Bharatbhushan Kshirsagar and Dhananjay Munde Sarkarnama
मराठवाडा

Kshirsagar On Munde : आधी कोपरखळ्या अन् आता पायघड्या; डॉ.क्षीरसागरांकडून मुंडेंचं तोंडभरून कौतुक

Beed Politics : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात डॉ.योगेश क्षीरसागर यांनी बुधवारी प्रवेश केला.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात डॉ.योगेश क्षीरसागर यांनी बुधवारी प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवारांसह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत क्षीरसागरांचा प्रवेश झाला. या पक्ष प्रवेशावेळी डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी धनंजय मुंडेंवर स्तुतीसुमने उधळली. डॉ.भारतभूषण क्षीरसागर हे एकेकाळी धनंजय मुंडेंना 'पक्षविरोधी नेते', अशा कोपरखळ्या मारत असत. मात्र, योगेश क्षीरसागरांच्या प्रवेशावेळी त्यांनी मुंडेंचे तोंडभरून कौतुक करत केले आहे.

"आम्ही लोकांची कामे करतो, विकास करतो आणि म्हणून सातत्याने विजयी होतो. आम्ही इतरांसारखे मागच्या दाराने (धनंजय मुंडे विधान परिषदेवर होते) प्रवेश करत नाही, पक्षविरोधी नेते", अशा कायमच कोपरखळ्या डॉ.भारतभूषण क्षीरसागर धनंजय मुंडेंना पूर्वी लगावत. पण आता त्यांनी मुंडेंचे कौतुक केल्याने जिल्ह्यात एकच चर्चा रंगली आहे.

क्षीरसागर घराणे हे पूर्वीपासून काँग्रेसच्या विचाराचे. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व माजी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तर धनंजय मुंडे २०१२ मध्ये राष्ट्रवादीत आले. त्यावेळी जयदत्त क्षीरसागर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. २०१६ च्या दरम्यान डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांची राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. या काळात धनंजय मुंडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते.

लातूर -उस्मानाबाद -बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे नेतृत्व धनंजय मुंडे करत होते. बीडमध्ये त्यावेळी डॉ. भारतभूषण क्षीरसागर राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष होते. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक जगदाळे यांना संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील काकू-नाना आघाडीची मते घेऊ नयेत, असे डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांचे मत होते. पण त्यांची मते घेतल्याने डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी थेट भाजपच्या सुरेश धस यांना मदत केली होती.

एवढंच नाही तर सुरेश धस यांच्या विजयाचा गुलाल राष्ट्रवादीच्या डॉ.क्षीरसागरांनी पालिकेतच उधळला होता. यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी समर्थक जिल्हा परिषद सदस्यांना अनुपस्थित ठेवत अप्रत्यक्ष भाजपला मदत केली होती. अर्थात क्षीरसागर व मुंडे एकमेकांवर कुरघोड्या करण्याची संधी कधीही सोडत नव्हते.

२०१८ मध्ये नगरपालिकेच्या विकास कामांच्या भूमिपूजनावेळी डॉ.क्षीरसागरांनी भाजपच्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन पालकमंत्री पंकजा मुंडे यांना बोलवले होते. पण पक्षाचेच विरोधी पक्षनेते असलेल्या धनंजय मुंडे यांना टाळले होते. डॉ.क्षीरसागरांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देतानाही धनंजय मुंडेंवर टिकास्त्र सोडले होते.

"आम्ही कधीही मागच्या दाराने (विधान परिषदेवर) प्रवेश केले नाहीत", अशा कोरपखळ्या ते मुंडेंना मारत. अनेकदा भाषणातून धनंजय मुंडेंना विरोधी पक्षनेते नव्हे ते पक्षविरोधी नेते आहेत, असा टोलाही मारत. पण बुधवारी त्यांचे चिरंजीव डॉ.योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीत (अजित पवार गट) प्रवेश केला. यावेळी डॉ.क्षीरसागरांनी धनंजय मुंडेंचे तोंडभरुन कौतुक केले.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT