Chhatrapati Sambhajinagar News : बाल सुधारगृहातील मुलींचे पलायन प्रकरणी जिल्हा बालविकास अधिकारी निलंबित!
Assembly Session News : छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी इथल्या शासकीय बाल सुधागृहातून नऊ अल्पवयीन मुलींनी पलायन केल्याची घटना 30 जून रोजी उघडकीस आली होती. या प्रकाराने एकच खळबळ उडाली होती. पळून गेलेल्या मुलींनी बाल सुधार गृहातील अधिकारी, कर्मचार्यांवर गंभीर आरोप केले होते. मुलांवर पाणी शिंपडणे, हातावर क्राॅस गोंदवणे, धर्मांतराचा प्रयत्न व मुलींवर अविश्वास दाखवत गंभीर आरोपांच्या तक्रारी मुलींनी पोलीसांकडे केल्या होत्या.
पोलीस चौकशीत मुलींनी अनेक धक्कादायक बाबी सांगितल्या होत्या. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी हा विषय लावून धरला होता. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी जिल्हा बाल विकास अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येत असल्याचे सभागृहात सांगितले. तीन महिला पोलीस निरीक्षकांची समिती या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून उद्याच आपला चौकशी अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर यामध्ये जे जे दोषी आढळतील त्या सगळ्यांना सस्पेंड करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरात सांगितले.
घडलेला प्रकार अत्यंत गंभीर आहे, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. खंडपीठाने याची दखल घेऊन सुमोटो जनहित याचिका केली आहे. न्यायालय या प्रकरणात जो निकाल देईल तो देईल, पण सरकार म्हणून ज्याने कोणी आपल्या कर्तव्यात कसूर केली आहे, त्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येईल. या बाल सुधारगृहाची मुदत संपल्याचे सांगितले जाते, जर ती संपली असेल तर नव्याने या संस्थेला परवानगी देण्यात येणार नाही, असेही (Devendra Fadnavis) मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या गंभीर विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते. संभाजीनगर जिल्ह्यातील छावणी परिसरात असलेल्या वसतिगृहात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या छळ व अत्याचाराची माहिती दानवे यांनी सभागृहात देताना वसतिगृहाच्या मुलींच्या रूममध्ये सीसीटीव्ही लावणे अत्यंत चीड आणणारे आहे. जिल्हा बाल विकास अधिकारी यांच्याशी संबंधित हे प्रकरण असून बाल कल्याण समिती अर्ध न्यायिक असल्याने तिचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे दानवे म्हणाले.
जिल्हा बाल विकास अधिकारी यांच्याकडे संबंधित घटने प्रकरणी आतापर्यंत दहा तक्रार अर्ज करण्यात आले होते. मात्र त्यांनी या तक्रार अर्जांकडे दुर्लक्ष केले असल्याने जिल्हा बाल विकास अधिकारी या प्रकरणी जबाबदार असून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी अंबादास दानवे यांनी केली होती. राष्ट्रीय महिला आयोगाने देखील याची गंभीर दखल घेतली. तसेच पोलिस प्रशासन आणि संबंधित प्रशासकीय अधिकार्यांना कारवाईची सूचना केली. मात्र हे प्रकरण समोर येण्यापूर्वी राज्याचे महिला आयोग काय करत होते ? अशा शब्दांत दानवे यांनी राज्य महिला आयोगाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
सदरील वस्तीगृह चालवणारी संस्था धर्मांतरण करण्याचे कार्य करत असल्याचा आरोप दानवे यांनी करत संस्थेचा मान्यताप्राप्त कालावधी संपल्याची माहितीही सभागृहाला दिली. वसतिगृहात 80 मुली असून संस्था चालकांना याप्रकरणी कारागृहात टाकण्याची मागणी करत दानवे यांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरात जिल्हा बाल विकास अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येत असल्याचे सांगितले.
नेमके प्रकरण काय?
