Beed News: केज तालुक्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि त्यानंतर निर्घृण हत्या, परळीत व्यापाऱ्याचे खंडणीसाठी अपहरण आणि लुटल्यानंतर सुटका या प्रकरणाने बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कायदा व सुव्यवस्थेचे धिंदवडे निघाल्याची टीका करत विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर टीकेची झोड उठवली आहे.
यावरून माजी पालकमंत्री आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी विरोधकांनी बीड जिल्ह्याची बदनामी करू नये, असे म्हणत झालेल्या घटनांची चौकशी व्हावी आणि संतोष देशमुख खून प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे, अशी मागणी करत पहिली प्रतिक्रिया दिली.
एकीकडे बीड जिल्ह्याची विरोधक बदनामी करत असल्याचा आरोप धनंजय मुंडे करत आहेत, तर दुसरीकडे त्यांचे अत्यंत विश्वासू असलेले सहकारी वाल्मिक कराड यांच्यावरच खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कराड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने विरोधक अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. दोन दिवसापुर्वीच परळीत भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या मुलाचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा लाखोंचा ऐवज लुटल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली होती. बीड जिल्ह्यात एकापाठोपाठ एक अशा अपहरण आणि खूनाच्या घटना घडत असल्याने विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला लक्ष्य केले आहे.
यातच धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळ असलेला त्यांचा सहकारी दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी अडकल्याने याला वेगळेच वळण दिले जात आहे. पवन ऊर्जा क्षेत्रातील 'अवादा' एनर्जी कंपनीचे केज तालुक्यात सुरु असलेले काम बंद करा, नाहीतर दोन कोटी रुपये द्या, अन्यथा हात-पाय तोडू, अशी धमकी दिली म्हणून परळीचे वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील केदू शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. वाल्मीक कराड यांनी 29 नोव्हेंबर रोजी विष्णू चाटे यांच्या मोबाईलवरून मस्साजोग येथे सुरू असलेले काम आधी बंद करा, सुदर्शनने (घुले) सांगितले त्या परिस्थितीत काम बंद करा अन्यथा गंभीर परिणाम होतील, असे धमकावले.
घुलेनेही मस्साजोग येथील कंपनीच्या कार्यालयात येऊन हात-पाय तोडू अशी धमकी दिली असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. काम सुरू ठेवायचे असेल तर दोन कोटी रुपये द्या, असे धमकावल्याचे सुनील केदू शिंदे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.