी अध्यक्षपदाबाबत सस्पेन्स कायम
गुरुवारी दुपारपर्यंत सीएम फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची याबाबत बैठक झाली नव्हती. त्यामुळे झेडपी अध्यक्ष पदाबाबत सस्पेन्स कायम होता. धाराशिव झेडपीचा अध्यक्ष भाजपच्या अर्चना पाटील की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उषा गायकवाड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, गेल्या महिनाभरापासून सहलीवर असलेले जिल्हा परिषदेचे सदस्य गुरुवारी धाराशिवमध्ये दाखल झाले आहेत. शुक्रवारी निवड होणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.