Parbhani News : काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश निश्चित झाला आहे. गेल्या अनेक दिवसापासून ते भाजपामध्ये जाणार अशा चर्चा सुरू होत्या. अखेर त्यावर येत्या मंगळवारी (ता.29) रोजी मुंबईत होणाऱ्या प्रवेश सोहळ्याने शिक्कामोर्तब होणार आहे. दुपारी तीन वाजता मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेले सुरेश वरपुडकर (Suresh Warpudkar) यांचे संभाव्य पक्षांतर हे परभणी जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत होता. अखेर त्यांनी आपल्या निकटवर्तीय नेत्यांसह व कार्यकर्त्यांशी संवाद साधून भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय निश्चित केला आहे. वरपुडकर यांनी 18 जुलै रोजी मुंबईत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन पक्षप्रवेशाबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर उपस्थित होते. याच बैठकीत पक्षप्रवेशासाठी मुहूर्त निश्चित करण्यात आला. (BJP) त्यानंतर वरपुडकर परभणीत परतले व आपल्या सहकारी नेत्यांशी चर्चा करत कार्यकर्त्यांसह नियोजन आखले. वरपुडकर यांच्या भाजपप्रवेशामुळे परभणी जिल्ह्यातील राजकारणात मोठी हालचाल होण्याची शक्यता आहे. विशेषतः काँग्रेसच्या संघटनात्मक रचनेवर त्याचा थेट परिणाम होणार असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना निर्णायक ठरू शकते.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर वरपुडकर यांनी सत्ताधारी महायुतीशी जवळीक साधण्याचे प्रयत्न सुरू केले होते. अनेक स्तरांवर विशेषतः काँग्रेसमधील माजी पदाधिकारी, महापालिकेतील माजी सदस्य व इतर स्थानिक नेत्यांबरोबर संवाद साधून त्यांनी आपला निर्णय निश्चित केला. सूत्रांच्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या माध्यमातूनही वरपुडकर यांचा भाजपशी संवाद घडवून आणण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नांदेड दौर्यातच सुरेश वरपूडकर यांचा भाजपामध्ये प्रवेश होईल, असे बोलले जात होते. परंतु तेव्हाचा मुहूर्त टळला आणि आता हा प्रवेश मुंबईत होणार आहे.
2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाथरी मतदारसंघातून सुरेश वरपूडकर यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश विटेकर यांनी त्यांचा 13244 मतांनी पराभव केला होता. राज्यात महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एकत्र लढण्याची शक्यता कमी आहे. स्थानिक पातळीवर काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे स्वतंत्रपणे या निवडणुकींना सामोरे जाण्याची शक्यता आहे. अशावेळी किमान आपल्या मतदारसंघात वर्चस्व कायम राहावे, यासाठी काँग्रेसमधील अनेक नेते हे भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा होत्या.
सुरेश वरपूडकर, जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या नावाची चर्चा अनेक दिवसांपासून होती. पैकी वरपडूकर यांचा भाजपा प्रवेश निश्चित झाला आहे, तर कैलास गोरंट्याल यांची अद्याप चर्चा सुरू असल्याचे समजते. वरपुडकर यांच्या प्रवेशाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या असल्या तरी त्यांच्याशी जोडलेले असंख्य कार्यकर्ते भाजपप्रवेशासाठी तयार असल्याचे निरीक्षण होते. त्यामुळेच त्यांनी प्रवेशाबाबतचा निर्णय मागे न घेता त्यावर शिक्कामोर्तब केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.