MREGS Scam News Chhatrapati Sambhajinagar Sarkarnama
मराठवाडा

MREGS Scam News : रोजगार हमीच्या कामात'गोलमाल' एकच फोटो वापरत फुलंब्री तालुक्यात कोट्यावधीचा गैरव्यवहार!

A major scam has surfaced in Fulambri taluka, where fake labourers were allegedly shown on paper under the Employment Guarantee Scheme, leading to a fraud worth crores. : फुलंब्री तालुक्यात मातोश्री पाणंद रस्ते व सार्वजनिक रस्ते रोहयो योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.

Jagdish Pansare

नवनाथ इधाटे

Phulambri News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात रोजगार हमी योजनेच्या कामात मोठा गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एकाच मजुराचा फोटो शेकडोवेळ वापरून कोट्यावधी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप केला जात आहे. तर दुसरीकडे संबंधित अधिकाऱ्यांनी मात्र हा अपहार नसून तांत्रिक चूक असल्याचे म्हटले आहे. या प्रकारानंतर याची चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

फुलंब्री तालुक्यामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत सार्वजनिक रस्ते व पाणंद रस्त्यांची मोठी कामे झाली आहेत. (Scams) या कामांमध्ये संबंधित गुत्तेदारांनी रोजगार हमी योजनेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून बनावट मजूर दाखवत कोट्यावधी रुपये लाटल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान अधिकार्‍यांकडून तांत्रिक अडचणीमुळे एकच फोटो अनेक ठिकाणी अपलोड झाल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

फुलंब्री तालुक्यातील पंचायत समिती गेल्या अनेक वर्षापासून या ना त्या कारणाने सातत्याने चर्चेत आली आहे. (Chhatrapati Sambhajinagar) कधी वैयक्तिक लाभाच्या मंजूरीसाठी पैशाची उधळणं, तर कधी कामे मंजूर करण्यासाठी भीक मांगो आंदोलन, विविध संघटनांचे व लोक प्रतिनिधींनी ठिय्या आंदोलन करून पंचायत समितीचा कारभार अनेकदा चव्हाट्यावर आणला होता. आता पुन्हा फुलंब्री तालुक्यात मातोश्री पानंद रस्ते व सार्वजनिक कामे यामध्ये प्रत्यक्षात मजूर कामावर नसताना बनावट मजूर दाखवत कोट्यावधी रुपये गुत्तेदारांनी लाटल्याचे प्रकरण समोर आला आहे.

फुलंब्री तालुक्यामध्ये पानंद रस्ता व सार्वजनिक कामे असे मिळून 100 पेक्षा जास्त कामे सुरू आहेत. यातील काही पूर्ण झाली आहेत तर काही अपूर्ण अवस्थेत आहेत. या कामावर संबंधित गुत्तेदारांनी रोहयोचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून बनावट मजूर दाखविल्याचे समोर आले आहे. ही बाब संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याच्या लक्षात आली नाही का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. जर पानंद रस्त्यावर बनावट मजूर दाखवले गेले हा प्रकार स्थानिक अधिकाऱ्यांच्या लक्षात आला होता, असे बोलले जाते.

परंतू राजकीय पुढार्‍यांनी हस्तक्षेप करीत यात आपली पोळी भाजून घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता वरिष्ठ कार्यालयातून अधिकारी काय कारवाई करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फुलंब्री तालुक्यामध्ये मातोश्री पाणंद रस्ते व सार्वजनिक रस्ते रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. यामध्ये रोजगार हमी योजनेत कुशल व अकुशल कामाची वर्गवारी शासनाने ठरवून दिलेली आहे. त्यानुसार सदरील कामे करणे गरजेचे होते. या पाणंद रस्त्याच्या कामावर बनावट मजूर दाखवत गुत्तेदारांनी आपला हात साफ करून घेतला. मात्र आता हे प्रकरण अधिकाऱ्यांच्या अंगलट येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी थेट शेतात जाण्यासाठी मातोश्री पाणंद रस्ते योजना अमलात आणली. या योजनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना दळणवळण सुलभ व्हावे हा या योजनेमागचा हेतू होता. तरी देखील अनेक भागात पाणंद रस्ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. तर अनेक भागात पाणंद रस्त्यासाठी संबंधित शेतकर्‍यांनी अडचणी निर्माण केल्याने रस्ते अर्धवट अवस्थेत आजही पडून आहेत.

दरम्यान, रोजगार हमी योजनेच्या एनएमएमएस या अँपवर फोटो अपलोडिंग करतांना तांत्रिक अडचण आल्यामुळे एकच फोटो अनेक ठिकाणी अपलोड झालेला आहे. संबंधित गावातून तसा लेखी खुलासा देखील आम्ही कर्मचाऱ्याकडून घेतलेला आहे. त्यामुळे रोहयोच्या कामात कुठलेही बनावट मजूर नसून कोणताही घोटाळा झालेला नाही, असा खुलासा फुलंब्रीच्या गटविकास अधिकारी उषा मोरे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT