
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला केवळ एक जागा मिळाली. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कागल विधानसभा मतदारसंघात आमदार हसन मुश्रीफ यांनी सहाव्यांदा बाजी मारली. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा एकेकाळचा पठ्ठ्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हसन मुश्रीफ यांच्या विरोधातच खुद्द शरद पवार यांनी उमेदवार दिला. त्यामुळे कागलची राष्ट्रवादी कुणाची? असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना आव्हान देण्यासाठी शरद पवार यांनीच भाकरी फिरवली.
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांनाच आपल्याकडे खेचून कागलमधून उमेदवारी दिली. पण सात विधानसभा निवडणुक लढवण्याचा अंदाज असलेल्या मुश्रीफ यांच्यापुढे घाटगे यांचा निभाव लागला नाही. घाटगे यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) पक्ष हा कोल्हापूर जिल्ह्यात जिवंत राहण्याची आशा होती. मात्र सध्या जिल्ह्याला नेतृत्व नाही. कागल मधून भाकरी फिरवली खरी पण ती पचवणार कोण? अशा अवस्था राष्ट्रवादीची झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीला साथ दिल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापुरात देखील त्याचे पडसाद उमटले. तत्कालीन वेळी आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार राजेश पाटील यांनी अजित पवार यांना साथ दिली. कोल्हापूर जिल्ह्यात एकट्या हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी सांभाळली.
पक्षफुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी देखील मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी कागल पूर्तीच मर्यादित ठेवली असा आरोप केला. सध्या या राष्ट्रवादीची धुरा व्ही बी पाटील यांच्यावर आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात तीन उमेदवार देऊनही नामुष्की आली. चंदगड आणि कागल विधानसभा मतदारसंघात दोन उसने उमेदवार घेण्यात आले. मात्र दोन्हीही उमेदवारांना पराभव पत्करावा लागला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला जिल्ह्यात चेहरा नाही. कोल्हापूर महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी राष्ट्रवादीला हुकमी का शोधावा लागणार आहे. जिल्हा अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांचा प्रभाव का पडू शकणार नाही. शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे हे आव्हान पेलू शकतील का? शिवाय चंदगडच्या उमेदवार डॉ. नंदाताई बाभुळकर हे स्थानिक स्वराज्य संस्थेतील उमेदवारांना पाठबळ देऊ शकतील का? हा मोठा प्रश्न आहे.
एकंदरीतच पाहता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवार बदलून शरद पवार यांनी भाकरी फिरवली खरी? पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ती भाकरी पचवण्यासाठी कोण पुढाकार घेणार हा मोठा प्रश्न आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.