कॉमन बेडरूम रूममध्येच सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याने खासगी आयुष्याचे चित्रीकरण केले जात होते. आम्ही बालगृहात राहतो म्हणून हा प्रकार का? असा आरोप करत 30 जून सोमवारी सकाळी 11च्या सुमारास विद्यादीप शासकीय बाल सुधागृहातून नऊ अल्पवयीन मुली पळाल्या होत्या. या मुली शहरातील छावणी ते महावीर चौक, बाबा पेट्रोल पंप या रस्त्यांवरून पळत होत्या. ही बाब निरीक्षकांच्या लक्षात येईपर्यंत त्या दूरवर पळाल्या होत्या. अल्पवयीन मुलींनी बाल सुधारगृहातून पळताना रस्त्यात कोणी अडवू नये, पकडू नये यासाठी हातात दगड आणि लोखंडी रॉड घेतले होते. पोलीस आणि दामिनी पथकानं या मुलींचा पाठलाग करत काहींना ताब्यात घेतले होते.
विद्यादीप बालगृहास शंभर मुलींची मान्यता आहे. इथे सध्या 90 पेक्षा जास्त मुली आहेत. या बालगृहातून यापूर्वी मुली पळून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. मुलींनी थेट गच्चावर जावून लॉक तोडले. लॉक तोडण्यासाठी पाना आणि तीक्ष्ण हत्यारे वापरली. जवळपास 7 फूट उंच गच्चीवरून उड्या मारून काहीजणी बाहेर पळाल्या. तर काही मुलींना इथल्याच सुरक्षारक्षक बाईने गेट उघडून दिले असे मुलींनीच सांगितले. तुम्हाला इथे थांबायचे नाही मग आम्ही कशाला अडवू असे म्हणत त्या बाईनेच गेट उघडून दिले असे मुली म्हणाल्या.
विशेष म्हणजे पळून जाण्यापूर्वी चार मुलींना स्वतः च्या हाताला काचेचे वार करून घेतले. एका पोलिसाने मुलींना पळून जाताना पाहिले आणि दामिनी पथकाला कळवले. पेट्रोलिंगवर असलेल्या दामिनी पथकाने तातडीने मुलींचा पाठलाग सुरू केला. मुलीही हार मानायला तयार नव्हत्या. छावणी ते बाबा पेट्रोल पंप ते जिल्हा सत्र न्यायालयापर्यंत मुली पळत सुटल्या. पोलिसांनी अडवल्यावर मुलींनी हातात जे येईल ते मारायला सुरुवात केली. दामिनी पथकाने कसेबसे मुलींना पकडले. पण 9 पैकी 2 मुली निसटल्या होत्या.
खरेतर मुलींना थेट न्यायालयात आपली कैफियत मांडायची होती. पण पोलिसांनी त्यांना अगोदरच ताब्यात घेतले. आम्हाला पोलिस आयुक्तांनाच भेटायचे आहे म्हणत त्या यायला तयार नव्हत्या. पथकाने मुलींना छावणी पोलिस स्टेशनला नेले. तिथे मुलींची समजूत काढल्यानंतर मुलींना बालकल्याण समितीसमोर नेण्यात आले. या दोन्ही मुली नंतर पालकांसह बालकल्याण समितीसमोर आल्या. नंतर उर्वरित दोन मुली पालकांसह बालकल्याण समिती समोर आल्या.
बालगृहात आमच्या छळ तर व्हायचा. आम्हाला जेवण नीट दिले जायचे नाही. एकच साबण महिनाभर पुरवा,असू म्हणत आम्हाला सतत शिवीगाळ व्हायची. तुम्ही अशाच माजलेल्या असता, तुमच्यामुळे बालगृहाचे वातावरण खराब होते. तुमचा बाप काही आम्हाला पैसे देत नाही. तुम्ही कधीच सुरू शकत नाही असे म्हणत आम्हाला अपमानास्पद वागणूक मिळायची. पण आमच्या कॉमन बेडरूममध्ये सीसीटीव्ही लावले होते. आमच्या खोलीत कॅमेरे का लावता असे आम्ही नेहमी विचारायचो. आमच्या पालकांना बोलू दिले जात नव्हते. फोन लावून दिला जायचा नाही. म्हणून आम्ही पळालो असे या मुलींनी सांगितले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.