संदीप लांडगे
Teacher News : टीईटीविरोधात शिक्षकांनी राज्यभर आंदोलन केल्यानंतर आमदार प्रशांत बंब यांनी 'शिक्षक लाडवलेले आहेत' असे विधान करत वाद ओढवून घेतला. याविरोधात शिक्षक संघटना संतप्त झाल्या आणि त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. मात्र हा इशारा दिल्यानंतर काही तासही उलटत नाहीत, तोच आमदार प्रशांत बंब यांनी आता थेट शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्यांवर बोट ठेवत, खोटे दिव्यांग प्रमाणपत्र, चुकीची माहिती व नियमबाह्य लाभ घेतलेल्या शिक्षकांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करून शिक्षण विभागात खळबळ उडवून दिली आहे.
राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या (Teacher) सार्वत्रिक बदल्या 2025 प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप प्रशांत बंब यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सादर केलेल्या अहवालाचा दाखला देत, संवर्ग-1 (दिव्यांग) आणि संवर्ग-2 (पती-पत्नी एकत्रिकरण) अंतर्गत तब्बल 49 शिक्षकांनी खोटा व नियमबाह्य लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले आहे, असा दावा त्यांनी केला आहे
बंब (Prashant Bamb) यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांना दिलेल्या तक्रारपत्रात बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे, चुकीचे अंतर दाखवणे, गंभीर आजारांचे खोटे दाखले, जोडीदाराच्या सेवास्थानाबाबत चुकीची माहिती देणे तसेच एकदा लाभ घेतल्यानंतर पुन्हा लाभ उचलणे अशा गंभीर अनियमितता उघड झाल्याचे नमूद केले आहे
या प्रकारामुळे खऱ्या दिव्यांग शिक्षकांवर आणि सर्वसामान्य पात्र शिक्षकांवर प्रचंड अन्याय झाला असून, संपूर्ण बदली प्रक्रियेची पारदर्शकता धोक्यात आली असल्याचे पत्रात नमूद केले आहे. बंब यांनी यात केवळ चौकशी नव्हे, तर कडक कारवाईची मागणी केली आहे. त्यात सर्व संशयित शिक्षकांविरुद्ध निष्पक्ष व वेळबद्ध चौकशी, बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांची फॉरेन्सिक पडताळणी व वैद्यकीय पुनर्तपासणी करावी, दोषी आढळल्यास बदली तात्काळ रद्द, निलंबन/शिस्तभंग कारवाई करण्यात यावी.
त्यासोबतच बनावट प्रमाणपत्रांप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. चौकशी अहवालाची प्रत लेखी स्वरूपात तातडीने सादर करण्याचे आदेश शिक्षण विभागाला बंब यांनी दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.