Dhananjay Munde
Dhananjay Munde  Sarkarnama
मराठवाडा

Beed Crop Insurance : बीडमधील उर्वरित १३ मंडलांतील शेतकऱ्यांनाही अग्रिम पीकविमा मिळणार

Dattatrya Deshmukh

Beed News : मराठवाड्यात सर्वत्र पावसाची परिस्थिती चिंताजनक असून त्याची संपूर्ण जाणीव महायुती सरकारला आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सर्वप्रथम बीड जिल्ह्यात सोयाबीन पिकाला एकूण ८६ पैकी आतापर्यंत ७३ मंडलांमध्ये २५ टक्के अग्रिम पिकविमा लागू केला आहे. तसेच, उर्वरित १३ मंडलांमध्ये सर्वेक्षणाचे अंतिम अहवाल आल्यानंतर सोमवारी होणाऱ्या बैठकीत या मंडलांचाही समावेश अग्रिम पीकविम्यामध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण यांनी केले. (Farmers of remaining 13 mandals in Beed will also get advance crop insurance)

जिल्हा परिषद सदस्य, आमदार, विरोधी पक्षनेते, मंत्री अशा वेगवेगळ्या पदांवर असताना धनंजय मुंडे यांनी सरकारमध्ये असो किंवा नसो कायम शेतकरीहिताची भूमिका घेतलेली आहे. मात्र, अनेकजण केवळ राजकीय पोळी भाजण्याच्या उद्देशाने वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, आरोपही ॲड. राजेश्वर चव्हाण यांनी केला.

मराठवाडा विभाग स्तरावर धनंजय मुंडे यांनी कृषी आयुक्त, विभागीय आयुक्त, विमा कंपनी व अन्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर बीड जिल्हा प्रशासनाने तातडीने सर्व महसुली मंडलांमध्ये सर्वेक्षण करून अहवाल प्राप्त होतील, त्याप्रमाणे अग्रिम पीकविम्याची अधिसूचना काढण्यास सुरुवात केली आहे.

आतापर्यंत ८६ पैकी ७३ मंडलांमध्ये सोयाबीन पिकासाठी अग्रिम पिकविमा देण्याची अधिसूचना जारी करण्यात आली असून उर्वरित १३ मंडलांचा समावेश या तेरा मंडळांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सोमवारी होणाऱ्या बैठकीत केला जाणार आहे. त्याचबरोबर सोयाबीनचा निर्णय होताच कापूस व तूर पिकांच्या सर्वेक्षणास सुरुवात होईल आणि त्याबाबतही निर्णय होईल, त्यामुळे याबाबत कोणीही शेतकऱ्यांची दिशाभूल करून राजकारण करू नये, अस आवाहन चव्हाण यांनी केले आहे.

मागील वर्षी अतिवृष्टी झाल्यानंतरही धनंजय मुंडेंनी संबंध बीड जिल्ह्यात फिरून राज्य सरकारला अनुदान मंजूर करण्यास भाग पाडले होते. त्या अनुदानाचे सध्या वाटप सुरू आहे. कांदा प्रश्नावर त्यांनी थेट दिल्लीपर्यंत शेतकऱ्यांची भूमिका मांडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अवाजवी भूलथापांना महत्व देऊ नये, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT