Uddhav Thackeray and Sushma Andhare  Sarkarnama
मराठवाडा

Shivsena Beed: सुषमा अंधारेंकडे बोट दाखवणाऱ्याला ठाकरेंकडून बाहेरचा रस्ता...

Sushma Andhare : बीड जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणीतून अंधारे यांच्यावर अनेक आरोप केले जात आहेत.

Jagdish Pansare

Marathwada News : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या फायरब्रॅंड उपनेत्या सुषमा अंधारे सध्या चांगल्याच वादग्रस्त ठरत आहेत. विशेषतः बीड जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणीतून अंधारे यांच्यावर अनेक आरोप केले जात आहेत. अगदी त्यांच्यावर आरोप करत पक्षातून बाहेर पडणाऱ्यांची संख्याही गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मात्र सुषमा अंधारे यांच्याविरोधात चकार शब्द ऐकून घ्यायला तयार नाहीत.

उलट जो कोणी त्यांच्याविरोधात बोलेल, आरोप करेल त्यालाच पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे. बीड जिल्ह्यात असा प्रकार पुन्हा एकदा पहायला मिळाल आहे. बीडचे माजी जिल्हाप्रमुख व जिल्हा सहसंपर्कप्रमुख अनिल जगताप यांनी अंधारे यांच्यामुळे जिल्ह्याच्या शिवसेनेत अंधेरा वाढत आहे. अंधारे व संपर्कप्रमुख किशोर पोद्दार यांनी पैसे घेऊन पदे वाटल्याचा खळबळजनक आरोप करत आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच येत्या नऊ तारखेला शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची घोषणाही केली. या घोषणेला चोवीस तास उलटत नाही, तोच 'मातोश्री'वरून अनिल जगताप यांच्यासह पाच जणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे आदेश निघाले आहेत.

गेल्याच महिन्यात शिवसेनेच्या (उबाठा) जिल्हा संघटनेत मोठे फेरबदल झाले. माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्यासह माजी मंत्री बदामराव पंडित, बाळासाहेब अंबुरे या तिघांना जिल्हा सहसंपर्कप्रमुख करण्यात आले. तर परमेश्वर सातपुते, गणेश वरेकर व रत्नाकर शिंदे यांना जिल्हाप्रमुख, शेख निजाम यांना बीड शहप्रमुख करण्यात आले.

काही महिन्यांपूर्वी बाललैंगिक अत्याचार प्रकरणात दाखल गुन्ह्यात रत्नाकर शिंदे यांचे नाव आल्याने त्यांना पदावरून हटवण्यात आले होते. परंतु पुन्हा त्यांची जिल्हाप्रमुखपदावर नेमणूक करण्यात आली. संघटनेतील या फेरबदलानंतर अंबाजोगाई, परळी, धारुर आदी विविध भागांतील पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर पैसे घेऊन पदेवाटप केल्याचा गंभीर आरोप केला होता.

आता, पुन्हा अनिल जगताप यांनीही अंधारे यांच्यावर तसेच आरोप केले आहेत. पात्रता नसलेल्या परमेश्वर सातपुते, गणेश वरेकर, रत्नाकर शिंदे या तिघांना जिल्हाप्रमुखपदी व निजाम शेख यांना शहरप्रमुख करण्यात आल्याचा आरोपही जगताप यांनी केला. तसेच आपण शिवसेना शिंदेगटात प्रवेश करणार असल्याचेही जगताप यांनी जाहीर करून टाकले. त्यानंतर 'मातोश्री'कडून जगताप यांनी केलेल्या आरोपांची काय दखल घेतली जाते? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

अखेर सुषमा अंधारे यांच्यावर आरोप करणाऱ्या आणि शिंदेगटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर करणाऱ्या अनिल जगताप यांच्यासह व्यकटेश शिंदे (परळी), गजानन मुडेगावकर (अंबेजोगाई), संदीप माने (वडवणी), राजाभाऊ लोमटे (अंबेजोगाई) व सागर बहिर (बीड) यांनी शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

(Edited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT