Ambadas Danve Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve On Crop Loan : 'शेतकऱ्यांना तीन दिवसांत पीक कर्ज मिळाले पाहिजे' ; अंबादास दानवेंनी भरला बॅंकाना दम!

Jagdish Pansare

Ambadas Danve Aggressive on Farmers Issue : ऐन पेरणीच्या दिवसात शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या राष्ट्रीयकृत बॅंकांना शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खडसावले. जिल्हा बॅंकेत जसे शेतकऱ्याला तीन दिवसात पीक कर्ज दिले जाते,

तशीच यंत्रणा राष्ट्रीयकृत बॅंकांनी निर्माण करावी, अशी सूचना दानवे यांनी केली. अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील 117 राष्ट्रीयकृत बँका समोर शिवसेनेने आंदोलन करत बॅंक अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

संभाजीनगरातील हर्सूल टी पॉईंट येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक विभागीय कार्यालयात विभागीय व्यवस्थापक मनोज वाडकर यांच्याशी अंबादास दानवे(Ambadas Danve) यांनी चर्चा केली. तसेच शेतकऱ्यांची अडवणूक कराल तर शिवसेनेशी गाठ आहे असा, इशाराही दिला. शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बॅंका जाचक अटी लादतात, कर्ज प्रकरण मंजूर करण्यासाठी अधिकारी-कर्मचारी टक्केवारी मागतात, फाईली दडवून ठेवल्या जातात, असा आरोप त्यांनी केला.

यापुढे कुठल्याही शेतकऱ्याची कर्ज फाईल, अर्ज तीन दिवसापेक्षा जास्त काळ प्रलंबित राहता कामा नये. जिल्हा बँकेत तीन दिवसाच्या आत पीक कर्ज मिळते, तशीच व्यवस्था आणि पद्धत राष्ट्रीयकृत बँकानी निर्माण केली पाहिजे, अशी मागणी दानवे यांनी केली. केंद्रीय अर्थमंत्री संसदेत मोठ्या उद्योगपतींचे कोट्यावधी रुपयांचे कर्ज माफ करण्याची घोषणा करतात. तर हाच न्याय शेतकऱ्यांना का लावला जात नाही?

शेतकरी राजा अडाणी नाही, त्याला कोणत्या कारणासाठी कर्ज घेण्याचे आहे यांची इंत्यभूत माहिती आहे असे सांगतांना योगीराज धनाजी राठोड या शेतकऱ्याची तक्रार महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या विभागीय कार्यालय व्यवस्थापकांसमोर दानवे यांनी ठेवली. बँकेचे व्यवस्थापक राजकीय दबाव आल्याशिवाय काम करत नाहीत. लोकप्रतिनिधी यांनी विनंती केली तरीही बँक मॅनेजर शेतकऱ्यांना कर्ज देत नाही. बि - बियाणे, खते ,महाग झाली आहेत, शेतकरी चिंतेत आहे, तरी बँका शेतकऱ्यांना कर्ज का देत नाहीत? असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.

व्यापारी, उद्योजक यांचे मोठ्या प्रमाणावर कर्ज थकित असताना त्यांच्यावर कारवाई होत नाही. फक्त शेतकऱ्यांना बँक धारेवर का धरतात? व्यवसायकांना बँक मोठ्या प्रमाणावर कर्ज देतात परंतु त्यांच्याकडून सक्तीने कर्ज वसुल न करता शेतकऱ्यांच्या पाठीमागे ससेमिरा लावला जातो. शेतकऱ्यांना पीक कर्जाची मोठी रक्कम दिली जात नाही, तरीही वसुलीसाठी सतत तगादा लावणे आणि नवीन पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करणे अन्यायकारण आहे, याकडे अंबादास दानवे यांनी बॅंक व्यवस्थापकांचे लक्ष वेधले.

शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक पीक कर्ज दिले जात नाही. द्यायचे झालेच तर त्याच्याकडून लाचेची अपेक्षा केली जाते. शेतकऱ्याला वेळेवर पीक कर्ज मिळाले पाहिजे, एप्रिल मे मध्येच पीक कर्ज वाटप होणे अपेक्षित आहे. तसे झाले तरच त्याला ते पेरणीसाठी उपयोगी पडते. परंतू अर्झा जून महिना संपत आला तरी अजून काही बँकांनी कर्ज वाटप केलेले नाही, याकडेही दानवे यांनी लक्ष वेधले.

आधी फलकाला मग तोंडाला काळे फासू.. -

काही बँकानी तर उदिष्टाच्या 50 टक्केही कर्ज वाटप केलेले नाही, ही गंभीर बाब असून अशा बॅंकावर कडक कारवाई केली पाहिजे, असेही दानवे म्हणाले. शेतकऱ्यांचे खाते होल्ड करणे, अनुदानाचे आलेले पैसे वळते करणे किंवा ते न देणे, असे प्रकार कदापी खपवून घेतले जाणार नाही. शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देणाऱ्या मुजोर कर्मचाऱ्यांना शिवसेना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला.

आज सुरू केलेले आंदोलन महिनाभर सुरुच राहणार असून पीक कर्ज नाकारणाऱ्या बॅंकाच्या फलकावर काळे फासले जाईल. जर पीक कर्ज मंजूर झाले नाही तर आगामी काळात बँक अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फसण्यास आम्ही हयगय करणार नाही, असेही दानवे यांनी यावेळी बजावले. मागील सहा महिन्यात 350 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. संभाजीनगर तालुक्यातील पिंपळखुट्टा येथील शेतकऱ्याने पीक कर्ज नाकारल्यामुळे आत्महत्या केली. राष्ट्रीयकृत बँकांचा हा मनमानीपणा वाढत आहे, याला पायबंद घालणे गरजेचे आहे, असेही दानवे यांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT